पैसे आणा नाही तर आम्ही लेकरांचे व्हॅंटिलेटर काढू..
जयवंत हिरे.
नव्या मुंबईतील शिरवणे गावातील वंदना आणि नरेंद्र गाडे या जोडप्याला चौदा वर्षांनी एक नव्हे एकाच वेळी दोन लेकरं होतात.दोन्ही लेकरं जन्मत:च मरणाशी झूंजत असल्याने नेरूळच्या तेरणा रूग्णालयात व्हॅंटिलेटरवर ठेऊन डॉक्टर नावाचे यमदूत पैश्यांची लूट चालू ठेवतात.
“पैसे आणा नाही तर आम्ही लेकरांचे व्हॅंटिलेटर काढून त्यांना मरणाच्या स्वाधीन करतो.”अशी छातीवर पिस्तूल रोखून खंडणी वसूल केल्यासारखे एक लाख फी वसूलही करतात;तरी त्यांना त्या लेकरांना मरू न देण्याच्या मोबदल्यात दिड लाखाची मागणी लेकरांच्या मायबापा कडे करत असतात.माय बापांनी इकडून तिकडून लेकरांना जगवायसाठी कशीबसे जमा केलेले सारे पैसे संपलेत.
आता काय करायचं?
दशरथाने बाण मारून खून पाडलेल्या श्रावण बाळासारखे इतक्या वर्षांनी झालेल्या लेकरांचे व्हॅंटिलेटर काढल्याने तडफडत मरण पहायचं की श्रावण बाळाच्या माय बापासारखं बाळांच्या नावाचा जप करत तडफडून आपणच मारायचं?
नरेंद्र गाडेंनी आपल्या श्रावण बाळांचं तडफडत मरणं साजरं करण्यापेक्षा आपणचं मरायचं ठरवलं आणि दशरथ आपल्या लेकरांचा घेत असलेला जीव तडफडत मरतांना पाहण्यापेक्षा स्वत:च गळफास घेऊन जीव देणे पसंत केले.
भारताला जीवक, सुश्रुत अश्या मोठमोठ्या चिकित्सकांची असलेली परंपरा आजही चालवणाय्रा डॉक्टरांची मोठीच परंपरा आहे.डॉक्टर केवळ औषधोपचार करणाराच नसतो;तर आपली सुख-दू:खे सांगत त्याबाबतही सल्लामसलत करणारा परिवाराचा कौटुंबिक मित्र ही संकल्पना गत १०-१५ वर्षांत पार इतिहासजमा झाली आहे.
कोणत्याही मार्गाने मेडिकलला प्रवेश,तितकेच करोडो रुपये खर्च करून कशीबशी मिळवलेली वैद्यकीय पदवी आणि ते करोडो रूपये वसुलीसाठी नको असलेल्या उपचार -वैद्यकीय तपासण्या पासून ते औषध उत्पादकांकडून रूग्णाला ती औषधे देण्याच्या मोबदल्यात मिळवलेलं प्रचंड कमिशन यामुळे उपचार घेणे गोरगरीब रूग्णांसाठी चैन ठरू लागलेली.
त्या नंतर आलेल्या कोरोना मरण साथीच्या काळात छातीवर स्टेथोस्कोप रोखून झालेली प्रचंड लूट त्या काळात चर्चेचा विषय झाली होती.या काळात देशभर दू:खाचा मरणोत्सव चाललेला असताना गोर गरीबांपासून ते अमिरांपर्यंत साय्रा भारतीयांनाच या मरण लूटीचा सामना करावा लागला होता.या शिवाय “पी’यम’ केअर फंडा”द्वारे झालेल्या भ्रष्टाचाराला हजम करून दिलेल्या ढेकरांच्या अनेक रम्य कहाण्या आजही चर्चील्या जात आहेत.
कोरोना नंतर औषधोपचार हा सोने नाणे खरेदी करण्यासारखी चैन ठरू लागली.
याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दारिद्र्य रेषेखालील भारतियांना मोफत उपचारांसाठी “आयुष्यमान भारत” योजना मोठ्या गाजावाजात सुरू केली.
पण,कुठून तरी मिळवलेल्या आधारकार्ड -रेशनकार्ड डेट्यावर अनेकांना स्वत:लाही माहीत नसलेल्या आजारांवर माहित नसलेल्या उपचारासाठी प्रचंड बीलांच्या रकमांच्या लूटीच्या “आयुष्मान भारत” घोटाळयाने कोरोना महामारीच्या पीयम केअर फंड घोटाळ्यांवरही मात केली.
लोकसभा निवडणूकी अगोदर या “आयुष्यमान भारत” योजनेवरील उपचारांची खर्च मर्यादा पाच लाखांवरून दहा लाख करण्यात आली;तर विधान सभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अश्याच “महात्मा फुले जन आरोग्य योजने”च्या उपचारांची खर्च मर्यादा आता पाच लाख करण्यात आली असून राज्यातील गरीब -अमिर साय्रांनाच ती लागू करण्यात आली आहे.
राज्यातील सरकार आणि केंद्रातील सरकार जनतेवरील औषधोपचारांसाठी इतके उदार झाले असताना तेरणा हॉस्पीटलचे डॉक्टर पैश्यांसाठी लहानग्या बाळांचे व्हॅंटिलेटर काढून त्या लेकरांना मरणाच्या दाढेत ढकलायला निघालेले यमदूत होण्याइतके क्रूरकर्मा का झाले असतील?
तान्ह्या बाळांच्या जीवावर उठलेल्या आणि त्या पायी जीव द्यावे लागलेल्या नरेंद्र गाढेंच्या तडफडत मरणाला कवटाळण्यास जबाबदार राजा दशरथ कोण समजायचे?
तेरणा हॉस्पीटल आणि तेथील डॉक्टर्स?
की
“आयुष्यमान भारता”च्या दवंड्या पीटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी?
की
“महात्मा फुले जन आरोग्य योजने”च्या दवंड्या पीटणारे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे?
नरेंद्र गाडे तर मरण पावलेत.ते तान्हूलेही जगतील की श्रावण बाळासारखे व्हॅंटिलेटरच्या बाणाने मरतील.
माहीत नाही.
पण,याचा जाब प्रत्येक मायबापाने तेरणा हॉस्पीटल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंना विचारलाच पाहिजे.
लेकरांचे जीव वाचवण्यासाठी पैश्यांवाचून हतबल झाल्याने फाशी घेऊन मरण पत्करणाय्रा नरेंद्र गाढेंसाठी आसवं ढाळत गळ्यात दाटलेला आवंढा कसाबसा गिळतोय.
बस्स!
-जयवंत हिरे.
२७जुलै२०२४.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत