‘बौद्धांना संविधान बदलण्याची भीती दाखवली म्हणून बौद्धांनी मते दिली नाहीत.-चंद्रशेखर बावनकुळे
शांताराम ओंकार निकम
आज दिनांक ५ जून २०२४ रोजी भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला कमी जागा मिळाल्याचे विश्लेषण केले आहे.
त्यांनी म्हटले आहे,’महायुतीला महाराष्ट्रात कमी जागा मिळण्याचे कारण म्हणजे, महाविकास आघाडीने केलेले घाणेरडे राजकारण,त्यात त्यांनी अनेक कारणांमध्ये एक कारण दिले की ,’बौद्धांना संविधान बदलण्याची भीती दाखवली म्हणून बौद्धांनी मते दिली नाहीत.’
म्हणजे संविधान काय फक्त बौद्धांसाठीच आहे का?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तबेतीची काळजी न करता दिवसरात्र मेहनत करून जे संविधान लिहिले ते काय फक्त बौद्धांसाठीच आहे काय?
९ डिसेंबर १९४६ रोजी भारताच्या संविधान सभेची निर्मिती झाली त्यावेळी भारताची फाळणी झाली नव्हती.
भारताला इंग्रजांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी जितकी मेहनत हिंदूंनी घेतली तितकीच मेहनत मुस्लिमांनीसुद्धा घेतली आहे. स्वतंत्र चळवळीत विविध भागात मुस्लिम नेतेसुद्धा अग्रेसर होते हे विसरून चालणार नाही.
‘सारे जहाँसे अच्छा हिंदुस्ता हमारा’ हे गीत लिहिणारे महंमद इकबालसुद्धा स्वतंत्र चळवळीत होते. पण नंतर त्यांनीच मुस्लिम नेंत्यांच्या डोक्यात पाकिस्थानचे खुळ घुसवून दिले.हे वेगळे.
संविधान सभेची निर्मिती झाली तेंव्हा भारत एकसंघ होता.त्यामुळे घटना समितीत प्रांतानुसार ३८९ सदस्य होते .ते भारताची फाळणी होईपर्यंत म्हणजे डिसेंबर १९४६ ते जून १९४७ पर्यंत.या सदस्यांमध्ये काँग्रेसचे २०८ सदस्य,मुस्लिम लीगचे ७८ व इतर १५ व ९३ संस्थानिक होते.
भारताची फाळणी झाली आणि ७८ मुस्लिम सदस्य व इतर १२ सदस्य पाकिस्थान मध्ये गेल्यामुळे ते वगळले जाऊन उरलेले हिंदू व भारतात राहू इच्छिणारे मुस्लिम असे २९९ सदस्य राहिले .ते घटना स्वीकारेपर्यंत होते.
घटना समितीत एकूण १७ समित्या होत्या त्यातील महत्वाची समिती मसुदा समिती होती.त्याचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.
म्हणजे देशाची घटना महाराने लिहिली याचे दुःख असू शकते.पेशवाईत ज्यांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मडके असायचे,ज्यांची सावली सुद्धा वर्ज्य होती, त्याच जातीतील एक महान नायक भारताची घटना लिहितात,हे कसे सहन केले जाईल.
मसुदा समितीतील ३८९ सदस्यांनी सभेत मांडलेल्या ७६२५ सूचना दुरुस्त्यांपैकी २४७३ सूचना,दुरुस्त्या निकाली काढण्यात आल्या.त्या सर्व ३९५ अनुच्छेद,२२ भाग,८ अनुसूचित बसवण्यात आल्या.
घटना निर्माण करत असताना बाबासाहेबांना खूप त्रास झाला.सदस्य अनेक खोचक प्रश्न विचारत होते, त्यांना बाबासाहेब अभ्यासपूर्ण उत्तर देऊन तो मुद्दा योग्य की अयोग्य ठरवत होते.
घटनेचे आयुष्य ७ वर्षे असते असे।म्हणतात.अनेक देशांच्या घटना नामशेष झाल्या,त्याऐवजी दुसऱ्या अमलात आल्या .पण बाबासाहेबांनी बनवलेली घटना आज ७४ वर्षे होऊनही आहे तशीच आहे.इतकेच नव्हे विविध जाती धर्मात विभागलेले १४० कोटी लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत.
भारतातील सर्व जाती धर्मांपैकी सर्वात मोठा धर्म हिंदू असून तो १९११ च्या जनगणनेनुसार ७९.८℅ आहे.
असे असूनही उरलेल्या २०.२% लोकांमुळे हा देश अधिकृत हिंदू होऊ शकत नाही.
घटना सबळ नसती तर भारत केंव्हाच हिंदुस्थान झाला असता.घटनेच्या ऐवजी मनुस्मृती अमलात आणली गेली असती.
आज २०.२% इतर धर्मीय लोक भारतात आनंदाने राहतात ते केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळेच.
आणि त्याचेच दुःख ७८.८% टक्क्यांचे नेतृत्व करणारांना आहे.
चंद्रशेखर बावनकुळे जेंव्हा बोलून गेले की ,बौद्धांना घाबरवण्यासाठी संविधान बदलले जाण्याची भीती दाखवली गेली आणि बौद्धांची मते महायुतीकडून तोडली गेली.
बावनकुळे हे का विसरतात की,कितीतरी बौद्ध नेते महायुतीबरोबर आहेत.देशाचे प्रधानमंत्री।मोदीच झाले पाहिजे असेही त्यांना वाटते,त्यांना वाटते म्हणून त्यांच्या अनुयायांना वाटणे साहजिकच आहे,नाही का?
महायुतीला मते कमी मिळाली त्याची कारणे वेगळी आहेत, ती शोधा.
निव्वळ बौद्धांच्या मतांमुळे महायुतीच्या जागा कमी झाल्या नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवा.
१९११ च्या जनगणनेनुसार संपूर्ण भारतातील बौद्धांची लोकसंख्या ०.७% म्हणजे ८५ लाख लोकसंख्या बौद्धांची आहे.तर इतर अहवालानुसार ५%ते६% इतकी बौद्धांची लोकसंख्या आहे म्हणजेच ६ ते ७ कोटी लोक बौद्ध आहेत
आणि हो संविधान बाबासाहेबांनी लिहिले म्हणून ते बौद्धांचे नाही तर संपूर्ण देशाचे आहे. जी घटना राबवली जाते ती काय फक्त बौद्धांपूर्तीच आहे का? संपूर्ण देशातील नागरिकांना त्यांचा फायदा होत नाही का?
मग संविधान बदलले गेले तर एकट्या बौद्धांनाच दुःख का झाले पाहिजे? हे जरी खरे असले तरी बौद्धांनाच खरे दुःख होते हे वास्तव आहे. दिल्लीत संविधान जाळले गेले तेंव्हा बौद्धच पेटून उठला होता हेही खरेच आहे.
खरे दुःख हे आहे की,
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली तेंव्हा ते हिंदू महार होते, हिंदू महाराने लिहिलेली घटना अनेकांना खटकत असावी.
बाबासाहेब ज्या जातीत जन्माला आले त्या जातीतील लोकांना हीन वागणूक दिली जायची, शिक्षणाचा अधिकार नव्हता, पेशवाईत जमिनीवर उमटलेली पावलं पुसण्यासाठी कमरेला झाडू आणि थुंकी जमिनीवर पडू नये म्हणून गळ्यात मडके वागवावे लागत असे ,आणि त्याच जातीतील एक महानायक देशाची घटना लिहितो आणि त्या घटनेबरहुकूम वागावे लागते.
यापेक्षा मोठे दुःख ते काय असेल?
हे मनात खदखदणारे दुःख कधीतरी अशावेळी अचानक बाहेर येणारच.
शांताराम ओंकार निकम
५ जून २०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत