ॲड. प्रकाश आंबेडकर काढणार आरक्षण बचाव यात्रा
चैत्यभूमीवरुन 25 जुलै रोजी होणार यात्रेला सुरुवात
औरंगाबाद : सर्व ओबीसी घटकांची मागणी होती की, वंचित बहुजन आघाडी भूमिका मांडत आहे ती गावोगावी गेली पाहिजे. पक्षाच्या वतीने आम्ही ठरवले की, या सामाजिक संघटनांना सोबत घेऊन 25 जुलैला दादर, चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करायची आणि त्याच दिवशी फुलेवाडा येथे जायचे. 26 तारखेला राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. तेव्हा राजर्षी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा काढण्याचे आम्ही ठरवले असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केली.
२५ जुलैला मुंबईतील चैत्यभूमी आणि पुण्यातील फुलेवाड्याला अभिवादन करून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रभर काढण्यात येणार आहे.
आंबेडकर म्हणाले, जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या बाजूस सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला असल्याचे त्यांनी या वेळी अधोरेखित केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीकडून विनंती करण्यात आली होती की, सर्व राजकीय पक्षांना व्यक्तिगत पत्र लिहावे. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यावे या बाबत राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करावी. पण अजून वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेले नाही. श्रीमंत मराठ्यांचे जे पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि उध्दव ठाकरेंची शिवसेना हे जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत तोडगा निघत नाही.
आरक्षण बचाव यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या जातील. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे, sc/st विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ओबीसींच्या विद्यार्थ्यांना सुद्धा sc/st प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे. जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच आहे. आरक्षणाच्या माध्यमातून sc/st आणि ओबीसींना सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे, अशा प्रमुख मागण्या या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.
श्रीमंत मराठ्यांनी तुम्हाला आतापर्यंत फसवलेले आहे. त्यांनी टिकाऊ आरक्षण दिले नाही. तेव्हा ओबीसींच्या आणि आरक्षणवाद्यांच्या हातात सत्ता द्या, त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांच्या टिकाऊ आरक्षणाचे ताट वेगळं करून देण्याचे आश्वासन आम्ही देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठ्यांना आरक्षण न देणे हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. त्यामुळे आंदोलन हे इथल्या श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाले पाहिजे. असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, मी मराठा आरक्षणाचा तोडगा आता मांडणार नाही. कारण आता मांडला तर त्या तोडग्याचा खिमा केल्याशिवाय हे राहणार नाहीत. म्हणून सत्ता आल्यानंतर तो आम्ही मांडू असे मागे मी म्हणालो होतो.
आरक्षण बचाव यात्रेत येण्यासाठी आम्ही कोणालाही नाही म्हणत नाही. छगन भुजबळांना यायचे असेल, मुंडेंना यायचे असेल, हाकेंना यायचे असेल तर ते येऊ शकतात. तसेच, अन्य ओबीसी संघटनांनाही आम्ही बोलावले असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्फोटक परिस्थिती होत चालली आहे, ती अजून होऊ नये, शांतता राहिली पाहिजे. ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. पण भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत. यांनीही भूमिका घेतल्या पाहिजेत, जेणेकरून स्फोटक परिस्थिती शांत करता येईल आणि गावगाडा पूर्ववत होईल यासाठी आम्ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आयोजित केली आहे. असे आंबेडकरांनी सांगितले.
ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलै रोजी दादर चैत्यभूमीपासून सुरू होऊन पुणे महात्मा फुलेवाडा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना असे होत औरंगाबाद येथे समाप्त होणार आहे.
औरंगाबाद येथे या यात्रेचे मोठ्या सभेत रूपांतर होणार आहे
एस. सी, एस. टी, ओबीसी आणि भटके विमुक्त यांच्या आरक्षणाचा लढा ॲड. प्रकाश आंबेडकर त्यांच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासून लढत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा एस.सी, एस. टी, ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या आरक्षणासाठी लढा दिला होता. त्यामुळे आरक्षणाच्या संदर्भात ॲड. आंबेडकरांची भूमिका सुद्धा ठाम राहिली आहे. त्यामुळे या आरक्षण बचाव यात्रेची उत्सुकता वाढली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत