महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

संविधान पूजन की अंमल ?

रणजित मेश्राम

        

     भारताचे संविधान हा भजनपूजनाचा विषय आहे का ? अजिबात नाही. सरळसरळ अंमलबजावणीचा विषय आहे. तो आस्थाश्रध्देचाही विषय नाही. जीवनमरणाचा नक्की आहे. अर्थात पूजनाचा नाही. पालनाचा आहे. 

तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची घोषणा होताच, नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी, संविधान या जाडजूड पुस्तकाचे, समर्थित खासदारांपूढे ‘मस्तकपूजन’ केले.

     संविधान हे माझ्यासाठी 'पूज्य' आहे असे ह्या महत्तमांना सांगायचे असेल. ते सांगणे तसे फोटोसह जगभर पाठवले गेले. इथेच थांबले नाहीत. लगेच ट्वीट केले, 'माझ्यासारखा गरीबीतून आलेला गरीबाचा मुलगा, केवळ संविधानामुळे पंतप्रधान होऊ शकला'. 

प्रधानमंत्र्यांची संविधानाप्रती ही कृतज्ञता, ‘हिंदुत्वामुळे मी ओबीसी झालो अन् गरीब राहीलो अशा वळणाची निश्चितच नाही. ती गरीब-श्रीमंत अशा ढोबळ वळणाची आहे.’

     या महत्तमांना असा नाद आहे. २०१९ ला सत्ता हाती येताच, संसदपूजन केले होते. संसदभवनात आल्याआल्या पायऱ्यांवर लोटांगण घातले. प्रतिकात असे ते रमत असतात.

मधल्या काळात नव्या संसदभवनाचे उदघाटनात साधू व सेंगोर आणले होते. धर्मसंसदेचा आभास निर्माण केला गेला.

     यावेळी संविधान पुस्तकाचे 'मथ्थापूजन' झाले. यालाही कारणे असावीत.

यंदाच्या निवडणुकीत संविधान हा कळीचा मुद्दा होता. त्याला अनेक अंगे होती. म्हणून तो ‘मथ्था विषय’ होत नाही.
या देशाने काय करावे, काय करू नये याची कटिबद्धता या संविधानात आहे. ते लोकशाही राज्यव्यवस्थेचे ‘रोडमॅप’ आहे. प्रतिक नाही. देशाला तसतसे न्यावे हे मान्यसांगणे आहे. ते संपूर्ण भारतीयांचे, भारतीयांसाठी आहे.

     संसदेत, देशात काय घडले ते लपून नाही. सारे उघड आहे. लोकशाही व संविधान परस्परपूरक असतात. संसदेची, संविधानाची किती प्रतिष्ठा पाळली गेली, हेही स्पष्ट दिसले. 

लोकशाही की पक्षशाही की एकशाही हेही दिसलेय !

     राजकीय सत्ता प्राप्त करण्यास हिंदुत्व, धर्मत्व, बहुसंख्यकत्व, देवत्व, सनातनत्व, प्रतिकत्व, द्वेषत्व, आक्रमकत्व या संज्ञा अधू ठरल्यात.

यंदाच्या लोकसभा निकालाने, माणसे ही केवळ मत देण्यासाठी नसतात. मताधिकारी असतात.
‘जो रोजी रोटी की बात करेगा वो लोगोंपर राज करेगा’ या संज्ञेला त्यांनीच मुख्य अजेंड्यावर आणायला बाध्य केले.

     यापूढे आम्हाला 'धर्मगृहित धरु नका' असा स्पष्ट इशारा दिला. आधी आमच्या जगण्याचा आधी विचार करा असा जणू आदेशच दिला. 'माणसाचे जगणे महत्वाचे' याला महत्त्व आणले.

धर्मवस्त्र चढवून जगण्याचे वस्त्रहरण होणे बहुसंख्य भारतीयांना पटले नाही.त्यांनी ताकदीने हे सांगायला, त्यांना मिळालेला ‘नकाराधिकार’ (veto power) वापरला.
अर्थात, आज मापात आणले, उद्या कोमात टाकू शकतील !

० रणजित मेश्राम

????

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!