विज्ञान जन्माला आले आणि देवाचा आणि धर्माचा अंत व्हायला सुरुवात झाली…
गंमत म्हणजे, जे धर्म मानत होते त्या वैज्ञानिकांनी देखील आपल्या धर्मातीलच कल्पना विज्ञानाच्या आधारे खोडून काढल्या, आपल्याच श्रद्धांना खोटे पाडले आणि तरीही ते स्वतःला धार्मिक म्हणत राहिले
पुढची गंमत अशी की देवाने जग निर्माण केले असे एकीकडे ते म्हणत राहिले आणि दुसरीकडे देवाने निर्माण केलेले हे जग वास्तवात कोणत्या वैज्ञानिक नियमाने तयार झाले आहे हे सांगत राहिले. याचा अर्थ धार्मिक वैज्ञानिकांनी आपल्याच धर्मातील कल्पना या उधळून लावल्या आणि तरीही ते धार्मिक राहिले
धर्मग्रंथ म्हणाले होते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो पण तेच धर्मग्रंथ पुजणाऱ्या वैज्ञानिकांनी ठासून सांगितले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. म्हणजे जिओसेंट्रीक सिद्धांत चुलीत गेला
देवाने माणूस निर्माण केला असे म्हणणाऱ्या धर्मग्रंथाला जेव्हा डार्विन कडून समजले की उत्क्रांतीतून माणूस निर्माण झाला तेव्हा धर्मग्रंथ पाळणारे वैज्ञानिक डार्विन खोटा आणि धर्मग्रंथ खरा म्हणत राहिले आहेत. तेही आज अखेर म्हणजे उत्क्रांतीवाद आहे म्हणायचे आणि दुसरीकडे धर्मग्रंथ पुजायचे असला भोंगळपणा सुरू आहे
स्वर्ग आणि नरक आहे असे धर्मग्रंथातून कर्कश्यपणे ओरडून सांगायचे आणि त्याच धार्मिक वैज्ञानिकांनी चंद्रावर, मंगळावर, परग्रहावर,जाण्यासाठी पृथ्वीवर यान तयार करून सोडायचे आणि असे करून देखील स्वर्ग नरकाचा पत्ता आणि त्याचे आधार कार्ड अजून सापडलेले नाही, तरीही म्हणत राहायचे.. स्वर्ग-नरक आहे बरं का..
देव नावाच्या शक्तीने जगातील सर्व गोष्टी निर्माण केल्या असे धर्मग्रंथ ओरडत राहिले. पण त्यांचा आवाज बंद केला एका धार्मिक वैज्ञानिकाने ज्याचे नाव होते न्यूटन. गुरुत्वाकर्षण शक्ती हीच सर्व वस्तूंना जमिनीकडे खेचते असे त्याने सांगून देव वर सगळ्या वस्तूंना खेचून घेतो ही धर्म ग्रंथातील गंमत खोडून काढली.. तरीही धर्म खोटा ठरूनही न्यूटन धार्मिक राहिला
मानवाला व प्राण्यांना होणारे रोग हे अज्ञात शक्तीमुळे होतात असे धर्मग्रंथ बडबडत होते. पण अनेक धार्मिक वैज्ञानिकांनी हे रोग विविध जंतू आणि विषाणूंमुळे होतात हे साधार दाखवून दिले. तरीही हे धार्मिक वैज्ञानिक देवाची लिला अगाध म्हणत राहिले
देवाने जीव निर्माण केला असे लोकांना सांगत राहायचे आणि त्याचवेळी टेस्टट्यूब मधून जीव निर्माण करायचा. म्हणजे देवाला खोटे पाडायचे असे काम धार्मिक वैज्ञानिकांनी केले आहे. तरी देखील देवाची पूजा करायचे काही सोडलेले नाही
धार्मिक वैज्ञानिक जे असतात त्यांचा प्रॉब्लेम हाच असतो की ते धर्म आणि देव सोडायला तयार नसतात. आणि दुसरीकडे त्याच धर्म आणि देवातील विसंगती जगाला दाखवून देत राहतात. हे गोंधळलेपण संपूर्ण इतिहासामध्ये दिसून येते. ते सर्व धर्मातील वैज्ञानिकांच्या बाबतीत दिसून येते. आजही कुठल्याही विज्ञानाचा शोध लागलेले उपकरण वापरायचे ठरले तरी देव आणि धर्म वापरून ते नीट चालावं अशी भोळी समजून घट्ट आहे. मग ते तिरुपतीचे तंत्रज्ञ असोत नाहीतर आपल्या दुचाकी गाडीला लिंबू-मिरची बांधणारे असोत
या धार्मिक आणि देव मानणार्या लोकांची आणि वैज्ञानिकांची गंमतच अशी आहे की सगळे आयुष्य विज्ञानाच्या आधारे काढायचे आणि आपल्या जगण्याचे क्रेडिट मात्र देवाधर्माला देऊन टाकायचे. हा भोंगळपणा बहुसंख्य ठिकाणी सर्व धार्मिकांत सापडतो आणि वर म्हणायचे.. वैज्ञानिक हे धार्मिक आणि देव मानणारे असले म्हणून काय झाले??
म्हणून हे झाले की… वैज्ञानिक दृष्टिकोनाचा रोज रोज गाडायचे आणि लोकांना शहाणे होऊ द्यायचे नाही ..आणि हा अपराध धार्मिक वैज्ञानिक देखील करतातच
👆7219017700👆
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत