आर्यअष्टांगिक मार्ग भाग ३५

समाधी
समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. ज्याने सम्यक समाधी प्राप्त केली आहे तो ‘वस्तुमात्र जसे आहेत तसे’ पाहू शकतो. गोष्टी जसे आहेत तसे पाहणे याला बुध्द धम्मात फार महत्व आहे. गोष्टी जसे आहेत तसे सत्यस्वरुपात पाहिल्यानेच दु:ख, अनित्यता व अनात्मता ह्या तीन भगवान बुध्दाच्या महत्वाच्या सिध्दांताविषयीचा अनुभव येतो. हा अनुभव आणि ज्ञान होत असल्यानेच त्याला आपोआपच प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांताप्रमाणे दु:ख नष्ट होते.
माणसाचे मन स्थिर नसते. ते सहा इन्द्रियविषयात नेहमी रममाण झालेले असते. ‘वस्तुमात्र जसे आहेत तसे’ पाहण्यासाठी मन केंद्रित करावे लागते. अकुशल मनोवृतीचा पूर्ण निरोध करुन कुशल मनोवृतीचा विकास करणे ही बुध्द धम्माची शिकवण आहे. सम्यक समाधी साधण्यासाठी शील संपादन केले पाहिजे. शीलाशिवाय समाधीचा लाभ होत नाही.
अष्टांगिक मार्गातील सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे मार्ग समाधीमध्ये येतात.
१) सम्यक व्यायाम
अष्टांगिक मार्गातील सहावा मार्ग सम्यक व्यायाम हा आहे. सम्यक व्यायाम म्हणजे मनाचा व्यायाम होय. सम्यक व्यायामामुळे अविद्या नष्ट करण्याचा प्रयत्न करता येतो. सम्यक व्यायामाचे चार हेतू आहेत.
१) आपल्या मनात वाईट विचार येत असतील तर ते येऊ न देणे, २) आपल्या मनात वाईट विचार आले असतील तर ते काढून टाकणे,
३) आपल्या मनात चांगले विचार येत असतील तर ते येऊ देणे व
४) आपल्या मनात चांगले विचार आले असतील तर त्याचे संवर्धन करणे, वाढ करणे.
अशा प्रकारे आपल्या मनाला योग्य व्यायाम देवून आपले चित्त शुध्द करता येते. चित्त शुध्दीकरीता सम्यक व्यायामाची अत्यंत आवश्यकता असते.
अंगुत्तर निकायात चार प्रकाराचे प्रयत्न सांगितले आहेत. पहिला प्रयत्न म्हणजे- उत्पन्न न झालेले अकुशल कर्माची उत्पती होऊ न देण्याचा संकल्प करुन चित्ताला तिकडे घेऊन जातो. दूसरा प्रयत्न म्हणजे- उत्पन्न झालेले अकुशल कर्माचा समुळ नाश करण्याचा संकल्प करुन चित्ताला तिकडे घेऊन जातो. तिसरा प्रयत्न म्हणजे- उत्पन्न न झालेले कुशल कर्म उत्पन्न होण्याकरीता संकल्प करुन चित्ताला तिकडे घेऊन जातो. चौथा प्रयत्न म्हणजे- उत्पन्न झालेले कुशल कर्माच्या अवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी, वृध्दी करण्यासाठी व विपुलतेकरीता संकल्प करुन चित्ताला तिकडे घेऊन जातो. यालाच सम्यक व्यायाम म्हटले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, मनाच्या बाबतीत भगवान बुध्दाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्टय असे की, सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे. मन हे सर्व वस्तूच्या अग्रभागी असते. ते सर्व वस्तूवर अंमल चालविते. त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन हे सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनले असते.
भगवान बुध्दाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्टय असे की, आपल्यामध्ये निर्माण होणार्या आणि आपल्यावर बाहेरुन ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बर्या-वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे, ते ते मनातूनच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे, ते ते मनातूनच उत्पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणार्या बैलांच्या पावलांमागोमाग गाडीची चाके जातात. त्याचप्रमाणे अशुध्द चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दु:ख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धम्माचे सार आहे.
धम्मपदाच्या ‘यमकवग्गो’च्या पहिल्या गाथेमध्ये लिहिले आहे की-
मनोपुब्बग्ङमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ।
मनसा चे पदुट्ठेन भासति वा करोति वा ।
ततो’नं दुक्ख्मन्वेति चक्कं’ पदं ॥
याचा अर्थ म्हणजे सर्व धर्म (अवस्था) प्रथम मनात उत्पन्न होत असतात. मनच मुख्य आहे, ते (धर्म) मनोमय आहेत. जेव्हा मनुष्य मलिन मनाने बोलतो वा कार्य करतो, तेव्हा (बैलगाडीचे) चाक जसे बैलाच्या मागेमागे लागते, तसेच दु:ख त्याच्या मागे लागते.
दुसर्या गाथेमध्ये लिहिले आहे की-
मनोपुब्बग्ङमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ।
मनसा चे पसन्नेन भासति वा करोति वा ।
ततो’नं सुखमन्वेति छाया’व अनापयिनी ॥
याचा अर्थ म्हणजे सर्व धर्म (अवस्था) प्रथम मनात उत्पन्न होत असतात. मनच मुख्य आहे, ते (धर्म) मनोमय आहेत. जेव्हा मनुष्य स्वच्छ मनाने बोलतो वा कार्य करतो, तेव्हा मनुष्याचा कधी साथ न सोडणार्या छायेप्रमाणे सूख त्याच्या मागोमाग फिरते.
भगवान बुध्दाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्टय असे की, मनुष्याने पापकृत्य टाळावे.
त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्टय असे की, खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून तो धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. म्हणून मनावर चांगले संस्कार करण्यासाठी सम्यक व्यायामाची गरज आहे.
मनामध्ये चांगल्या आणि वाईट विचाराचे नेहमीच द्वंद सुरु असते. कुशल आणि अकुशल असे दोन्हीही विचार मनामध्ये उत्पन्न होत असतात. अकुशल विचाराला मनात उत्पन्न होऊ न देणे, कुशल विचाराची वाढ करणे आणि वाईट चित्ताला नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, कोणतेही वाईट कर्माकडे मनाला न वळविणे, हे मुख्य कार्य सम्यक व्यायामाचे आहे. समाधीची ही पहिली अवस्था आहे. म्हणून सम्यक व्यायाम हे अत्यंत महत्वाचे अंग आहे. जसा बाण बनविणारा बाणाला सरळ करतो. त्याचप्रमाणे वाईट मार्गाला लागलेल्या चित्ताला कुशलतेकडे आणण्याचे महत्वाचे कार्य सम्यक व्यायामाचे आहे.
धम्मपदाच्या तेराव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-
यथागारं दुच्छन्नं वुट्ठी समतिविज्झति ।
एवं अमावितं चित्तं रागो समतिविज्झति ।।
याचा अर्थ, योग्य प्रकारे न साकारलेल्या घरात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरते, त्याचप्रमाणे असंस्कारीत चित्तामध्ये राग, लोभ आदी मनोविकार शिरतात.
तसेच धम्मपदाच्या चवदाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-
यथागारं सुच्छन्नं वुट्ठी समतिविज्झति ।
एवं अमावितं चित्तं रागो समतिविज्झति ।।
याचा अर्थ, योग्य प्रकारे साकारलेल्या घरात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरत नाही, त्याचप्रमाणे सुसंस्कारीत चित्तामध्ये राग, लोभ आदी मनोविकार शिरत नाहीत. याकरिता मनाला संस्कारीत करण्यासाठी सम्यक व्यायामाची नितांत आवश्यकता आहे.
धम्मपदाच्या बेचाळीसव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-
दिसो दिसं यन्तं कयिरा वेरी वा पन वेरिनं ।
मिच्छापणिहिंतं चित्तं पापियो’नं ततो करे ॥
याचा अर्थ, शत्रू-शत्रूचे किंवा वैरी वैर्याचे जेवढे नुकसान करते, त्यापेक्षा वाईट मार्गाने गेलेले चित्त मनुष्याचे जास्त नुकसान करते.
तसेच धम्मपदाच्या त्रेचाळीसव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-
न तं माता पिता कयिरा अञ्ञे वापि च ञातका ।
सम्मापणिहितं चित्तं सेय्यसो’नं ततो करे ॥
याचा अर्थ, आई-बाप किंवा दुसरे नातेवाईक, जेवढे कल्याण करु शकत नाही, त्यापेक्षा जास्त कल्याण सन्मार्गावर असलेले चित्त करु शकते. याकरिता चित्ताला सन्मार्गावर आणण्याचे काम सम्यक व्यायाम करते.
धम्मपदाच्या तेहतीसाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-
फन्दनं चपलं चित्तं दुरक्खं दुन्निवारयं ।
उजुं करोति मेघावी उसुकारो’व्तेजनं ॥
याचा अर्थ, चित्त चंचल आहे, चपळ आहे, रक्षण करण्यास व निवारण करण्यास कठीण आहे. अशा चित्ताला मेघावी (बुध्दीमान) पुरुष सरळ करतो, जसा बाणकार बाणाला सरळ करतो. म्हणून चंचल चित्ताला सरळ करण्याचे काम सम्यक व्यायाम करते.
धम्मपदाच्या अडतीसाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-
अनवट्ठितचित्तस्स सध्दम्मं अविजानतो ।
परिप्लवपसादस्स पञ्ञा न परिपूरति ॥
याचा अर्थ, ज्याचे चित्त स्थिर नाही, जो सध्दर्म जाणत नाही, ज्याचे चित्त प्रसन्न नाही, असा पुरुष प्रज्ञावान होऊ शकत नाही. म्हणून प्रज्ञावान होण्यासाठी सम्यक व्यायामाची गरज आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१७.१.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत