आघाडी सरकार आले म्हणून काय झाले? —
“विविध वाचनीय लेख” या फेसबुक ग्रुपवर हरिहर सारंग यांचा लेख
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे नेते विश्वासार्ह आहेत, असे मानता येणार नाही. त्यांचे हितसंबंध फक्त स्थानिक राजकारणात गुंतलेले आहेत. आपल्यापुरते संकुचित राजकारण करणाऱ्या या नेत्यांचे, आपापल्या राज्याची सत्ता राखणे, हेच मुख्य उद्दिष्ट आहे. अखिल देशाची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे किंवा व्हायला हवी, याविषयी त्यांना आपल्या सत्तेपुढे फारसे सोयरसुतक नाही. आपली राज्यातील सत्ता राखण्यासाठी त्यांना केंद्रसरकारची मदत हवी आहे. त्यासाठी ते मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सहकार्यच करतील. त्यांचे सत्तेचे उद्दिष्ट पूर्ण होत असेल, तर ते मोदी आणि भाजपला त्यांचा अजेंडा राबविण्यात फारसा अडथळा करणार नाहीत. भाजप वरवर तरी या दोघांचा मान राखेल. त्यांच्या राज्यासाठी हवी ती मदतही करील. तेवढ्यावर हे नेते समाधान मनातील. आणि भाजप निर्धास्तपणे आपला अजेंडा राबविण्याचे काम करील. हे दोन नेते लोकशाही, धर्मनिरपेक्षता मानणारे असले तरी या तत्त्वांसाठी सत्तेचा त्याग करतील, असे वाटत नाही. त्यांच्या राजकारणाचा आधार जरी उपेक्षित वर्ग राहिला असेल, तरीही त्यांचे हे राजकारण त्यांच्या राज्यापुरतेच मर्यादित राहील.
वर वर हे सरकार एनडीएचे सरकार म्हणूनच दाखविण्यात येईल. तेवढ्यातच या दोन नेत्यांना समाधानी राहावे लागेल. भाजप मात्र एनडीए सरकारच्या नावाने, त्यांना जे करावयाचे असेल, ते करीत राहतील. आतापर्यंतची त्यांच्या नेत्यांची वक्तव्ये आणि त्यांनी बनविलेले मंत्रिमंडळ हे त्यांची पूर्वीचीच वाटचाल पुढे चालू राहणार असल्याचे सुचवितात. त्यामुळे एकपक्षीय सरकारच्या ऐवजी आलेल्या आघाडी सरकारमुळे काही बदल होईल, हा भ्रमच ठरण्याची शक्यता आहे.
आता भाजप या प्रादेशिक पक्षांचा सहारा घेऊन केंद्रीय सत्तेच्या आधारे त्या राज्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत राहील, यात शंका बाळगण्याचे कारण नाही.
त्यांच्यात संयमाची मुळीच कमतरता नाही, हे निश्चित समजावे.
नवीन पटनायक हे ओरीसाचे नेते, नायडू आणि नितीश कुमार यांच्याच जातीचे आहेत. परंतु ते कोणताही आरडाओरडा न करता शांतपणे आपले प्रादेशिक राजकारण करून आपल्या हितसंबंधांची काळजी घेत असत. परंतु भाजपने योग्य वेळी संधी साधून त्यांना सत्तेबाहेर केलेच. त्यात काही गैर होते, असेही मानण्याचे कारण नाही. आता या दोन नेत्यांनाही भाजपाच्या याच डावपेचांचा सामना करावा लागेल
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत