दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक

अण्णा भाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त लेख..


-डाॅ.श्रीमंत कोकाटे

                                    ज्यांच्या वाट्याला फक्त दीड दिवसाची शाळा आली त्याच साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यक्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळविले. त्यांची साहित्य संपदा जगातील सुमारे 22 भाषांत अनुवादित झालेली आहे. 

                                      त्यांची चित्रा, सुलतान या कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात, तर त्यांनी लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियातील घराघरात गावागावात आणि शाळा-महाविद्यालयात गायला जातो. इतका तो प्रेरणादायी आणि लोकप्रिय आहे. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी 15 पोवाडे, एक नाटक, दहा लोकनाट्य, एक प्रवास वर्णन, तेवीस कथा आणि सुमारे 40 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. इतका प्रतिभासंपन्न आणि बहुविध साहित्यिक मराठी भाषेत दुसरा झाला नाही. 

                                         प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात, 'अण्णा भाऊंच्या कादंबरीची तुलना करणारी भारतीय भाषात दुसरी कादंबरी नाही. अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीची तुलना रशियन कादंबरीकार दोस्तोएवस्की यांच्याशीच होऊ शकते. यावरून स्पष्ट होते की अण्णा भाऊ साठे हे केवळ मराठी भाषा, महाराष्ट्र, भारत या चौकटीमध्ये मावणारे व्यक्तिमत्व नसून, ते जागतिक स्तरावरचे साहित्यिक ठरतात.

                                         अण्णा भाऊ साठे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. कष्टकरी, कामकरी, शेतकरी वर्गाच्या हक्क अधिकारासाठी ते लढले. मुंबईसह मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या वाणीने -लेखणीने शाहीर अमर शेख ,शाहीर गव्हाणकर यांच्यासोबत ढवळून काढला.

                                        'माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली' ही त्यांची छक्कड खूप गाजली. त्यांची ही छक्कड मराठी भाषेचे वैभव आहे. अत्यंत निस्वार्थ भावनेने त्यांनी सर्वसामान्य वंचित वर्गाच्या हक्कासाठी लढा दिला. 

                                        बालपणापासून त्यांच्या वाट्याला अत्यंत हलाखीचे जीवन आले.ओझी वाहिली, कोळसा वाचला, गिरणीत झाडू मारला. पोटासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. संकटाला संधी समजून त्यांनी लढाऊ वृत्तीने त्यावरती मात केली. आण्णा भाऊ साठे संकटात खचून जाणारे नव्हते. तर संकटाच्या नरडीवर पाय देऊन यशाची शिखरे गाठणारे आण्णा भाऊ होते.

                                          गोरगरिबांचे दारिद्र्य नष्ट व्हावे, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. आण्णा भाऊ म्हणत, 'दारिद्र हे फार क्रूर असते, आणि ते नग्न असते. ते नष्ट झाले पाहिजे.' यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांनी पंजाब दिल्लीचा दंगा, बंगालची हाक या कलाकृतीच्या माध्यमातून शांततेचे आवाहन केले. आण्णा भाऊ साठे म्हणत, 'शांतता ही पवित्र बाब आहे. दंगल करून आपला प्रश्न सुटणार नाही, तर शांततेच्या मार्गानेच आपले प्रश्न सुटतील.' अशी त्यांची भूमिका होती. गरिबांना न्याय मिळावा, ही त्यांची प्रामाणिक भूमिका होती.

                                          आण्णा भाऊ साठे हे महान प्रतिभावंत साहित्यिक होते. परंतु साहित्याचा उपयोग त्यांनी समाजपरिवर्तनासाठी केला. एखादा प्रसंग उभा करण्यात त्यांचा हातखंडा होता. अचूक वर्णन करून एखादी व्यक्ती किंवा घटना याचे चित्रण करण्यात त्यांचा हातखंडा होता. प्राचीन काळामध्ये जनमानसाच्या मराठी भाषेला गाथासप्तशती, मध्ययुगीन काळात चक्रधरांचे लीळाचरित्र, संत नामदेवांची गाथा, संत तुकारामाचे अभंग, आधुनिक काळात महात्मा फुले यांचे साहित्य आणि साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य कवेत घेत इंग्रजाळलेल्या काळात जनमाणसाची मराठी साहित्यात आणली. आजचे आधुनिक साहित्यिक म्हणजे आण्णा भाऊ साठे आहेत. त्यामुळेच त्यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन झाला पाहिजे. तो मराठी भाषेचा आणि आण्णा भाऊंचा ही सन्मान ठरेल

                                         आण्णा भाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊ साठे असे आहे. आण्णा भाऊ साठे हे आधुनिक महाराष्ट्राचे तुकाराम आहेत. त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दारिद्र्य, विषमता यावरती कडाडून हल्ला केला. आज देखील आपल्या समाजामध्ये पृथ्वीची निर्मिती ईश्वराने देवाने केलेले आहे. जगाचा नियंता ईश्वरच आहे. हे सर्व जग सजीव सृष्टी ईश्वर चालवतो आहे. अशी अंधश्रद्धा आहे. परंतु आण्णा भाऊ साठे म्हणतात, 'पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर तरलेली नसून ती कष्टकरी, श्रमकरी ,शेतकरी वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे." श्रमकऱयांनी श्रम नाही केले तर धनदांडगे  फक्त नोटा खाणार नाहीत.'

                                   श्रमकऱ्यांचा कैवार घेऊन आण्णा भाऊ साठेअन्यायाविरुद्ध सातत्याने लढत राहिले. हे जग बदलायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल. हे सांगताना अण्णा भाऊ साठे म्हणतात, '"हे जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव.'"

                                        आण्णा भाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ तर आईचे नाव वालुबाई होते. घरात प्रचंड गरिबी. दारिद्र्य हाच त्यांचा सखा नि सोबती होता. आण्णा भाऊंना वाटायचे आपण खुप शिकावे, म्हणून ते शाळेत गेले. गुरुजींनी त्यांना वर्गात बसू दिले नाही. एक दिवस ते वर्गाबाहेर बसूनच आत गुरुजी काय शिकवतात हे बाहेर बसून ऐकत होते. दुसऱ्या दिवशी धाडस करून ते वर्गात गेले. गुरुजींनी त्यांना दांडक्याने मारले. शिक्षण घेण्याच्या आशेने शाळेत गेलेल्या आण्णा भाऊंना मार खाऊनच घरी यावे लागले. ते फक्त दीड दिवस शिकले. पण पुढे जाऊन त्यांनी अक्षर ओळख करून घेतली आणि त्यांची प्रतिभेची गाडी सुसाट सुटली. गुणवत्ता आणि प्रतिभा ही कुणाची मक्तेदारी नाही. हे साहित्यसम्राट अण्णा भाऊ  साठे यांनी जगाला दाखवून दिले.

                                    वयाच्या दहाव्या वर्षी अण्णा भाऊ साठे आणि त्यांच्या परिवाराला वाटेगाव वरून मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे वाटेगाव ते मुंबई असा चारशे किलोमीटरचा प्रवास अण्णा भाऊंनी त्यांच्या परिवारासह पायीच सुमारे दोन महिने केला. उदरनिर्वाहासाठी कोळसे वेचायचे, झाडू मारायचा, ओझे उचलायचे; असे करत करत त्यांनी मुंबई गाठली. ज्या अण्णा भाऊंना वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत, त्याच अण्णा भाऊ साठे यांना रशियन सरकारने विमानाने बोलावून रशियामध्ये त्यांचा मोठा आदर सन्मान केला. अण्णा भाऊ साठे म्हणजे रशियन जनतेच्या गळ्यातील ताईत होते. त्यांची साहित्य संपदा रशियन भाषेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

                                        अण्णा भाऊ साठे आपल्या शिष्टमंडळासह जेव्हा रशियामध्ये पोहोचले, तेव्हा तेथील शासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, "तुम्हाला काय पाहायला आवडेल. तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळातील डॉक्टर म्हणाले आम्हाला या ठिकाणची वैद्यकीय सेवा पाहायची आहे. लोकप्रतिनिधी म्हणाले या ठिकाणी शासन व्यवस्था कशी चालते ते पाहायचे आहे. वकील मंडळी म्हणाली या ठिकाणची न्यायव्यवस्था पाहायची आहे. संगीतक्षेत्रातील सहकारी म्हणाले या ठिकाणचे कला, नाट्य, संगीत पाहायचे आहे. अण्णा भाऊ साठे म्हणाले, "'या ठिकाणचा मला फुटपाथ दाखवा आणि फुटपाथवर गोरगरीब कसे जगतात ते मला पाहयचे आहे". रशियामध्ये जरी गेले, तरी उपेक्षित, वंचित, गरिबांची नाळ कधी तुटली नाही. अण्णा भाऊ साठे संवेदनशील मनाचे होते.

                                     अण्णा भाऊ साठे रशियात जाण्यापूर्वीच त्यांची कीर्ती रशियात पोहोचली होती, ती त्यांच्या साहित्यामुळे. तेथे त्यांना छत्रपती शिवाजी राजांवर अभ्यास करणारे प्राध्यापक चेलिशेव भेटले. कॉम्रेड पी. ए. बारनिकोव भेटले. रशियन लोकांना मराठी भाषा शिकविणाऱ्या प्राध्यापिका ततियाना कातेनीना भेटल्या, बाकु याठिकाणी हमीद साहेब भेटले. हमीद साहेब अण्णा भाऊंना पाहिल्या पाहिल्या म्हणाले "शाहिरी अझीज." रशियामध्ये अण्णा भाऊ साठे यांनी ताश्कंद, मास्को, स्टालिनग्राड, बाकू, अझरबैजान इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. 

                                 मास्को येथील सत्काराला उत्तर देताना अण्णा भाऊ म्हणाले, 'छत्रपती शिवाजी राजांच्या मराठी मुलखातून मी या ठिकाणी आलो आहे. मास्कोमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी राजांचा जयजयकार करणारे अण्णा भाऊ साठे होते.'फकिरा कादंबरीतील फकिरा म्हणतो, "'ही तलवार शिवाजीराजांनी माझ्या पूर्वजांना दिलेली तलवार आहे." गणपतीला वंदन करणारा गण बदलून, छत्रपती शिवाजी राजांना वंदन करणारा गण अण्णा भाऊंनी आणला. ते म्हणतात, 

“प्रथम मायभूच्या चरणा ।
छत्रपती शिवबा चरणा ।
स्मरणी गातो कवणा ।”

                                           छत्रपती शिवाजीराजे वरती अण्णा भाऊंची नितांत श्रद्धा होती. सर्वसामान्य रयतेचा वाली छत्रपती शिवाजी महाराज हे अण्णा भाऊ साठे यांचे प्रेरणास्थान होते.

                                           आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेला शिक्षण मिळावे. उत्तम आरोग्य मिळावे. दारिद्र्यातून मुक्तता व्हावी. सर्वांगीण विकासासाठी शांतता असावी. ही साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केला. अण्णा भाऊ साठे हे जनमाणसाचे कैवारी होते. स्वतः दुःख भोगून इथल्या कष्टकरी श्रमकरी वंचितांना आनंद मिळावा. यासाठी संघर्ष करणारा महायोद्धा म्हणजे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे आहेत. दीड दिवस शाळां शिकणाऱ्या या महान साहित्यिकाने मराठी भाषेचा कैवार घेतला. जनमाणसांच्या मराठी भाषेला साहित्यात आणले. ज्या भाषेतील कलाकृती अनुवादित होते ती भाषा वृद्धिंगत होते. मराठी भाषेचा कैवार घेऊन मराठी भाषेला वृद्धिंगत करणाऱ्या या महामानवाची जयंती 'मराठी भाषा दिन' म्हणून जर साजरा झाला, तर निश्चितच मराठी भाषेचा आणि अण्णा भाऊंचा सन्मानच ठरेल. अण्णा भाऊनां स्मृतिदिनानिमत्त विनम्र अभिवादन!

-डॉ. श्रीमंत कोकाटे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!