भाजपा नेत्यांसाठी निवडणुका म्हणजे खेळ आणि EVM म्हणजे लहान मुलांचे खेळणे ? – निवडणूक अधिकारी निलंबित आणि भाजपा नेत्याविरुद्ध FIR दाखल
भोपाळ : लोकसभा 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सर्वत्र पार पडले असून प्रक्रिया निम्म्या टप्प्यावर आली आहे. उर्वरित मतदान 13 मे, 20 मे आणि 1 जून रोजी होणार आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
या व्हिडीओमध्ये चक्क एक लहान मुलगा ईव्हीएमवरील बटण दाबून मतदान करताना दिसत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशमधील भोपाळमधील बिरासियामधील असल्याची माहिती समोर येत आहे.
सोशल मीडियावरील दाव्यांनुसार आणि स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीचे पंचायत सदस्य असलेल्या विनय मेहर यांच्या मुलाचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. विनय यांच्याबरोबर त्यांच्या मुलगा मतदानासाठी गेला होता. विनय यांनीच हा व्हिडीओ काढल्याचं व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे. मंगळवारी म्हणजेच 7 मे रोजी मतदानकेंद्रावर मतदान करताना विनय यांनी आपल्या मुलाला ईव्हीएमवरील बटण दाबायला सांगितलं आणि हा व्हिडीओ काढला असं दिसत आहे. वडिलांच्यावतीने त्यांच्या अल्पवयीन मुलाने मतदान केलं.
मेहेर यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, ‘मतदानकेंद्रामध्ये मोबाईल कसा नेऊ दिला ?’ हा पहिला प्रश्न विचारला जात आहे. तसेच मतदान करण्यासाठी गेलेल्या वडिलांबरोबर त्यांच्या अल्पवयीन मुलाला कसं जाऊ दिल ? हा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणावर अद्याप निवडणूक आयोगाने कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. मात्र जिल्हाधिकारी कुशलेंद्र विक्रम सिंह यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात तेथील निवडणूक अधिकारी संदीप सियानी यांना निलंबित करण्यात आलं असून भाजपा नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत