मनुवादी घरात घुसू लागलेत,बौद्धांनो आता तरी एक व्हा..!
दीक्षाभूमीवर भुयारी पार्किंगचे प्रकरण समोर आल्यावर समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर या कामाला स्थगिती मिळाली. मात्र, या ठिकाणी आरएसएसचे मनुवादी लोक कपट कारस्थान करून दीक्षाभूमीवर मालकी सांगू लागले आहेत. ज्यांना भाजपचा संपूर्ण पाठिंबा आहे. त्यांना अजूनही आपण विरोध केलेला नाही. दीक्षाभूमीचे मालक म्हणून त्यांचे नाव सातबारा उताऱ्यावर लागल्यावर आपली जनता जागी होणार आहे का? आणि आता तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन संस्थेला बुडवायचे काम आरएसएसच्या लोकांना ट्रस्टी बनवून केले जात आहे.
खैरलांजी हत्याकांड प्रकरणातील अट्रॉसिटीचे कलम बाजूला करून केस कमकुवत करणारा, न्यायालयात आरोपींची बाजू मांडणारा, भाजपचा दलाल पराभूत उमेदवार उज्वल निकम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ट्रस्टी कधीपासून झाला? तो पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या एका कार्यक्रमाचा विशेष निमंत्रित आहे. फुले, आंबेडकर यांनी भीक मागून शाळा, कॉलेज चालविले असे महामानवाबद्दल अपशब्द बोलणारा भाजपचा चंद्रकांत पाटील कार्यक्रमाचा सन्माननीय पाहुणा? हे काय चाललं आहे? रिपब्लिकन नेत्यांनी जसे ऐक्य धुळीला मिळवले तसे बौद्ध जनतेने ऐक्य सोडले आहे काय? नेते सत्तेसाठी लाळघोटे झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्यांना बौद्धांनी मते दिली, ते यावर कधीच बोलणार नाहीत. ते भाजपच्याच नाण्याची दुसरी बाजू आहेत. त्यामुळे दीक्षाभूमी, चैत्यभूमी ही आपली पवित्र आणि प्रेरणास्थळे आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी बाबासाहेबांनी गरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सुरू केली. त्या संस्थेला कुणाचा पायपोस राहिला नाही.
बाबासाहेबांचे वारसदार देखील त्या संस्थेवर नाहीत. बाबासाहेबांनी सुरू केलेली संस्था आपण मनुवादी भाजप आरएसएसच्या बगलबच्यांना आंदण दिली आहे का? या विरोधात बौद्ध जनता कधी एकत्रित येणार आहे का नाही? बाबासाहेब म्हणाले होते आपल्याला सत्ताधारी जमात बनायचे आहे. आपण भाजप, काँगेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांना मते देऊन सत्ताधारी जमात आणखी शेकडो पिढ्या देखील बनू शकणार नाही हे आपल्या बांधवांना समजत नाही का? पुन्हा गळ्यात मडके आणि पायाला झाडू बांधून फिरण्याची व्यवस्था यायची वाट बौद्ध बांधव बघत आहेत का?
आताच जागे झालो नाही, तर आपल्या मागे जी पिढी येत आहे ती कधीच आपल्याला माफ करणार नाही याची जाणीव ठेवा. कुणाच्याही मागे मेंढरासारखे जाण्यापेक्षा स्वाभिमानाने आपले राजकारण कधी करणार आहोत का नाही, याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
कोणताही पुरावा नसताना बाबासाहेबांच्या रक्ताचे वारसदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांना भाजपची बी टीम ठरवून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपला डोक्यावर घेणारे दलित ब्राह्मण आपण ओळखणार आहोत का नाही? ते वर्षानुवर्षे दलितांचे राजकारण उभारणार नाही याची दक्षता घेत आले आहेत. इतकेच नव्हे तर दलितांना सत्तेपासून रोखण्यासाठी ते सगळे मतभेद आणि विचारधारा बाजूला ठेवून एक होत आहेत. तुम्ही मात्र अमूक एक भाजपची ए टीम बी टीम म्हणून चर्चा करत बसलात आणि ते आपल्याच मतावर सत्तेत जावून आपलेच राजकारण आपल्याला शिकवत बसले आहेत. याची थोडी जरी लाज तुमच्या मनाला वाटत असेल तर आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या मतांची ताकद ओळखा. नाहीतर दारू आणि मटणाच्या चार दोन फोडांवर तुमच्या अनेक पिढ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी व्हायला वेळ लागणार नाही. आज त्यांनी आपल्या अस्मितांवर, आपल्या संस्थांवर आपले मनुवादी लोक बसवले आहेत. उद्या ते बाबासाहेब आंबेडकरांवर हक्क सांगायला कमी करणार नाहीत. अजूनही वेळ गेलेली नाही.
आता तुम्हाला निर्णायक लढाईसाठी सज्ज व्हायचे आहे. लढाई प्रत्येकवेळी ढाल तलवारीची नसते. आज लढाई विचारांची आहे. अस्तित्वाची आहे. आपल्यासाठी मैदानात उतरणारा योद्धा कोण आहे? आपल्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर आवाज उठवणारा सेनापती कोण आहे? हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भीमा कोरेगाव येथे एकतर्फी हल्ला झाला होता. त्यावेळी आपल्या जनतेसोबत खंबीरपणे उभा राहिलेला एकमेव नेता कोण? हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यामुळे वेळ अजूनही आपल्या हातात आहे तोपर्यंत जागे व्हा…एक व्हा…नेक व्हा…आणि ‘भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते…’ असे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी का म्हटले होते ते ओळखा. बाकी निर्णय तुमचा आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे तुम्हाला तुमचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आज निर्णय घेतला नाही, तर उद्या मनुवादी आपल्या घरात घुसून घराचा ताबा घेतील तेंव्हा तुम्हाला वाचवायला तुमच्या बाजूने उभे राहायला कुणी नसेल हे विसरू नका. जय भीम – जय संविधान!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत