169 कुटुंबाच्या बाहेरच्यांनी काय करावे…?
महाराष्ट्रात लोकशाही नाही. हा आरोप नाही,कपोलकल्पित कल्पना नाही, तर्क नाही तर हे वास्तव आहे. महाराष्ट्रात लोकशाही नाही घराणेशाही आहे. ती निर्माण केली प्रस्थापित सरंजामी वृत्तीच्या कॉंग्रेस पक्षाने. कॉंग्रेस पक्षाचाच कित्ता गिरवितं, कॉंग्रेस पक्षाच्याच धोरणाची री ओढतं सत्तेसाठी विरोधी पक्ष भाजप, शिवसेनेने घराणेशाही ला अंगिकारले आहे. आता महाराष्ट्रात असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप या चारही पक्षात घराणेशाही ने ठाण मांडले आहे. त्या घराण्यांची संख्या १६९ कुटुंब एवढी आहे.१६९ कुटूंबाच्या परिघातच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानसभा, लोकसभे पर्यंत सत्तेचा वावर आहे. प्रत्येक निवडणुकीत निवडून येणारा तो या १६९ कुटुंबाच्या बाहेरचा येऊ नये अशी दक्षता हे चारही प्रस्थापित राजकीय पक्ष घेत असतात.त्याचे महत्त्वाचे कारण असे की, हे १६९ कुटुंब आपसात नातेवाईक सुद्धा आहेत. सगेसोयरे, नातेवाईक, एक सत्ताधारी पक्षात तर दुसरा विरोधी पक्षात अशा रीतीने पेरुन ठेवले आहेत की, सत्तेत असतांना कितीही मोठा घोटाळा केला तरी तो बाहेर येतचं नाही, घोटाळा ऊघडं होतं नाही. मग चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याचे काही एक कारण नाही.कारण विरोधी पक्षातही यांचेच सगेसोयरे बसले आहेत.
२०२४ ची लोकसभा संपन्न झाली, निकाल आले आहेत. ४८ पैकी एक तरी खासदार असा दाखवा जो पहिल्यांदा निवडून आला आहे आणि त्याच्या कुटुंबात यापूर्वी कुणीच सत्ता ऊपभोगली नाही. सगळे घराणेशाहीचे वारसदार आहेत आणि म्हणून २०२४ च्या लोकसभेत महाराष्ट्रात लोकशाहीचा संकोच केला गेला.लोकशाही पराभूत झाली आणि घराणेशाही जिंकली आहे.
संविधान वाचविण्याची भाषा करणा-या ढोंगी घराणेशाही वाल्यांनी आपली घराणेशाही मजबूत करुन लोकशाहीचा मुडदा पाडला हे आतातरी महाराष्ट्रातील मतदारांनी अनुभवातून समजून घेतले पाहिजे.
घराणेशाही वाल्यांनी दलित,मुस्लिम,आदिवाशी,समुहाच्या मतदारांना संविधान वाचविण्याच्या खोट्या सबबीखाली मुर्ख बनवून त्यांची मते ओरबाळली आणि आपली घराणेशाही अधिक मजबूत करुन घेतली. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील जनता कटीबद्ध आहे. संविधान वाचविण्याच्या मुद्यांवर महाराष्ट्रातील मतदार कटीबद्ध आहे हे सिद्ध झाले आहे. खोटारड्या घराणेशाही वाल्यांनी आपली घराणेशाही मजबूत करण्यासाठी आणि सत्तेत कायम रहाण्यासाठी, सामान्य मतदारांच्या मनात अगोदर प्रचंड भिती निर्माण केली. भयग्रस्त मनाला आपल्या बाजूने वळविण्यासाठी संविधान वाचविण्याचं नाटक ऊभं केलं आणि मतदारांना भुल देऊन आपली घराणेशाही शाबूत ठेवली हा २०२४ च्या लोकसभेचा अनुभव आहे. सांसदीय लोकशाहीला ७५ वर्षे होतं आहेत आणि ज्या राज्याला पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख आहे त्या महाराष्ट्रात लोकशाहीचा सांगाडा तेवढा शिल्लक राहिला आहे. आणि घराणेशाही नंगानाच करीत सत्तेच्या खुर्चीत हैदोस घालीत असेल तर ही अतिशय विसंगत आणि दुर्दैवी बाब आहे. नव्हे ते महाराष्ट्रातील संविधान प्रेमी, लोकशाहीवादी,समाजवादी,आंबेडकरवादी जनतेच्या पराभुततेचे लक्षण आहे. लोकशाहीच्या मृत सांगाड्याला दाखवून घराणेशाही आपलं आसन मजबूत करीत असेल तर हे आणखी किती काळ चालू द्यावे. महाराष्ट्रातील मतदारांनो चिंतन केले पाहिजे प्रस्थापित राजकीय पक्षांनी मिडिया मार्फत भिती दाखवायची आपणं भयग्रस्त व्हायचे आणि यांची घराणेशाही बोकांडी बसवून घ्यायची, हे आणखी किती निवडणुकीत चालू द्यावे की, संपवावे ह्यावर चिंतन केले पाहिजे.
महायुती × मविआ आघाडी म्हणजे द्विपक्षीय राजकारण तिसरा नको अशी मांडणी महाराष्ट्रातील मिडिया करीत आहे. सांसदीय लोकशाहीसाठी ही रीत अतिशय घातक आहे. आपल्या सांसदीय लोकशाहीने बहुपक्षीय लोकशाहीला मान्यता दिली आहे....!!
द्विपक्षीय राजकारण म्हणजे अध्यक्षीय लोकशाही पद्धती कडे जाण्याची वाटचाल आहे. म्हणजेच सांसदीय लोकशाही संपवून अध्यक्षीय लोकशाही लागू करण्याकडे इथल्या प्रस्थापितांनी तयारी चालविली आहे.त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांनी छोटे छोटे सर्वच राजकीय पक्ष संपवण्याची बेमालूम पणे छूपी कामगिरी केली आहे राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष. जनसुराज्य पक्ष, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष. कपिल पाटील यांचा समाजवादी जनता दल. बच्चू कडू यांचा प्रहार, बहूजन आघाडी, अबु आझमी यांचा समाजवादी पक्ष, ओवेसी यांचा एआयएमआयएम पक्ष, प्रकाश शेंडगे यांचा ओबीसी पक्ष, रिपब्लिकन पक्षाचे कवाडे, माने, आठवले, गवई गट. या सर्वच पक्षांचे अस्तित्व लोकसभा २०२४ मध्ये संपवण्याचं षडयंत्र प्रस्थापितांनी यशस्वी केले ही बहुपक्षिय सांसदीय लोकशाही साठी धोक्याची घंटा आहे. सांसदीय लोकशाही कायम रहावी असे वाटतं असेल तर या दोन राजकीय पक्षांच्या आघाडी व्यतिरिक्त तिसरा पर्याय शिल्लक असला पाहिजे, म्हणजे बहुपक्षीय सांसदीय लोकशाही जिवंत राहिलं अन्यथा द्विपक्षीय राजकारण चालू झाले तर अध्यक्षीय लोकशाही बोकांडी बसल्या शिवाय राहणार नाही हा धोका वेळीच लक्षात घ्या.सांसदीय लोकशाही वाचविण्यासाठी, महाराष्ट्रातील १६९ कुटुंबाच्या बाहेरील जनतेने २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत या कुटुंबाच्या बाहेरील आमदार निवडून देऊ ही दक्षता घेतली पाहिजे…!!
दोनच आघाड्या नाही तर तिसरा पर्याय ऊभा राहिला पाहिजे ही मानसिकता तयार केली पाहिजे. प्रस्थापितांनी ऊभा केलेल्या टी. वी. वरील बातमीवर विश्वास ठेऊ नये कारण तो प्रस्थापितांचा बटीक आहे. वृत्तपत्रातील अफवेवर विश्वास ठेऊ नये कारण ते वृत्तपत्र घराणेशाही वाल्यांनी सुरू केले आहेत, आपल्या ससत्तेसाठी त्यांचा ते बेमालूम पणे वापर करीत असतात. कुठल्याही भितीला बळी पडून भयग्रस्त मनाने निवडणुकीत मत नोंदवू नये. अशी काही पथ्थे महाराष्ट्रातील मतदारांना पाळता आली तर सांसदीय लोकशाही वाचविता येईल नाहीतर घराणेशाही ने लोकशाही चा गळा घट्ट आवळला आहेच. परिणाम काय होईल हे तुम्हांला सांगायची गरज नसावी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत