अटाळी आंबिवली येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना
कल्याण
धम्म संस्कृती रुजविण्याच्या कामी एक सांस्कृतिक केंद्र म्हणून बुद्ध विहारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावायला हवी, असे प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी आंबिवली येथे केले.
अटाळी आंबिवली येथे धम्ममेत्ता बुद्ध विहारात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर व प्रिती लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. दीपक मेश्राम यांच्या हस्ते झाली त्याप्रसंगी प्रा. देवडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आयुष्यमानीनी सभादिंडेताई या होत्या.
प्रा. आनंद देवडेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, धम्मदीक्षेप्रसंगी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भाषणाचं आपण काळजीपूर्वक अध्ययन आणि मनन चिंतन केल्यास धम्म अनुयायी म्हणून आचरण करताना कोणत्याही प्रकारचा संभ्रम उरणार नाही वा बौद्ध धम्मात भेसळ करण्याची कोणाची शहामतही होणार नाही.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रिं. दीपक मेश्राम म्हणाले की आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी समाज बनण्यासाठी लहान वयातच मुलांवर संस्कार करून त्यांना आर्थिक शिस्तीच्या सवयी लावायला हव्यात त्यादृष्टीने विहारांचा उपयोग व्हायला हवा.
प्रत्येक रविवारी विहारात उपस्थित राहणाऱ्या लहान मुलांपैकी आणि महिलांपैकी काहींनी उत्स्फूर्तपणे चार आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग व दस पारमितांची माहिती दिली.
बौद्धाचार्य विवेक गायकवाड यांच्या विधीसंचलनात संपन्न झालेल्या या बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष आयु. विशाल शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सरचिटणीस आयु. विकास पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
उपाध्यक्ष प्रकाश वाघ, कार्यालयीन सचिव प्रशांत शेळके यांच्यासह सर्वांनीच मेहनत घेतली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत