दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविदर्भसामाजिक / सांस्कृतिक

बाळासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीपुरक राजकारणाचा उंचावता आलेख.

दैनिक जागृत भारत परिवाराच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसा निमित्त अनेक मंगल कामना.

बाळासाहेब आंबेडकर ह्यांचा १० मे रोजी वाढदिवस आहे.बाळासाहेब आणि स्वाभिमान हे समानार्थी शब्द आहेत.४२ वर्षात ज्या नेत्याला कुठलाही राजकीय पक्ष आपल्या वळचणीला आणू शकला नाही ते नाव म्हणजे बाळासाहेब.२०१४ पासून देशात लोकशाही आणि भारतीय राज्य घटना बासनात बांधून देशात धार्मिक उन्माद सुरु आहे.त्यावेळी गरज भासते ती ह्या मुजोर व्यवस्थेला वठणीवर निर्भीड राजकीय नेतृत्वाची.तेच कार्य सम्यक समाज आंदोलन, बौद्धमहासभा आणि पुढे भारिप, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी अश्या व्यापक अंगाने बाळासाहेब घेऊन जात आहेत.अकोल्यातील राजकीय सामाजिक अभिसरणाचा अकोला पॅटर्न वंचितच्या रूपाने त्यांनी देशभर पोहचविला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ’रिपब्लीकन पक्ष’ नावाचा पक्ष स्थापन करण्यासाठी ३० सप्टेबर १९५६ रोजी शेडुल्ड कास्ट फ़ेडरेशन च्या कार्यकारणीची बैठक बाबासाहेबांच्या दिल्ली निवासस्थानी बोलविण्यात आली होती. बैठकीत ’शेडुल्ड कास्ट फ़ेडरेशनचे’विसर्जन करून ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडीया’ स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता.नियोजित रिपब्लिकन पक्षात तरुणांची भरती होत रहावी आणि राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेणारांसाठी एक प्रशिक्षण विद्यालय असावे. करिता मुंबई मध्ये ’प्रशिक्षण विधालय’ सुरु करण्याचे बाबासाहेबांनी ठरविले होते.१ जुलै १९५६ ते मार्च १९५७ पर्यंत रेगे यांच्या देखरेखी खाली ते प्रशिक्षण विधालय कार्यरत होते.बाबासाहेबांच्या अकाली जाण्याने हे राजकीय प्रशिक्षण केंद्र पोरके होवुन कायमचे बंद पडले.ती उणीव काही अंशी अकोला जिल्हाने भरून काढली आहे.

अकोला जिल्हात कलापथके,गीतकार, शाहीर, जलसे, धंडारी,भजनी मंडळानी जागृतीचा वणवा सतत पेटत ठेवत.१९४२ साली परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे शेडूल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केले.त्याकाळी व-हाड प्रांतिक शेडूल्ड कास्ट फेडरेशनची पहिली परिषद ९ आणि १० डिसेंबर १९४५ ला अकोलयात संपन्न झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर परिषदेचे अध्यक्ष म्हणून अकोल्यात आले होते.शेडूल्ड कास्ट फेडरेशन ने अकोला लोकसभा निवडणूकीत १९५२ साली व बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाना नंतर १९५७ च्या निवडणूकीत दुसऱ्या आणि तिस-या क्रमांकाची मते घेतली होती.१९०१ सालच्या जनगणनेत अकोला – वाशीम संयुक्त जिल्ह्यात बौद्ध धर्मीय म्हणून शून्य नोंद होती.१९५६ साली बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्विकाराच्या आवाहना नुसार धम्म स्वीकाराच्या नंतर १९६१ च्या जनगणनेत दोन लाख बेचाळीस हजार चारशे चौसष्ट बौद्ध धर्मीयांची संख्या नोंदविण्यात आली होती. रिपब्लीकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ झाली.रिपब्लीकन पक्षाच्या प्रेसेडीयमची बैठक देखील अकोल्यात संपन्न झाली होती.१९५७ च्या निवडणूकीत रिपब्लीकन पक्षाला लोकसभेत ५ जागा व विधानसभेत १३ जागांवर विजय मिळाला होता.१९६४ ला पक्ष फुटला गटबाजी मुळे अकोल्यातील कार्यकर्ते देखील विभागले आणि ताकदवान पक्ष कमकुवत बनला. १९७१ आणि १९७७ च्या निवडणूकीत अकोला लोकसभेत कोणत्याही आंबेडकरी गटाचा अधिकृत उमेदवार नव्हता.विधानसभेत मात्र रिपाइं उमेदवारांना दुस-या, तिस-या क्रमांकाची मते मिळत होती. गटबाजी होती मतदार मात्र कायम होता.त्या काळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, शेकाफे कार्य जिल्ह्यात मोठ्या गतीने सुरु होते.भय्यासाहेब आंबेडकरांनी देखील आठ वेळा अकोला जिल्ह्याचा दौरा केला होता.
अश्या वातावरणात बाळासाहेबांचे अकोल्यात पहिल्यांदा आगमन झाले ते १४ ऑगस्ट १९८० रोजी. अकोल्यातील रेल्वे स्टेशन नजीकच्या सर्किट हाऊस येथे रूम नंबर तीन मध्ये ते उतरले होते. नगर परिषदेत आयोजित बाळासाहेबांचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द झाला होता.ही बातमी अकोल्यातील तत्कालीन नेतृत्व दिनबंधू गुरुजी, केरुबुवा गायकवाड ह्यांचे कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील,पी. आर. महाजन,शत्रुघन मुंडे,शंकरराव रगडे, रामरावजी गवई, कृष्णराव मोहोड, यादवराव पाटील, जानराव इंगळे, भाऊसाहेब इंगळे ह्यांना समजली.बाबासाहेबांचे नातू सभा न होता परत जाणे ही आपल्या जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे, हे हेरून त्या सर्व कार्यकर्त्यानी दुपारी बाळासाहेबांची भेट घेतली. सभेसाठी वेळ देण्याची मागणी केली.साहेबांचा होकार घेऊन रात्री ८ वाजता अकोट फैल येथे सभा ठरविण्यात आली.तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता भीम नगर येथे तत्कालीन जुने पुढारी शंकरराव खंडारे ह्यांचे घरी बाळासाहेबाना नेण्यात आले.साक्षात बाबासाहेबांचे नातू भिम नगर मोहोल्यात आल्याने बाळासाहेबांना पहायला तोब्बा गर्दी झाली.प्रत्येकाला ह्या तरण्याबांड आंबेडकरां मध्ये बाबासाहेबच दिसत होते.भारावलेली जनता डोळे भरून हे प्रतिरूप पाहत होते.त्यांच्या पाया पडत होती, त्यांना स्पर्श करत होती, त्यांच्या पायाची माती कपाळावर लावत होती.सर्व आसमंत भारवला होता.ह्या प्रचंड गर्दीत पहिली सभाच भीमनगर मध्ये पार पडली.अर्थात त्या नंतर रात्री ८ वाजताची नियोजित सभा भारतीय बौद्ध वाचनालय अकोट फैल येथे दिनबंधु गुरुजी ह्यांचे अध्यक्षतेखाली प्रचंड गर्दीत संपन्न झाली.त्याआधी मोठी मिरवणूक काढण्यात आली होती.या दोन सभा नंतर बाळासाहेबांशी जुळलेल्या कार्यकर्त्यानी लगेच दोन महिन्यात बाळासाहेबांची सभा ११ ऑक्टोबर १९८० रोजी अकोट येथील खरेदी विक्री संघाच्या पटांगणावर आयोजित केली.
अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या त्यांचे सोबत लंकेश्वर गुरुजी, सुखदेवराव जाधव बुलडाणा, सुखदेव आठवले, नामदेव शिरसाट, कृष्णा इंगळे, नागपुर, रामकृष्णजी रजाने, जळगाव जामोद, विश्वनाथ पी. दांडगे, खामगांव, व्ही. एम. भोजने, नामदेवराव दाभाडे, एन. बी. वानखडे वडाळी, डॉ. बि. जी. थोरात, अंथोनी तेलगोटे, लहुजी तेलगोटे, गुरुजी अकोट, दिनबंधु गुरुजी, भाऊसाहेब इंगळे, अकोला जिल्हाभर फिरुन धम्माचा प्रचार केला. पायी इशारा मोर्चा नाशिक ते मुंबई काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला.राजगृह हिंदु कॉलनी मुंबई येथे समाजातील निवडक नेत्याची बैठकीत हे ठरवले गेले.ह्यावेळी राजाभाऊ ढाले, नामदेव ढसाळ, प्रा. अरुण कांबळे, जोगेंद्र कवाडे या नेत्यांशी चर्चा करण्यात आली. नंतर काळाराम मंदिर सत्याग्रहाचे स्मृतिदिनी दि. २ मार्च १९८३ पासुन पायी इशारा मोर्चा काढावा आणि समाजाचे अनेक प्रश्न सोडवावे असे ठरले. त्या कामी आंदोलनाचे नेतृत्व मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी करावे असे ठरविण्यात आले आणि संपूर्ण राज्यातुन जनता आली पाहिजे म्हणून प्रचार करण्यात आला. त्यावेळी अनेक निष्ठावान जनता जागृत व प्रामाणिक लोक राजा ढाले, मुंबई, एल. डी. भोसले, मुरलीधर जाधव मुंबई, जयदेव गायकवाड, पुणे, श्रीधरराव जाधव, मुंबई, सुखदेव जाधव, बुलडाणा, एम. एन. लंकेश्वर गुरुजी, अकोला, चंदन तेलंग यवतमाळ, जगन वंजारी, दादा इंगळे, जयश्री इंगळे, चंद्रपुर, दादा पाईकराव उमरखेड, रामकृष्ण रजाने जळगाव जामोद अनेक मंडळी राज्यात फिरत होती. त्याचा प्रचार अकोला जिल्ह्यात अनेक तालुका मेळावे घेवून केल्या गेला.बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला त्या गावात जाण्याकरिता अकोला जिल्ह्यातुन तुफान उपस्थिती होती. रेल्वेच्या टपावर तीन हजार लोक गेले होते. पायी मोर्चाला सुरुवात झाली. हा हा म्हणता गर्दी वाढली नेता
पाच भीम सैनिकांनी केले १० दिवस आमरण उपोषण

अकोला येथील अशोक वाटिका सर्व आंदोलनाची साक्षीदार आहे दिनबंधु गुरुजी यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.बौद्ध महासभा अकोला जिल्हा सचिव एम. एन. लंकेश्वर गुरुजी यांनी संचालन केले. नासिक ते मुंबई पायी मोर्चाची माहिती त्यांनी विषद केली. अकोला जिल्ह्यात ७५० हेक्टर जमिनीवर दलित गरीब लोकांनी अतिक्रमण केले आहे. जवळचा पैसा मोडून पेरले आहे. काही लोक ते पेरलेली जमीन मोडत आहेत पिके नष्ट करीत आहेत. १९६४ जेलभरो सत्याग्रहाचे वेळी भूमीहीनांना जमिनी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याचा धागा धरुन अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करण्याचे ठरले. कोण उपोषणाला बसते, यांची विचारणा करण्यात आली.त्याकाळी नोकरीवर असलेले बी. आर. सिरसाट ज्यांचे लग्न तीनच महिन्यापूर्वी झाले होते.त्यांच्या सोबत दिलीप तायडे, प्रभाकर इंगळे, डॉ. दत्तु तिडके, सुखदेव आठवले असे पाच लोक आमरण उपोषणाला तयार झाले. ८ ऑगस्ट १९८३ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.त्यात किमान पाच हजार लोक उपस्थित होते.अशात दुर्दैवी गोष्ट म्हणजे ८ ऑगस्ट १९८३ ला सकाळी ११ वाजता दिलीप तायडे यांचा पहिला मुलगा मरण पावला. अशावेळी एकट्यानेच त्या मुलाचा अंतविधी केला आणि पत्नीला मुळ चिखलगावी सोडून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाला बसले. उपोषणाची चर्चा जिल्हाभर सुरु झाली. आकोट, तेल्हारा, बाळापुर, पातूर, बार्शिटाकळी, मालेगांव, कारंजा, मुर्तिजापूर, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड या सर्व १३ तालुक्याचे ठिकाणी दररोज मोर्चा काढण्यात आले आणि अकोला शहरातील प्रत्येक वार्डातुन महिला मंडळ, तरुण उत्साही मंडळ, जेष्ठ नागरिक दिवसभर उपोषण मंडपात बसत असत.
अकोला जिल्ह्यास जातीय दंगली व अत्याचाराचा मोठा इतिहास आहे.त्यात प्रामुख्याने मराठा विरुद्ध बौद्ध असा संघर्ष होत असे. त्यात धाकली येथील गवई बंधूचे डोळे काढण्याचे प्रकरण, सुकळी नंदापूर येथील सामाजिक बहिष्कार, मुंडगाव लोहारी, कान्हेरी,देगांव, देऊळगांव, चान्नी चतारी, कोठारी,कळंबा, बोरगाव, पळसो बढे दंगल, मिरवणुकीवर हल्ले अश्या दंगलीच्या नोंदी होत्या.हा रक्तरंजित इतिहास देखील बाळासाहेबां मुळे कायमचा बदलला.त्याकाळी जे समुह एकमेकांशी संघर्ष करीत होते ते पक्ष म्हणून एकत्र आणण्यास यश आल्याने अकोला जिल्ह्यातील दंगली जवळ जवळ हद्दपार करण्यात यश आले
बाळासाहेबांनी १९८४ साली आपल्या राजकीय जीवनाला प्रारंभ केला.त्याआधी ते भारतीय बौद्ध महासभा व सम्यक समाज आंदोलन मार्फत सामाजिक कार्यात अग्रेसर होते.त्याला आता ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. ८४च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीने काँग्रेसविरोधातील अनेक दिग्गज पराभूत झाले होते. याच ८४च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांनी ईशान्य मुंबई व अकोला या दोन लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात साहेबांना ४९ हजार ७५८ मते मिळाली होती, तर अकोला लोकसभेत मधूसुदन वैराळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून १,६५,६६४ मते मिळवली होती .वैराळे यांना १,७८,८७४ मते मिळाल्याने १३,२१० इतक्या अल्प मतांनी वैराळे विजयी झाले होते.
दरम्यान १९८७ साली नांदेड लोकसभेची पोटनिवडणुक लागली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर मुलीच्या गुणवाढ प्रकरणात पदावरून पायउतार झाले होते. त्या वेळी शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली.शंकरराव चव्हाण यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याने ८७ मध्ये नांदेडची पोटनिवडणुक जाहीर झाली होती.कॉंग्रेस कडून अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती.तर भारिपच्या वतीने बाळासाहेब उभे होते.नांदेड पोटनिवडणुकीत बाळासाहेबांच्या प्रचाराला जॉर्ज फर्नांडिस आले होते .या निवडणूकीत सात उमेदवार उभे होते. परंतु खरी लढत झाली ती अशोक चव्हाण आणि बाळासाहेब यांच्यात. अशोक चव्हाण यांना २,८३,०१९ तर बाळासाहेबांना १,७१,००१ इतकी मते मिळाली. ह्या संघर्षमय लढतीत बाळासाहेबांचा पराभव झाला. प्रचाराची साधने,पैसा,राजकीय पाठबळ नसताना मुख्यमंत्र्याचे मुलाच्या विरोधात पावणेदोन लाख मते घेणे हा मोठा राजकीय चमत्कार होता. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी अनेक मतपेट्या नदीच्या पात्रात बुडविल्या होत्या, असे आजही नांदेड मध्ये जुने कार्यकर्ते बोलतात.
बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भारिपला ६ लाख २ हजार १७४ मते मिळाली होती.
१९९० साली बाळासाहेब राज्यसभेवर खासदार होते. त्याकाळी भारिप हा पक्ष स्वतंत्र होता.१५ फेब्रुवारी १९९३ रोजी बहुजन महासंघाची स्थापना झाली होती.अकोला पॅटर्न चा पहिला राजकीय प्रयोग झाला तो फेब्रुवारी १९९२ साली.भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाच्या वतीने संयुक्तपणे लढविण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक मध्ये.अकोला जिल्हा परिषद वर १९६२ पासून प्रस्थापित काँग्रेसचे बडे नेते व त्यांचे नातेवाईकांची मक्तेदारी होती.
अकोल्यात धोत्रे, कोरपे, भुईभार, सपकाळ व धाबेकर ही त्या काळची प्रस्थापित घराणी.ह्या कुटुंबांनी जिल्ह्यातील सर्व सत्ता आपापल्या कुटुंबात वाटून घेतली होती.घराणेशाही आणि मक्तेदारीच्या ह्या सत्तेला पहिला सुरुंग लागला १९९२ सालच्या निवडणुकीत.भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाचे ६० पैकी १५ उमेदवार जिल्हा परिषदेत विजयी झाले.२० उमेदवार १०० ते २०० मतांनी पराभूत झाले होते.ह्या निवडणुकीत भाजप सेनेचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते, त्यापैकी अनेकांच्या अनामत रकमा देखील जप्त झाल्या होत्या. दोन माजी आमदारांना निवडणुकीत आस्मान दाखविण्यात आले होते.कोट्याधीश उमेदवारांना दारुण पराभव स्विकारावा लागला होता.
अकोला जिल्ह्याच्या १३ पंचायत समितीच्या निवडणुकीत १२० उमेद्वारां पैकी ३० उमेदवार भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाचे निवडून आले होते.४८ उमेदवार अत्यल्प मतांनी पराभूत झाले होते. अकोला व बार्शीटाकळी ह्या दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या पंचायत समित्या प्रस्थापिता कडून हिसकावून घेण्यात आल्या.बार्शीटाकळी पंचायत समितीत बौद्ध समाजाचे बी आर सिरसाट तर अकोला पंचायत समिती मध्ये धनगर समाजाचे हरिदास भदे सभापती विजयी झाले.मूर्तिजापूर पंचायत समितीत टाकोनकर समाजाचे बबन डाबेराव हे पक्षाचे सहकार्याने सभापती झाले तर दर्यापूर पंचायत समिती मध्ये कोळी समाजाचे वासुदेवराव खेडकर सभापती झाले.बाळापूर व कारंजा पंचायत समिती मध्ये एक एक सदस्य कमी पडल्याने पक्षाला सभापती पदाने हुलकावणी दिली.विशेष म्हणजे अकोला जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या १५ पैकी ५ सदस्य हे त्यांच्या तालुक्याचे बाहेर निवडणूक लढून विजयी झाले होते.त्यापैकी चारजण बौद्ध होते आणि ते खुल्या प्रवर्गातून निवडून आले होते.हा ‘अकोला पॅटर्न’चा विस्तार होता.
१९९३ मध्ये नांदेड मधील किनवट येथून पोटनिवडणुकीत आदिवासी समाजातील भिमराव केराम यांना विधानसभेत आमदार म्हणून निवडून आणले. १९९५ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मखराम पवार आमदार म्हणून निवडून आले तसेच इतर उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली होती. १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभेत बाळासाहेब आंबेडकर खासदार म्हणून संसदेत गेले. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब यांचे तीन आमदार निवडून आले.याच काळात कॉंग्रेसच्या सरकार मध्ये भारिप बहुजन महासंघाला दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद होते.२००४, २००९ आणि २०१४ मध्ये भारिप बहुजन महासंघाचे आमदार निवडून आले.२०१२ साली अकोल्याचे महापौर पदावर बौद्ध समाजाची महिला ज्योत्स्ना गवई विजयी झाल्या.अनेक पंचायत समित्यावर सत्ता आली.जिल्हा परिषद वर अनेक वर्षे ताब्यात ठेवली आहे.
बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र केले.अनेक वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या छोट्या-मोठय़ा समूहाचे सरपंच, सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष,महापौर, आमदार,मंत्री बनविले.अनेक लढे उभे केलेत.

१ जानेवारी २०१९ रोजी स्थापन झालेल्या आणि २४ मार्च २०१९ रोजी निवडणूक आयोगा कडे नोंदणी झालेल्या वंचित बहुजन आघाडीने तर भारतीय घटनेचा सरनामा हाच पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आहे.हा एक राजकीय चमत्कार होता.स्थापनेच्या एका वर्षात ४२ लाख मते घेणे ह्या मागे ४० वर्षांपेक्षा अधिक केलेले बाळासाहेबांचे परिश्रम आणि सम्यक समाज आंदोलन ते भारिप बमसं मशागत त्याचे मुळाशी आहे.बायपास झाल्या नंतर त्यांचेवर काही मर्यादा येतील असा कयास लावला जात होता.तो त्यांनी खोटा ठरविला आहे.भोंगा, बुलडोझर ह्याला अवास्तव महत्व आलेले असताना ते सातत्याने लढताना दिसत आहेत.कधी विठ्ठल मंदिराचे आंदोलन असो की मो. पैगंबर ह्यांचे सह सर्व धर्म संस्थापकांच्या अवमानेने विरुद्ध बिल खाजगी विधेयक असो राज्य आणि देशातील सामाजिक एकोपा आणि सौहार्द कायम टिकले पाहिजे ह्यासाठी ते वयाच्या ७० व्या वर्षी लढत आहेत.मराठा आरक्षणाला पाठिंबा देतांना ओबीसीचे हक्क हिरावले जाणार नाहीत ह्यावर त्यांचा कटाक्ष असतो.लोकशाही टिकविण्यासाठी निवडणुका ह्या खर्चिक होणार नाहीत ह्या साठी सरकारनेच उमेदवारांना प्रचार साहित्य पासून प्रचार पर्यंत तसेच मतदार मतदान केंद्रावर आणण्याची सोय करून निवडणुकीतील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार थांबविला जाऊ शकतो, हि मांडणी देशात फक्त बाळासाहेब करताना दिसतात.
काही महाभाग विशेषत: विचारवंत म्हणवून घेणारे जेव्हा बी टीम आणि भाजपला निवडून येण्यासाठी वंचित उभी राहते, किंवा वंचित समूहाने केवळ काँग्रेस साठी आपली मते दिली पाहिजे, अशी मांडणी करतात तेव्हा हे उडाणटप्पू किती बालिश आहेत, ह्याची प्रचिती येते.बाळासाहेब १९८४ पासून निवडणुक लढत आहेत.कुणीही राजकारण करताना अगदी ग्राम पंचायत मध्ये देखील स्वतःची जागा निवडून येईल अशी सेटिंग करत असतो मात्र साहेबांनी तशी तडजोड कधीच केली नाही.त्यांना जर सत्ताच हवी असेल तर त्यांना आंबेडकर ह्या एका आडनाव कायम लालदिवा आणि एक मंत्री पद सहज देऊ शकते.त्यांना कुठेही मोर्चा आंदोलन किंवा पक्ष, चळवळ काहीच लागणार नाही.मात्र स्वाभिमान गहाण ठेवून ना बाबासाहेब राजकारण करीत होते, ना भय्यासाहेब आणि ना बाळासाहेब करतात. बाबासाहेबांच्या उपकाराने पोट भरलेले काही काँग्रेसी हरिजन अश्या टिका किंवा टवाळी करण्यात पुढे असतात. वंचित समूहाचे राजकारण उभे करण्यासाठीं त्यांनी आपले अख्खे आयुष्य पणाला लावले आहे.
देशात एकीकडे उन्मादी आणि सुडाचे राजकारण सुरु असताना बाळासाहेबांचा एकच आश्वासक आवाज लोकशाहीच्या संरक्षणासाठी
उठताना दिसतो.कारण त्यांना ईडी, सीबीआय कशाचीही भीती नाही, आपल्या सार्वजनिक जीवनात त्यांनी असा कुठलाही डाग आपल्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनात लागू दिलेला नाही. सतत निवडणुक लढत असल्याने त्यांचे संपत्ती किती आणि कुठे आहे ह्याचे विवरण जनते समोर आहे.त्यामुळे जे कुणी बदनामी करायला आरोप करतात त्यांना एकही बेनामी संपती, व्यवहार सिद्ध करता आला नाही, हे विशेष आहे.
२०२४ चे लोकसभा निवडणूक देखील अश्याच स्वरूपात त्यांनी लढायला घेतली आहे.देशातील लोकशाही आणि संविधान अबाधित राहील आणि भाजपचा पराभव व्हावा म्हणून त्यांनी निकराचा लढा उभा केला आहे.
अश्या स्वाभिमानी नेत्याला उद्दंड आयुष्यासाठी मंगल कामना.

राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश.
9422160101

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!