राज्यकर्ते धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व पायदळी तुडवत आहेत –प्रा. प्रतिमा परदेशी
नांदेड दि.
भारत हे आधुनिक राष्ट्र संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या पायावर उभे आहे. परंतु वर्तमानातील राज्यकर्ते धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व पायदळी तुडवत आहेत, असे उदगार विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी काढले. सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, शाखा नांदेडच्यावतीने आयोजित केलेल्या विद्वत् व्याख्यान व सत्यशोधक समाजकार्य राज्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे राज्य कार्याध्यक्ष डॉ.अनंत राऊत हे होते.
या वेळी विचार मंचावर मा. के ई. हरिदास, मा. अबरार देशमुख, डॉ.गौतम दुथडे,या.दत्ता तुमवाड हे उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. परदेशी म्हणाल्या की, भारताचे संविधान स्वातंत्र्य चळवळीच्या प्रबोधन प्रक्रियेतून उदयाला आले आहे. संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेपासून आर एस एस चे लोक संविधानाला विरोध करत आलेले आहेत.’ हिंदू कोड बिलामुळे स्त्रियांचे शील भंग पावेल ‘ अशा प्रकारची अविवेकी भाषा त्या काळातील जनसंघाच्या मंडळींनी केली होती. आणीबाणीच्या घोषणेला संविधानाची हत्या म्हणणे चुकीचे आहे. हेच लोक २०१४ पासून मोठ्या प्रमाणात संविधान विरोधी वर्तन करीत आहेत.
या समारंभात प्रा. प्रतिमा परदेशी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. गौतम दुथडे यांना सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे केंद्रीय अध्यक्ष मा. के.ई.हरिदास यांच्या हस्ते सत्यशोधक समाजकार्य राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. ५०००/₹ रोख सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, शाल व रोपटे असे या पुरस्काराचे स्वरूप होते.नांदेड आणि मराठवाडा परिसरात आंतरजातीय विवाहाची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे, अशी भूमिका मा. के. ई . हरिदास यांनी या वेळी मांडली. सत्काराला उत्तर देताना प्रा. गौतम दुथडे यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन पुढे आलेल्या एस.सी., एस.टी., ओ.बी.सी., एन.टी. प्रवर्गातील मंडळींनी फुले आंबेडकरी विचारावर निष्ठा ठेवून परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय होण्याची गरज व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. अनंत राऊत म्हणाले की, संविधानातील सेक्युरलॅरिझमचे तत्त्व राज्यकर्त्यांना धर्माच्या संदर्भामध्ये काही बंधने घालते. राज्याला कोणताही धर्म असणार नाही, अशी भूमिका मांडते. सांविधानिक पदावरील व्यक्तींनी धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व काटेकोरपणे पाळणे आवश्यक असते. पण वर्तमानातील शासन प्रमुखच विशिष्ट धार्मिक समूहाच्या मतांवर डोळा ठेवून आपल्या धर्मश्रद्धेचे जाहीरपणे प्रदर्शन करताना दिसतात. समाजात बुद्धिवाद ,विज्ञानवाद रुजवण्याच्या जबाबदारीकडे पाठ फिरवून अंधभक्तीचे स्तोम माजवतात. संविधानातील नीती निर्देशक तत्त्वांकडे दुर्लक्ष करून देशातील सारी संपत्ती मूठभर भांडवलदारांच्या घशात घालतात. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विठ्ठल दहिफळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा पावडे यांनी केले तर प्रा.डॉ.बालाजी पोतुलवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज प्रतिष्ठान नांदेड शाखेचे अध्यक्ष मा. दत्ता तुमवाड, कार्याध्यक्ष डॉ.बालाजी पोतुलवार, सचिव विठ्ठल दहिफळे, डॉ श्रीमंत राऊत डॉ.ज्ञानेश्वर डिगोळे, डॉ . शिवसांब कापसे,अनुराधा पाटील, मंजुषा पावडे, डॉ.आर.डी.शिंदे, डॉ.दत्ता कुंचलवाड, डॉ.गणपत कारीकंटे , डॉ. विशाल बेलुरे, इरवंत सूर्यकार , डॉ.मदनुरे , प्रा हिवराळे,डॉ. प्रकाश कोथळे, बसवंत घेवारे, दिलीप स्वामी, नरेश कमटम,कदम आदींनी परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत