अमरावतीनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

अशी फिरवली बच्चू कडू यांनी आमरावतीची निवडणूक …

संजय खोडके व तुषार भारतीय

अमरावतीच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांची भूमिका अतिशय निर्णायक ठरली. भाजपने नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर करताच त्या नावाला प्रखर विरोध करत ‘प्रहार’ आपला उमेदवार या निवडणुकीत उभा करेल आणि कुठल्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती आणि जीवाचे रान करत ती खरी करून दाखवली.

नवनीत राणा यांची उमेदवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केली होती. त्या दोघांनीही आपली ताकत राणांच्या मागे उभी केली होती. असे असताना, महायुतीत सामील असतानाही बच्चू कडू यांनी छातीला माती लावली आणि नवनीत राणा यांना हनुमान चालीसेचा नियमित पाठ करण्यासाठी घरी बसविले.

निवडणुकीदरम्यान बच्चू कडू यांच्यावर अनेक दबावतंत्राचा वापर झाला पण त्यांनी कोणालाही भीक घातली नाही. आता निवडणूक निकालानंतर जे आकडे आता समोर आले आहेत ते तपासले तर लक्षात येतं की प्रहारचा, बच्चू कडू यांचा उमेदवार रिंगणात नसता आणि नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखडे अशी थेट लढत झाली असती तर राणा आरामात मोठ्या फरकाने विजयी झाल्या असत्या. प्रहारचे दिनेश बूब जर रिंगणात नसते तर त्यांनी घेतलेल्या ८५,००० मतांपैकी ९० टक्के मते नवनीत राणांच्या पारड्यात गेली असती.

अमरावती जिल्हा हा म्हणायला गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, डॉ. पंजाबराव देशमुखांचा जिल्हा. मात्र येथील येथील जातीय पेच जटिल आहेत. अपवाद वगळता येथील बहुतांशी सवर्ण मतदार हे बौद्ध उमेदवाराला मतदान करत नाही, हा पूर्वेतिहास लक्षात घेऊन बच्चू कडू यांनी दिनेश बूब यांना प्रहारची उमेदवारी दिली.

अमरावती मतदारसंघात नवनीत राणा आणि एकंदरीतच ‘राणा अजिबात नको’ म्हणणारे हजारो मतदार आहेत. मात्र त्यांना काँग्रेस वा बौद्ध समाजाचा उमेदवारही चालत नाही, हे वास्तव होतं . भाजप व संघ परिवारातही राणांच्या उमेदवारीबाबत नाराज असणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी ते कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला मतदान करतील, हे शक्यच नव्हते. अशांना आश्वासक पर्याय देणे आवश्यक होते, तो बच्चू कडू यांनी दिला. निवडणुकीच्या रिंगणात उतरताना केवळ १५ दिवसात निवडणूक जिंकणे शक्य नाही हे बच्चू कडू यांना पहिल्या दिवसापासून माहीत होते आणि दिनेश बूब यांना सुद्धा . मात्र राणांना धडा शिकवण्यासाठी बच्चू कडू यानी केवळ मेहनतच घेतली नाही तर दिवसागणिक निवडणुकीचे बदलणारे रंग लक्षात घेऊन कधी आक्रमक तर कधी अतिशय शांत डोक्याने चाली रचत राणाना मात दिली.

बच्चू कडूसाठी ही कसरत अजिबात सोपी नव्हती. एकीकडे महाशक्तीकडून प्रचंड दडपण, दुसरीकडे त्यांच्या भूमिकेबाबत घेतला जाणारा संशय, पैशाची कमतरता अशा अनेक अडचणी होत्या.

देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून नवनीत राणा यांना मदत व्हावी, त्या विजयी व्हाव्या या हेतूने बच्चू कडू यांनी प्रहारचा उमेदवार उतरविला असे अनेकांना वाटत होते. अमरावतीची सामाजिक घडण ज्यांना माहीत नाही असे अमरावतीबाहेरील राजकीय विश्लेषक व मुंबई-पुण्याच्या अनेक संपादक-पत्रकार मित्रांनाही तसा संशय होता. (गुवाहाटीला गेल्यापासून बच्चू कडू यांची विश्वासाहर्ता कमी झाली , हेही त्या संशयामागील कारण होते.)

अशा परिस्थितीत बच्चू कडू नवनीत राणा यांना पराभूत करण्याची भीष्म प्रतिज्ञा करून बसले होते. बच्चू कडू आणि त्यांच्या टीमचं एक वैशिट्य आहे. एकदा एखादी गोष्ट ठरवली की जीव गेला तरी बेहत्तर… या बाण्याने ते लढतात. अमरावतीत निवडणुकीबाबत ते त्याच लढावू बाण्याने उतरले. प्रहारमध्ये बच्चू कडू हे एकमेव स्टार प्रचारक होते . प्रचाराच्या १५-२० दिवसात त्यांनी पायाला भिंगरी लावत संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. बच्चू कडू यांनी एकटयाने ७५ पेक्षा अधिक सभा घेतल्या. या सभांमध्ये राणा दाम्पत्याची नौटंकी , राणांची लबाडी याबाबत अतिशय आक्रमकतेने ते बोलत . काँग्रेस आणि काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्याबाबत बोलणं मात्र ते टाळत होते . आपलं टार्गेट काय आहे , याचं पुरेपूर भान त्यांना होतं.

बच्चू कडू मैदानात लढत असताना त्यांची टीम पडद्यामागून कामाला लागली होती. कडू यांची सोशल मीडिया टीम एवढी अफलातून आहे की त्यांनी पहिल्या दिवसापासून राणांना बॅकफूटवर आणले. (बच्चू कडू यांची सोशल मीडिया टीम हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे) रोज अतिशय कल्पक असे नवनवीन व्हिडीओ, मिम्स बनवून त्यांनी राणांना बेजार केले. राणांचे जुने Video शोधून काढून ते Viral केले जात होते. प्रहारकडून रोज सकाळी असा काही मुद्दा उपस्थित केला जात असे की पुढे दिवसभर त्यावर खुलासे देण्यातच राणांचा वेळ वाया जात असे. दर्यापूरच्या देवेंद्र फडणवीसांच्या आणि अमित शहा यांच्या अमरावतीतील सभेला राणा यांनी पैसे वाटून कशी गर्दी जमवली याचे कडू यांच्या सोशल मीडिया टीमने स्टिंग ऑपरेशन करून राणांची चांगलीच फजिती गेली . ते पैसे वाटपाचे व्हिडिओ दोन, तीन दिवस सोशल मीडियात फिरत होते . कडू यांच्या टीमने राणा यांना मतदारांत डॅमेज करण्याची कुठलीही संधी सोडली नाही ( अर्थात राणा दाम्पत्याने अशा संधी वारंवार उपलब्ध करून दिल्यात, हा भाग वेगळा!)

काँग्रेस नवनीत राणांविरोधात ताकतीने लढली आणि जिंकली पण त्यांच्या विरोधात अभूतपूर्व वातावरण निर्मिती केली ती बच्चू कडू यांनीच. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायन्स कोअर मैदानाच्या परवानगीवरून जे वादंग झाले त्यात संपूर्ण दिवस बच्चू कडू लाईम लाईटमध्ये होते. राणांची प्रत्येक कृती त्यांच्याविरोधात जाईल, अशी व्यूहरचना प्रहारने आखली होती, त्यात ते अपेक्षेबाहेर यशस्वी ठरले. त्यादिवशी अमित शहा यांच्या सभेला जेवढे लोक होते , त्यापेक्षा चारपट गर्दी बच्चू कडू यांच्या शहरातील रॅलीला आणि सभेला होती.

शेवटच्या दोन दिवसात राणा जातीय ध्रुवीकरण करत आहेत , विशेषतः अचलपूर , दर्यापूरमध्ये ‘हिंदू दलित विरुद्ध बौद्ध दलित’ असे रूप लढतीला देण्याचा प्रयत्न होत आहे हे लक्षात येताच बच्चू कडू यांनी आपलं राजकारण, कार्यकर्त्यांचा विश्वास पणाला लावून प्रहारची आपली हक्काची मते शेवटच्या काही तासांत काँग्रेसच्या पारड्यात टाकण्याचा निर्णय घेतला. हे सोपे नव्हते. यामुळे मोठी गुंतागुंत आणि निवडणुकीनंतर कडू यांच्या अचलपूर मतदारसंघातील प्रहारच्या ताकतीबाबत चुकीचे कयास लावण्याचा धोका होता. मात्र आपल्या कोअर टीमला विश्वासात घेऊन बच्चू कडू यांनी तो स्वीकारला. मतांचा एक मोठा गठ्ठा काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्याकडे वळवण्यात आला.

आज निकालाचे आकडे तपासल्यानंतर ती मूव्ह किती महत्त्वपूर्ण होती, हे लक्षात येते. मेहनत, करिश्मा, व्यूहरचना आणि आपली पुण्याई पणाला लावून बच्चू कडू यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून दाखवली. यानिमित्ताने एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. गुवाहाटीला गेल्यामुळे बच्चू कडू यांच्या प्रतिमेभोवती जे किटाळ निर्माण झालं होतं, ते या निवडणुकीतील बाणेदार भूमिकेने धुवून निघालं आहे. बच्चू कडू पुन्हा हीरो झाले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!