दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

सावित्रीमाईस पत्र ..

प्रिय,
सावित्रीमाई ,
जय जोती ! जय क्रांती !!

पत्र लिहीण्यास कारण की माई आज तुझा स्मृतीदिन.

माई, तु गरिबांची उपेक्षीतांची अखंड सेवा करत करत सर्वांना सोडुन गेलीस. प्लेगच्या साथीत अस्पृश्यांच्या कोवळ्या जीवाला पाठीवर घेवून दावाखाण्यात नेताना तुला प्लेग झाला आणि माई तू आम्हाला सोडुन गेलीस. तुझ्यासाठी प्रत्येक जीव मोलाचा होता. माणुस बनवण्याच्या लढाईत तु अख्खी हयात घालवलीस. कर्मठांच्या सणतण्यांच्या वस्तीत तू मानवतेचा दिप प्रज्वलित केलास. आज मात्र माजी अस्पृश्याजाती, भटक्या विमुक्त जमातींसाठी या देशात कुठलाही न्याय नाही.

विदर्भातील आर्वीचा ८ वर्षाचा मांगाचा पोरगा पारावर गेला आणि देव बाटवला म्हणून त्याला गरम स्टाइल च्या फर्शीवर ॲसिड टाकून भर दुपारी गग्न बसवून शिक्षा देण्यात आले. हे आमनवीय वर्तन बघून राज्याला देशाला शरमही वाटली नाही. तु गेल्यानंतर भेदाभेद तसाच राहिला जो तुला मिटवायचा होता. आजही गावखेड्यात जातीभेद अस्पृश्यता पाळली जाते.

तुझ्या सावित्रीच्या लेकी लै शिकून मोठ्या झाल्यात पण तु सुरु केलेली पहिली मुलींची शाळा मात्र लोक विसरुन गेले. भिडे वाडा दुरुस्त करायला तुझ्या लेकींना वेळ नाही. तुझ्या मुलींना आज शिक्षणात झेप घेण्याला मर्यादा उरली नाही. त्या अमर्याद झेप घेत आहेत. आज स्त्री म्हणून एकजण राष्ट्रपती सुद्धा झाली. पण माई सगळ्याजणी घोषा पडदा पाळतात. मोठ्ठा पदर घेवून पितृसत्ताक मुल्ये मिरवतात. तु तर एका गावात गरोदर स्त्रीची धिंड काढली असताना आख्ख्या गावाच्या विरोधात जावून त्या स्त्रीला संरक्षण दिले होतेस. तात्यांना पत्र लिहून वृत्तांत कळवला होतास. अन् आत्ताच्या तुझ्या लेकी किती घाबरतात ग माई.

तु तात्यांसाहेबांच्या बरोबर कार्यात सक्रिय राहिलीस. झिजलीस पण तेवत राहिलीस. तु कधी संपली नाहीस.पुरुन उरलीस. तुझ्या लेकी आज हाय खातात ग माई. त्या आत्महत्या करतात . हार मानतात, खंगतात, खचतात. विद्रोह आणि विरोध त्यांना माहिती नाही माई.

तु धर्मचिकीत्सा करनारी मुक्ता साळवे घडवलीस. आजच्या शाळेतील बाईच इतक्या देवभोळ्या भटाळलेल्या आहेत की त्या एकही मुक्ता आज घडवू शकत नाहीत.

तु हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या नोटीसीत बजावले होतेस की आमच्याकडे कुठलाही जातीभेद न करता स्पृश्य अस्पृश्य सर्व जातीच्या स्त्रीया एकाच टेबलावर बसतील.आज मात्र सर्वाधीक स्त्रीयाच जातीव्यवस्था अस्पृश्यता पाळतात.त्यांना आजूनही चाकोरी मोडायची नाहीए माई.

माई आज तु हवी होतीस, सर्वांना सरळ करायला . पितृसत्ताक मानसिकता बाळगणाऱ्या गुंडांना ठोकून काढायला.तु हवी होतीस विधवांचे पुनर्विवाह लावुन देण्यासाठी, अंतरजातीय लग्ने करणाऱ्याना संरक्षण देण्यासाठी आणि विवाहबाह्य संबंधातून झालेले आपत्ये सांभाळून मोठे करण्यासाठी.आग्ग माई येथे तर स्त्रीचा गर्भ नको म्हणून मायबाप चोरुन गर्भपात करतात.ते लहान गर्भाचे गोळे मिक्सरमध्ये काढुन कुत्र्याला खायला देणारा डॉक्टर येथे मुक्तपणे वावरतो. तरी समाजमन अस्वस्थ होत नाही.

तुझ्याप्रभावातून तेव्हा ताराबाई शिंदे तयार झाल्या, ग्रंथ लिहीला. पण आजचे शिक्षणच भटाळलेले आहे.आजच्या लेखीका ग्रामीणभागाच्या मनाचा ठाव घेवु शकलेल्या नाहीत.

कधीकधी वाटते तुझा लढा व्यर्थ तर नाही गेला न ? तु इतक्या खस्ता खाल्यास , आयुष्य पनाला लावलेस यांना त्याची आज जानीव तरी आहे का ग माई ?

शेन दगड कुणासाठी तु झेलले होतेस ?
हा बहुजन समाज , तुला विसरला तर नाही न माई ?

माई तु ये ..
लढ्यातून मोर्च्यातून विद्रोही बनुन ये ..
लिहायला वाचायला शिकणाऱ्या लहानग्या मुलीच्या भावी पिढीतून तु सावित्री बनुन ये ..
आजूबाजूला पसलेल्या तुझ्या आठवणी जिवंत ठेवणाऱ्या सत्यशोकांच्या मेळ्यातून माई तु ये ..
पुन्हा देश घडवायला , नवी पिढी घडवायला.

माई तुला स्मृती दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन …

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!