दीक्षाभूमीचं चाललंय काय ?
देवेंद्र मेश्राम
दीक्षाभूमी ची एक समिती आहे. या समितीची नेमणूक शासन करतं. इतर अनेक समित्यांमधे निवडणूक होते. किमान लोकांतून नावे मागवली जातात. हीच एक समिती अशी आहे कि कुणाला समितीवर घेतले आहे हे नंतरच कळते. सध्याच्या समितीत राजेंद्र गवई, आगलावे हे लोक आहेत. पूर्वीच्या समितीने तर कधीही लोकाभिमुख होऊन कामे केलेली नाहीत.
दीक्षाभूमी वर्षातून तीन दिवस गजबजलेली असते.
१). धम्मचक्र पवत्तन दिवस २). १४ ऑक्टोबर ३). डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन
या तिन्ही दिवशी दीक्षाभूमीच्या अजूबाजूने बॅरीकेडींग केलं जातं. वाहने दीड दोन किमीच्या आसपास येऊ दिली जात नाहीत.
मग या परिस्थितीत दीक्षाभूमीला अंडरग्राऊंड पार्किंग कुणासाठी करत आहेत ?
कुणालाही कल्पना न देता मोठ मोठी यंत्रे लावून जमीन उकरली जात आहे. त्याने मोठ्या प्रमाणात कंपने निर्माण होऊन दीक्षाभूमीतल्या स्तूपाच्या बांधकामाला धोका उत्पन्न झालेला आहे. या बांधकामाला सूक्ष्म तडे गेलेले असतील तर त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट व्हायला हवे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून हेअरलाईन क्रॅक्स आहेत का हे पाहिले पाहीजे. अन्यथा पाच, दहा वर्षांनी स्तूपाची पडझड होण्याचा धोका संभवतो.
भारतात अन्य कुठल्याही धार्मिक / पर्यटन / ऐतिहासिक स्थळाच्या खाली अंडरग्राउंड पार्किंग पाहिलेले आहे का ?
ताजमहालच्या खाली पार्किंग आहे का ? पंढरपूरला विठ्ठल मंदीराखाली पार्किंग, हॉल कराल का ? अयोध्येचं राममंदीर, दिल्लीचं लोटस टेम्पल, कुतूबमिनार, शनिवारवाडा, आगाखान पॅलेस गांधी स्मारक, सेवाग्राम , साबरमती आश्रम, राजघाट , कोलकत्याचं सायन्स पार्क, बोटॅनिकल गार्डन अशी लाखो प्रसिद्ध ठिकाणं भारतात आहेत. यातल्या एका तरी ठिकाणी असा आगाऊ पणा केला आहे का ?
राजेंद्र गवई लोकांनी विचारलेल्या प्रश्नात अडकत गेले. आधी ते म्हणाले कि ज्या आर्किटेक्टने मुंबईच्या अरबी समुद्रातल्या शिवछत्रपती स्मारकाची रचना केली आहे त्यानेच इथेही रचना केली आहे. दुसर्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले कि धम्मचक्रपवत्तन दिनाच्या दिवशी इथे वाहने येऊ दिली जाणार नाहीत. जर असे असेल तर मग वाहनतळ कशाला ? फक्त २०४ कोटी रूपये खर्ची पाडायला ?
दीक्षाभूमीचे चार क्रमांकाचे फाटक उघडले जात नाही. आजूबाजूच्या मोकळ्या जमिनीमधून विस्तारासाठी जमीन मागितली जात नाही. गेली दह वर्षे भाजप सरकार प्रणित समिती काम करत आहे. त्याच्या आधी कॉंग्रेसने नेमलेल्या समित्या होत्या. या काळात दीक्षाभूमीचा विस्तार झालेला नाही. कॉटन रीसर्च ची जागा ही केंद्र सरकारची आहे असे भासवले गेले, पण ती राज्य शासनाची आहे.
असे असताना गेल्या ६८ वर्षात आजूनाजूची १५ कि २२ एकर जागा संपादन का झालेली नाही ?
या प्रश्नाचे उत्तर अर्थातच कॉंग्रेसने आधी दिले पाहीजे कारण सर्वाधिक काळ कॉंग्रेस सत्तेत होती. त्यांच्या काळात १९७८ साली सुरू झालेला स्तूप हा २५ वर्षात पूर्ण झाला. इतका काळ काम का चालले ? मुंबईत फक्त पाच वर्षात कित्येक फ्लायओव्हर्स उभे राहू शकले पण बौद्धांच्या बाबतीत वेळकाढूपणा होतो.
भाजपच्या काळात दीक्षाभूमीच्या मालकीबाबत संभ्रम निर्माण झाले आहेत.
सातबारा पाहिला असता दीक्षाभूमीचा उल्लेख झाडीझुडपे जंगल असे आहे आणि त्यावर एन आय टी चे नाव लागलेले आहे. नागपूर इंप्रूव्हमेंट ट्रस्ट हा नागपूरच्या विकासासाठी उभारलेला ट्रस्ट आहे. याचे नाव सातबार्याला कशाला ? हा सातबारा बौद्धांच्या किंवा आंबेडकर कुटुंबाच्या नावे का नाही ?
कॉंग्रेसच्या काळातच बौद्धगयेची मालकी कायदेशीर रितीने ब्राह्मणांची झाली. अनेकदा मागणी करूनही बौद्धगया बौद्धांच्या ताब्यात देत नाहीत. इथे हिंदू पद्धतीने पूजापाठ चालते.
आता दीक्षाभूमीची बारी.
दीक्षाभूमीवर आता मातीचे ढीग लागले आहेत. ते स्तूपापेक्षा प्रचंड आहेत. हे काम दोन वर्षे चालणार असे नियोजन आहे. स्तूपाच्या कामाचा अनुभव पाहता ते दहा वर्षे पण चालेल. दहा वर्षे या बांधकामामुळे लोक येऊ शकले नाहीत तर अकराव्या वर्षी लोकांना न येण्याची सवय तर नाही लागणार ना असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. गवईंकडे उत्तर नाही.
मुळात गवई कुटुंबाचा आणि चळवळीचा काहीही संबंध नाही. हा मनुष्य रा सु गवईंचा पुत्र आहे. रा सु गवई हे मूळचे कॉंग्रेसी. कॉंग्रेसने त्यांना रिपब्लिकन चळवळ ताब्यात घेण्यासाठी प्लाण्ट केले. आज रिपब्लिकन पक्षाची घटना आणि मालकी त्यांच्या ताब्यात आहे. उद्या त्यांनी रिपब्लिकन हे नाव लावता येणार नाही असा हुकूम कोर्टाकडून आणला कि जेव्हढे रिपब्लिकन पक्षाचे गट तट आहेत ते आपली ओळख हरवून बसतील. त्यांचे अस्तित्वच राहणार नाही. बसपाने एव्हढ्यासाठीच रिपब्लिकन हा शब्द वापरलेला नाही. वंचितने पण तो शहाणपणा दाखवलेला आहे.
बाबासाहेबांची राजकीय चळवळ तर कॉंग्रेसने अशी उध्वस्त केलीच आहे. आता दीक्षाभूमी द्वारे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक चळवळ पुसून टाकायचा घाट घातला जातोय का ही शंका आहे.
तुमच्या मनात जर काळं बेरं नव्हतं तर लोकांना विश्वासात घेऊन कामे करायची ना.
तर कॉंग्रेसचा बचाव करण्यासाठी बाळासाहेबांनी का पुढाकार घेऊ नये असा प्रश्न विचारताना हे सगळं तपासा. कॉंग्रेसचा माणूस समितीत आहे. कॉंग्रेसचे लोक विधानसभेत आणि संसदेत तुम्ही पाठवलेले आहेत. बाळासाहेबांचा, बसपाचा मनुष्य पाठवलेला नाही.
या दोन्ही ठिकाणी सभागृह दणाणून सोडण्याची अपेक्षा कॉंग्रेसकडून करणार का ? वरचा इतिहास बघता ते करतील का ?
आणि ते दीक्षाभूमीवर आंदोलन करतील ही तर फारच लांबची अपेक्षा झाली.
संविधान रोखायला त्यांना मत दिलेय ? अफवेवर विश्वास ठेवून आपली राजकीत ताकद त्यांच्या झोळीत टाकली. आपले घर पेटवून त्यांच्या घरात उजेड केलात. आता ते तुमचे प्रश्न मांडणार या विश्वासावर बसा. आपली सगळी विरासत त्यांच्याच कडे सोपवा आणि आंदोलने करायला आंबेडकर कुटुंबाला सांगा. किती पिढ्या त्यांच्या तुमच्यासाठी राबायला पाहीजेत रे ?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत