भगवान बुद्धांची शिकवण – भाग ८८

शीलप्रचार आणि दु:खनिर्मितीबाबत टिका
दुःख हे निराशाजनक आहे
दुःखाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता, क्षोभ. सुरूवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता. नंतर त्याला यातना व खेद असा अर्थ प्राप्त झाला. हे दोन अर्थ एकमेकाहून फार भिन्न नव्हते. ते निकटसंबंधी होते. अशांततेमुळे यातना व खेद निर्माण होतो. लवकरच या शब्दाचा अर्थ सामाजिक व आर्थिक कारणामुळे होणा-या यातना व खेद असा झाला.
भगवान बुद्धांच्या एका प्रवचनावरून असे स्पष्ट दिसते की, दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव होती.
त्या प्रवचनात ते म्हणतात, “भिक्खूहो, गरीबी, कर्ज, उधारी, तगादा लावला जाणे, मारपीट होणे आणि बंधनात पडणे ही सर्व इहलोकातील स्वच्छंदी माणसाची दुःखे आहेत.”
“हया जगात गरीबी आणि कर्ज या फार दुःखद गोष्टी आहेत.”
या वरून असे ध्यानात येते की, भगवान बुद्धांची दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरूपाची आहे.
दुःख हे निराशाजनक आहे
आत्मा आणि पुनर्जन्म तत्त्वांचे टीकाकार यांना तथागत बुद्धांनी सांगितले की आत्मा नाही. त्यांनी सांगितले की, पुनर्जन्म आहे.
ज्यांना तथागत बुद्धांच्या ह्या दोन तत्त्वांची शिकवण परस्परविरोधी वाटली असे टीकाकार कमी नव्हते.
ते म्हणाले, जर आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असू शकेल?
खरे म्हणजे ह्यात काहीही परस्परविरोधी नाही. आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो.
आंब्याची कोय असते. कोयीतून वृक्ष निर्माण होतो. आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात.
हा आंब्याचा पुनर्जन्म आहे. पण इथे तर आत्म्याचे अस्तित्वच नाही. म्हणजे आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो.
विनाशवादी असल्याबद्दल टीका
एकदा श्रावस्तीतील जेतवनात तथागत बुद्धांचे वास्तव्य होते. तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की, अरिठ्ठ नावाचा एक भिक्खू, जी तथागतांची मते नाहीत ती त्यांची मते आहेत असे मानीत आहे.
तथागत हे विनाशवादी आहेत किंवा काय हे आरिठ्ठाच्या त्यांच्यासंबंधीच्या अनेक गैरमतांपैकी एक होते.
तथागतांनी अरिठ्ठला पाचारण केले. अरिठ्ठ आला. त्याला विचारल्यावर तो गप्प बसला.
तेव्हा तथागतांनी त्याला सांगितले, “काही श्रमण, ब्राम्हण चुकीने, गैरपद्धतीने, खोटेपणाने सत्याला झुगारुन मी विनाशवादी असल्याचा आरोप करतात. आणि विच्छेदाची, प्राणिमात्रांच्या समूळ नाशाची शिकवण देतो, असा माझ्यावर दोषारोप करतात. वस्तुतः माझी अशी शिकवण नाही.”
“मी पूर्वी आणि आता सतत सांगत आलो आहे की, दुःखाला अस्तित्व आहे आणि शेवटही आहे.”
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१०.३.२०२४
(संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-सहा, भाग-तीन)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत