“गुणरत्न सदावर्तेंना त्यांच्या मालकांनी समज द्यावी”, मनोज जरांगे पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. जे सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं. मात्र त्यांचं आंदोलन सुरुच आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात दौरा केला. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटी या ठिकाणी सभा होणार आहे. या सभेच्या आधी त्यांनी गुणरत्न सदावर्तेंवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना अटक करावी अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली. ज्यानंतर आता गुणरत्न सदावर्तेंना त्यांच्या मालकांनी समज द्यावी असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यांचा हा अंगुलीनिर्देश देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे.
गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटील यांची सभा हिंसक होईल म्हणून त्यांना अटक करावी असं पत्र छत्रपती संभाजी नगर पोलिसांना लिहिलं. त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते हे कुणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे, चेल्यांना मी उत्तर देत नसतो असंही जरांगे पाटील म्हणाले.
“एक मराठा लाख मराठा घोषणा द्यायची आणि मराठ्यांना विरोध करायचा असं काही नेत्यांचं धोरण आहे. गोरगरीबांचं आरक्षण रद्द करुन त्यांच्या ताटात विष कसं कालवायचं हे त्या नेत्यांना माहित आहे. जे मराठाद्वेषी आहेत त्यांचेच चेले गुणरत्न सदावर्ते आहेत. आम्ही आमच्या हक्काची मागणी करतो आहोत. आम्ही काहीही वेगळी मागणी केलेली नाही. मुळात आम्ही कुणबी आहोत आणि कुणबी म्हणूनच आरक्षण मागतो आहोत. गुणरत्न सदावर्तेंनी खरंतर सरकारला जाब विचारला पाहिजे की शांततेत आंदोलन करणाऱ्या आमच्यासारख्या आंदोलकांवर लाठीचार्ज का केला?”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत