संयमाने झुंजणारे नेतृत्वः चंद्रकांत खंडाईत !
अरुण विश्वंभर जावळे
महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीतील स्वतंत्र प्रज्ञेचं अभ्यासू, चिंतनशील, तत्वनिष्ठ आणि शांत – संयत – कुशल व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत खंडाईत तथा आप्पा! हे व्यक्तिमत्त्व जेव्हा आपल्या कार्यकर्तृत्वाने सामाजिक पटलावर तळपू लागले तेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अर्थात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची नजर त्याकडे गेली. जिगरबाज सच्चा कार्यकर्त्यांच्या अंगी असावे लागणारे गुणकौशल्य या अवलियात असल्याचं यथावकाश ॲड. आंबेडकरांनी हेरलं आणि बघता बघता भारिप बहुजन महासंघाच्या सातारा जिल्हाप्रमुखपदाची सन्मानपूर्वक जबाबदारी या व्यक्तिमत्त्वावर सोपवली. पुढे वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यात मजबूत केली. चंद्रकांत खंडाईत हे सद्या वंचितमध्ये नसले तरी प्रकाश आंबेडकरांचे त्यांच्यावर लक्ष आहे. आता रिपब्लिकन सेनेचे जबाबदारी ते पेलत आहेत. खरेतर खंडाईत कोणत्याही पक्षाच्या platform वर कार्यरत असले तरी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांसह इतर भल्याभल्यांच्या हृदयात नितांत आदराचं स्थान निर्मूण आदर्श नेतृत्व कसे असावे हे ते सिध्द करत असतात, नव्हेतर संयम कसा राखावा, शांतपणे चळवळ कशी ‘रन’ करावी हे दाखवून देतात. आज अशाच संयमी नेतृत्वाचा जन्मदिन..!
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीच्या क्षितिजावर साधारणपणे ३५ वर्षापूर्वी चंद्रकांत खंडाईत हे नांव उदयास आले. तेव्हाचा काळ हा चळवळीसाठी भारलेला होता. ‘हर जोर जुल्म की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है!’ ही उदघोषणा बुलंद करण्यासाठी अनुकूल होता. सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला आदराने तळहातावर जपलं जात होतं. सामाजिक चळवळीत चढउतार आले तर ते कसे पार करायला हवेत याचा एक धडा येथे प्रत्येकाला अभ्यासायला मिळत होता. ही सर्व परिस्थिती पहात, अनुभवत चंद्रकांत खंडाईत यांचा सामाजिक, राजकीय प्रवास सुरु होता. अशा पार्श्वभूमीवर २० वर्षांपूर्वी चंद्रकांत खंडाईत यांनी सातारा शहरात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानासंबधी प्रखर आंदोलन छेडले आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सचा घाट उलथवून टाकला. यामध्ये त्यांना अटक झाली. त्यांच्यासह असख्य आंदोलकांवर खटले भरले. परंतु या परिस्थितीतून त्यांनी अत्यंत कौशल्याने मार्ग काढला. आंदोलकांना धीर दिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान संरक्षित स्मारक म्हणून महाराष्ट्र शासनाला घोषित करायला भाग पाडले. या घटनेने महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील घराघरात चंद्रकांत खंडाईत हे नाव पोहचले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने ते चळवळीतील कार्यकर्त्यांच्या हृदयात विराजमान झाले ते कायमचे.
आजवरच्या प्रवासात अन्याय, आत्याचाराच्या जेव्हा कुठे घटना घडतात तेव्हा पिसाळलेला जाळ बनून रस्त्यावरची लढाई सम्यक विचाराने कशी लढली पाहिजे याचा वस्तुपाठ चंद्रकांत खंडाईत यांनी महाराष्ट्राला घालून दिला. उपेक्षित, वंचित, फाटक्या, भटक्या अशा सर्वहारा समूहाची निर्भयता हा लोकशाहीचा खराखुरा गाभा आहे असे ठणकावून सांगत निर्भय राहणे आणि हृदयात परिवर्तनाच्या ज्वाला बाळगत कार्यकर्त्यांला संघर्षास सज्ज करणं हे अवघड कार्य खंडाईत यांनी स्वतःच्या खांद्यावर लिलया पेललं. कदाचित याचमुळे की काय भीमकोरेगांव दंगल प्रकरणानंतर प्रत्येक जिल्ह्यात आंबेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु असताना सातारा जिल्ह्यात एकाही कार्यकर्त्यांला पोलीस हात लावू शकले नाहीत. नेतृत्वाचे विलक्षण कसब कसं असावं हेच खरंतर यातून सिध्द होतं.
दिमतीला बक्कळ पैसा आणि दोनचार गाड्या असं काही नसतानासुध्दा रात्री अपरात्री महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून आवाज आला तर तिथे चंद्रकांत खंडाईत हजर आहेतच. पक्ष, संघटना, गट या पलिकडे जाऊन माणसांच्या प्रसंगाला धावून जाण्याची जबरदस्त माणूसकी त्यांच्या ठायी आहे. कार्यकर्त्यांबद्दल असणारा हा अफाट जिव्हाळा आणि अचाट कळवळा फारच कमी नेतृत्वात असतो. खंडाईत यांच्या नेतृत्वाचे हे बलस्थान असले तरी ‘सच्चाई’ हे खरे त्यांचे सामर्थ्य आहे. आज इतर पक्षातील जेव्हा कार्यकर्ते स्वतःचे विविध प्रश्न घेऊन खंडाईत यांच्याकडे येतात तेव्हा तो सच्चा नेतृत्वाला सलाम असतो. एखाद्या राजकीय पक्षाचे नेतृत्व करणं हा भाग वेगळा. तसे तर अनेकजण करत असतात तथापि माणसांच्या हृदयात आपलं ‘नेतृत्व’ मजबूत करणं कमालीचे विलक्षण आणि अचंबित करायला लावणारे आहे. खरंतर, खंडाईत यांनी कार्यकर्त्यांच्या काळजात पेरलेल्या विश्वासाचा, सम्यकतेचा हा सहर्ष विजय आहे !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आंदोलनावेळी चंद्रकांत खंडाईत प्रसिध्दीच्या शिखरावर होते. तेव्हा तर स्वतःच्या पक्षात, संघटनेत घ्यावयास अनेक नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्या होत्या. मात्र पद, पैसा अशा अमिषाला बळी न पडता स्मारकाच्या प्रश्नासाठी झुंज देण्याचं त्यांनी तत्व पाळलं. हातात घेतलेलं मिशन प्रामाणिक वृत्तीने पुढे कसे नेता येईल याचा ध्यास ज्याला श्वासागणिक असतो तो सच्चा अनुयायी असतो, हे माहीत असल्यामुळे अविचल निष्ठेने ते लढत राहीले. कदाचित तेव्हा कोणत्या पक्षात वा संघटनेत खंडाईत गेले असते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले नसते, हे निर्विवाद सत्य !
महामानवांच्या विचारांचा आदर्श जपत स्वतःचं जगणं निष्ठापूर्वक चळवळीसाठी देणारं नेतृत्व कसं असावं याचं जीवंत आणि ज्वलंत आदर्श उदाहरण म्हणजे चंद्रकांत खंडाईत तथा आप्पा होय. या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रासह धम्म चळवळीतील वाटचाल यापुढे अधिक दमदार व्हावी. माणसाला माणुसकीचे भान देण्याबरोबरच सामाजिक न्यायाचे कार्य त्यांच्या हातून निरंतर घडत रहावे. यासाठी नवी प्रेरणा, नवी हिम्मत, नवा उत्साह, नवे धैर्य, नवे साहस, नवा बुलंद निर्धार, नवी जिद्द सतत रक्ताच्या थेंबाथेंबात संचारत जावी आणि उत्तम आयुष्य लाभावे अशा मनःपूर्वक भावनांसह चंद्रकांत खंडाईत यांना आभाळभर हार्दिक सदिच्छा !
अरुण विश्वंभर जावळे
९८ २२ ४१ ५४ ७२
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत