हे मोदी समर्थका, ऐक. १० वर्षं तुझं ऐकत आलो. आज तू ऐक.
म. जो.
तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनतीलही, पण “ये जीत भी कोई जीत है” असं तुला वाटतंय याची खात्री आहे.
पण तुला ठाऊक नसलेली एक गोष्ट ही, की आजच्या या परिस्थितीला तू जबाबदार आहेस – थेट जबाबदर!
कधीकाळी अटलचा असलेला पक्ष मोदी-शहांनी टोटल उलट्या दिशेला नेऊन ठेवला. तुझ्या डोळ्यादेखत – नव्हे, तुझ्या संमतीने.
“अश्या फोडाफोडीने कमावलेल्या सत्तेला मी चिमट्याने सुद्धा स्पर्श करणार नाही” असं म्हणाले होते अटल. तू तेव्हाही टाळ्या वाजवल्यास, आणि आज, फक्त “तश्या”च पद्धतीने सत्ता मिळवू शकणाऱ्या मोदी-शहा आणि त्यांच्या नादी लागलेल्या फडणवीसांना तू टाळ्या वाजवत चाणक्य म्हणू लागलास. ही विसंगती इतरांना दिसत होती.
काल-परवाचे हजारो कोटींचे घोटाळेबाज पायघड्यांवर चालत येऊन तुझ्या डोक्यावर येऊन बसले तरी तू हूं की चूं केलं नाहीस.
PM Cares Fund आणि Electoral Bond ची माहिती जीवापाड तडफड करून लपवू पाहणारे अजून काय काय लपवत असतील अशी तुला शंका आली नाही.
कोण्या एका मुसलमान पोरावर दगडफेकीचा फक्त आरोप आहे, म्हणून त्याच्या अक्ख्या कुटुंबाच्या घरादारावर नांगर फिरवणाऱ्या घोर अन्यायाला तू टाळ्या पिटत “बुलडोझर न्याय” आणि रामराज्य म्हणून गौरवलंस.
“जश्न-ए-रिवाझ” हा साधा शब्द तुला खटकू लागला तेव्हा, कुठल्याही न्यूनगंडाशिवाय, “उर्दू तो मेरे ही मुल्क की जुबां है, तो मैं वो क्यूँ न बोलू?” असं ठामपणे म्हणणाऱ्या सुषमाला तू विसरला आहेस, हे जाणवायला लागलं.
साधेपणाने घरच्या देव्हाऱ्यात रामनवमी साजरी करण्याच्या ऐवजी, DJ वर आचकट-विचकट आणि शिव्याशाप देणारी गाणी लावून मशिदीच्या बाहेर मुद्दाम गोंगाट करणं याला तुझा आक्षेप दिसला नाही.
जिच्या आईसमोर तिचा स्वतःचा, आणि तिच्या डोळ्यासमोर तिच्या आईचा बलात्कार झाला, जिच्या डोळ्यादेखत तिच्या पोराला दगडावर आपटून मारलं, त्या बिल्किसच्या दोषींना गुजरात निवडणुकीच्या तोंडावर सोडून देण्याचा आदेश केंद्रीय गृहखात्यातून येतो … त्या दोषींचा गावात सत्कार होतो … सत्कार करण्याऱ्या कुटुंबाला निवडणुकीचं तिकीट मिळतं … आणि हे सगळं होत असताना ३०० पार संख्या असलेले खासदार, किंवा महिला व बालकल्याण खात्याची मंत्री, किंवा ५५ हजार शाखा असलेल्या मातृसंस्थेतील एकालाही याविरुद्ध काही बोलावंसं वाटत नाही – या नैतिक दिवाळखोरीची तुला टोकाची घृणा वाटली नाही.
नपेक्षा तू हे विचारलं नसतंस – की “यांना पर्याय कोण” म्हणून.
आणि तुमचा तो “पर्याय” तरी त्याची योग्यता कशी सिद्ध करत होता रोज?
… तर रोज उठून भरल्या ताटावर नेहरूंच्या नावाने गळे काढत होता … “क्लाउड है, तो बेनेफिट मिलेगा” असे हास्यास्पद बाळबोध सल्ले वायुदलाला देत होता … व्हाईट हाऊसमध्ये बायडनशी हिंदीतून बोलतानासुद्धा डायरीतून वाचून दाखवत होता … आख्खं मणिपूर जळत असताना गपगुमान राहण्याचा अचंबित करणारा बेजबाबदारपणा दाखवत होता … दीड अब्ज नागरिकांना “चीनमधून कोणी आलंच नाही”, असं धडधडीत खोटं सांगत होता … “गांधीजींना सिनेमाच्या आधी कोणी ओळखत नव्हतं” अशी खुळचट विधान करत होता … उत्तर प्रदेशातली एक सीट वाचवण्यासाठी, आतंरराष्ट्रीय कीर्तीच्या महिला मल्लांवर त्यांची पदकं सोडून देण्याची वेळ आणत होता … मंगलयानाच्या लँडिंगच्या मंगलप्रसंगीसुद्धा स्वतःचीच छबी झळकेल अशी वखवख दाखवत होता … रेल्वे स्टेशनवर आपलेच हजारो कटआउट्स लावून निर्लज्ज … मागे टाकत होता … “वॉर रुकवा दी” अशी बालिश बढाई मारत होता … आपण एका देशाचे पंतप्रधान आहोत हे विसरून २० कोटी मुसलमानांना सरसकट घुसखोर म्हणत होता … आणि प्रचार संपलेला असतानाही सर्व नियम-संकेत धाब्यावर बसवून डझनावारी कॅमेर्यांसमोर बक-ध्यान करत होता …
तरी तुमचा प्रश्न एकच – याला पर्याय कोण!?
एकेकाळी स्वतःला “प्रधानसेवक” आणि “चौकीदार” म्हणवणारा जेव्हा स्वतःला “नॉन-बायोलॉजिकल ईश्वर-प्रेषित” म्हणवू लागला, तेव्हाही तुम्हाला असं वाटलं नाही की आपली निवड चुकते आहे म्हणून. “अबकी बार ४०० पार” म्हणत तो स्वतःच विरोधकांचा स्टार-प्रचारक “पप्पू” व्हायला लागलाय हे तुम्हाला लक्षात आलं नाही.
पण तरी तुम्ही म्हणाल की आजच्या निकालाला तुम्ही जबाबदार कसे?
ते यासाठी, की तुमचं हे वहावत जाणं इतरांना धडकी भरवणारं होतं आणि त्यामुळेच त्यांचा निश्चय पक्का झाला.
फाशीवर जाताना आपल्या आईचा कान चावून तिला जाब विचारणाऱ्या त्या गुन्हेगारासारखं मोदीही आज तुम्हाला म्हणतील: “मला आधीच समज दिली असतीत, तर ही वेळ आपल्यावर न येती आज!”
म्हणून तुम्ही जबाबदार! ही जबाबदारी टाळू नका आता.
- म. जो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत