भगवान बुद्ध खरे विचारवंत होते
( डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीतून )
हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धर्मशास्त्रवेत्ता होते त्यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथात परिचय मध्ये ते काय लिहितात ते पहा -
भगवान बुद्धाचे ” जीवन आणि शिकवण ” सुसंगतपणे व संपूर्णत: सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे. निकयावर अवलंबून राहून बुद्धाचे जीवन कथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्यय येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असे आढळते. जगात जेवढे धर्म संस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात ही अडचण निर्माण होते की गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतीशयोक्त ठरणार नाही. हे प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय ? जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. यासाठी अजून वेळ आली नाही काय ? या प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणून ते इथे उद्गधृत करण्याचे योजीत आहे
उपरोक्त संदर्भानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. यासाठी अजून वेळ आली नाही काय? असा ग्रंथात प्रश्न निर्माण केला आहे म्हणजे ब्राम्हण भिक्खु ह्यांनी नक्कीच बुध्दाच्या विचारात भेसळ करून ठेवली आहे हेच त्यांना समजून सांगावायचे होते.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथात भगवान बुद्धा बद्दल काय म्हणतात ते पहा -
प्रश्न असा उद्भवतो की, भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हता काय ? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी दोन मुद्द्यांचा अहवाल देतात ते म्हणतात...................!
माझे उत्तर अशी आहे की , भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यायचा होता. तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहे
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं. 175 अनु. क्रं. 16 ते 28.प्रकरण – इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले.? तृतीय खंड.. भाग – दुसरा. वाचा.
आध्यात्मिक उन्नती मांडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला मुद्दा वरील प्रश्नात मांडलेला नाही. तरीही मानसिक उन्नतीने न्याय मिळेल काय ?
ब्राम्हण लोक एवढे शातीर दिमाखाने समाजकारण आणि राजकारण ह्यात घुसखोरी करून कूटनितीने आपला पायंडा रुजवण्याचा प्रयत्न करतात.म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात -
लेखनकला अद्यापी विकसित झाली नव्हती. त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खु होते त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसायच केला त्यांना " भनक " म्हणतात
बौद्ध त्रिपीटक आणि अठ्ठगाथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते
पुष्कळ वेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही. भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या..............!
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं. 269 आणि 270.अनु. क्रं. 3 ते 7.प्रकरण – गैरसमजुतीचे कारण. चतुर्थ खंड. भाग दुसरा. वाचा म्हणजे खरे शोधता येईल.
भगवान बुद्धाच्या मूळ शिकवणुकीत ब्राह्मण मनुवादी चिवरधारी घुसखोरी केलेल्या भिक्खुनी कशी विचारात भेसळ करून ठेवली होती ह्याबाबतीत त्यांच्या लिखित खंडात ते काय म्हणतात ते पहा –
भगवान बुद्धाच्या संघटनेत काही त्रुटी राहिल्या. काही छिद्रे राहिली होती. म्हणून त्या छिद्रांद्वारे बाहेरील पाणी आत येऊन बुद्ध धर्माचा प्रवाह थोडा दूषित झाला होता. परंतु आता मी त्या धर्माची डागडुजी करून ती छिद्रे बुजविणार आहे
संदर्भ – खंड. 18 भाग – 3 पृष्ठ क्रं. 470.पैरा – 3 मधील खालच्या चार ओळी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगात ज्ञानाचे प्रतीक , उच्च कोटीची संपादन केलेली विद्वत्ता आणि धर्मशास्त्रवेत्ता या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांच्या नैतिकतेच्या भरोशावर परिपूर्ण होते. बुद्धाच्या धम्मातील आणि संघातील पुराव्यानिशी त्रुटी काढणे हे साधारण काम नाही. म्हणूनच तर ते पाचव्या स्थित्यंतरातील महान क्रांतिकारक नेते ठरलेत..... म्हणून ते भगवान बुद्धा बद्दल काय म्हणतात ते पहा -
बुद्ध हा खरा विचारवंत होता. त्याच्यासारखा विचारवंत अजून पर्यंत जगात झालाच नाही
संदर्भ – खंड. 18 भाग – 3 पृष्ठ. क्रं. 353.पैरा – 4.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धाला जगातील सर्वश्रेष्ठ विचारवंत म्हणतात. म्हणून तर त्यांनी आपणाला गुलामगिरीच्या दाश्यातून मुक्त करून , हिंदू धर्माच्या खुळचट विचारांना लाथ मारून ज्यात धर्म आणि धम्म आहे. त्यांनी धर्मदीक्षा दिल्यानंतर आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या. कारण त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होते की , हा समाज हजारो वर्षापासून देवदेवतांच्या खुळ्या श्रद्धेत अडकलेला आहे. म्हणून त्यांनी सर्वप्रथम हिंदू धर्मातील देव देवतांचे खंडन केले आणि इतर प्रतिज्ञेत पंचशील , अष्टांग मार्ग, दहा पारमितांची शिकवण या प्रतिज्ञात सामील केली. तसेच त्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तसेच प्रज्ञाशील आणि करुणेचा उल्लेख पण केलेला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विहारात जाण्याचे सांगितले आहे. धम्म सहलीला जाण्याचे सांगितले नाही. धम्म परिषदेत धम्मावर चर्चा केली जात नाही तर त्रिपीटकावर चर्चा केली जाते. ते म्हणतात -
खोट्या गोष्टीचे आवरण चढवून त्यात अगदीच मूळ बौद्ध विचारांशी अगदीच परकीय असलेल्या ब्राह्मणी विचारांची भर घालून तसेच मठशाही विचारांना प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सूत्तपिटकाला संपूर्णपणे विद्रूप करण्यात आलेले आहे. ज्याला बुद्धाची मूळ शिकवण माहित आहे तो असे सूत्तपिटक वाचून वेडा झाल्याशिवाय राहणार नाही
संदर्भ – खंड., 20 पृष्ठ. क्रं. 390 पैरा – 2.
म्हणूनच धम्म परिषदेत बुद्धाची मूळ शिकवण सांगितल्या जात नाही. पुढे ते म्हणतात -
बौद्ध वांग्मय अत्यंत अफाट आहे. बौद्ध वाङ्मयाच्या अथांग सागरात एखाद्याने बौद्ध धर्माचे सार समजून घेण्यासाठी कितीही बुड्या मारल्या तरी ते हस्तगत करता येणार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आकलणावरून हे सिद्ध होते की , आपण बौद्ध वांग्मय वाचून उड्या मारत आहोत.पण आपल्याला काहीच हस्तगत करता येत नाही. हे त्यांचे म्हणणे अंतिम सत्य असून तीच त्यांची सकारात्मक विचारसरणी होती आणि आहे. आजच्या घडीला सुद्धा त्यांच्या दूरदृष्टीपणामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही तंतोतंत खरे ठरत आहे.
दि. 4 ऑगस्ट 24.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत