मुख्य पान

लोकसभेच्या निवडणुका संपल्या. पुढे काय…???

आर.के.जुमळे

नेहमीप्रमाणे हीही लोकसभेची निवडणूक आंबेडकरी जनतेच्या हातातून निसटून गेली आहे. यांचं जागरूक आंबेडकरी जनतेला वैषम्य वाटणं स्वाभाविकच आहे.

पण हातावर हात ठेऊन बसायची ही वेळ नाही. रात्र वैऱ्याची आहे. आपण यापुढे तरी सजग व्हायला पाहिजे. ‘जागृतीचा दिवा विझायला नको, तो सतत तेवत ठेवला पाहिजे’ या उपदेशाचा बाळकडू आपल्या महामानवांनी आपल्याला पाजलं आहे.

प्रतिगामी प्रवृत्तींना रोखण्याची ताकद आणि उर्मी केवळ आणि केवळ आंबेडकरी समाजातच सामावलेली आहे, ही गोष्ट आपण कधीच विसरायला नको.

महाराष्ट्रात आता तीन महिन्यांत विधानसभेची निवडणूक येऊ घातली आहे. त्यादृष्टीने समाजातील जबाबदार बुद्धीवंत, विचारवंत वर्गांनी अत्यंत सखोलपणे कस लावून विचारविनिमय करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

हे खरं आहे की, आपला समाज गटा-तटांमध्येच नाही तर इतरही लहान लहान पक्षांमध्येही विखुरला गेला आहे. त्यामुळे आपणच आपली ताकद कमी करून टाकली आहे.

आपला समाजच जर एकसंघ नसेल, तर इतर समाज आपल्याला कशी मदत करणार? हाही मोठा प्रश्न आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्यामधील विखुरलेले गट आणि पक्ष एकत्र करणे गरजेचे आहे. त्याशिवाय पर्याय नाही.

आपल्याला हेही लक्षात घ्यावे लागेल की, आंबेडकरी समाजाचे एवढे मतदान नाही की, आपल्या मतावर आपले आमदार स्वतंत्रपणे निवडून आणता येईल. म्हणून काही प्रमाणात तडजोड ही करावीच लागेल. त्यासाठी मुळात आपल्या पुढाऱ्यांच्या हेकेखोर आणि अहंकारपणाच्या सवयीला मुरड घालावी लागेल.

‘एकला चलोरे’च्या भुमिकेने समाजाचं फार मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे आपला नाही तर कुणाचा तरी फायदा होतो आहे, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे.

लोकसभेच्या निवडणुकीत उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात काय झालं? याचाही धडा आपण शिकायला पाहिजे.

आंबेडकरी विचारांची राजकीय व सामाजिक चळवळ महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांमध्ये प्रभावी आहे. मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळू नये, यासाठी दोन्ही राज्यांमधील आंबेडकरी विचारांचा प्रभाव असलेल्या मतदारांनी इंडिया आघाडीच्या बाजूने उभे राहण्याचा जाणीवपूर्व प्रयत्न केल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. हा अनुभव लक्षात घेऊनच आपल्याला पुढील आखणी करावी लागेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शासनकर्ती जमात’ बनण्याचा उपदेश समाजाला केला होता. तो प्रयोग एकेकाळी मा. कांशीरामजी यांनी कर्मचारी आणि अधिकारी यांना सामाजिक परतफेडीची जाणीव करून देऊन एका राज्यात का होईना सफल केला होता. पण ते गेल्यानंतर परत आपण मागे फिरलो आहोत.

तथापि आंबेडकरी समाजात काय ताकद आहे, याची चुणूक एकदा तरी दाखवून द्यायला पाहिजे. म्हणून त्या दिशेने येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत आंबेडकरी राजकारणाची रणनीती कशी असावी या दृष्टीने विचारविनिमय होणं अत्यंत गरजेचं आहे. तरी विचारवंतांनी अगदी तळमळीनं व्यक्त व्हावं अशी अपेक्षा आहे.

विद्रोही कवी सोपान ओव्हाळ, आपल्या कवितेतून समाजाला जागे करण्यासाठी म्हणतात,

‘ते तुडवत आहेत पायाखाली लोकशाही, आणू पाहत आहेत विषमतेचं राज्य, आम्ही अजून झोपलेले आहोत! देश बर्बादिचे स्वप्न पाहत आहोत…!!’

आर.के.जुमळे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!