बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान..!

02 मे 1950 हा दिवस, भारतीय इतिहासात आणि विशेषतः अस्पृश्य जनतेच्या चळवळीत सुवर्ण अक्षराने कोरला जाईल. या दिवशी दिल्ली येथे भगवान बुद्धाची २४९४ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य समाजाने जाहीरपणे साजरी केली.
सन 1950 च्या सुमारे २२ वर्षापूर्वी अस्पृश्य समाजाने महाड येथे मनुस्मृतिचे जाहीर दहन केले होते आणि गुलामगिरीत डांबणाऱ्या हिंदू धर्मात अस्पृश्य समाजाने राहू नये असा निश्चय जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बौद्ध जयंतीस विशेष महत्त्व प्राप्त होते यात शंका नाही. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण अत्यंत श्रवणीय आणि स्फोटक होते. त्यांच्या भाषणामुळे वृत्तपत्र सृष्टीत केवढी खळबळ उडाली हे सर्वांना माहीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ते खळबळजनक समग्र भाषण खालीलप्रमाणे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,_
सभ्यगृहस्थहो, भगिनींनो आणि बंधुंनो,
याप्रसंगी मी हिंदी भाषेत बोलण्याचे ठरविले आहे. त्याबद्दल येथे हजर असलेल्या सन्माननीय पाहुण्यांची मी प्रथमतःच माफी मागतो. इंग्रजी भाषेत बोलण्याची माझी फार इच्छा होती. इंग्रजी भाषेत मी बोललो असतो तर माझ्या विदेशी मित्रांना माझे विचार ऐकता आले असते, परंतु इंग्रजी भाषा येथील बहुसंख्य श्रोतृवर्गास समजणार नाही. तेव्हा इंग्रजीमध्ये मी भाषण करणे म्हणजे श्रोतृ- वर्गावर अन्याय करण्यासारखेच आहे म्हणूनच मी हिंदीत बोलत आहे.
वरचेवर जाहीर सभात जावे आणि या ना त्या विषयावर माहिती देत प्रवचने झोडावीत अशी काही मला सवय नाही. मी दिल्लीला आल्यापासून फारच थोड्या सभांना हजर राहिलो आहे. जनतेचा वेळ विनाकारण घेऊ नये, असे मला वाटते आणि जर लोकांचा वेळ घेतलाच तर जनतेची नीती सुधारेल व त्यांना साहाय्यभूत होईल असे काही तरी सांगण्यासारखे आपल्याजवळ पाहिजे.
काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी माझा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा दाखविली आणि त्या समारंभास मी हजर राहावे असे सांगितले. परंतु त्या गोष्टीस मी कबूली दिली नाही. त्यामुळे मी गैरहजर राहिल्याने पुष्कळांची निराशा झाली असेल. मात्र त्यामुळे मला वाईट वाटले नाही. कारण माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा वाढदिवस साजरा करून कोणता फायदा मिळणार ? तुमच्यापेक्षा माझ्यामध्ये विशेष असे काय आहे ? माझ्यापेक्षा तुमच्यामध्ये कमी माणुसकी आहे काय ? मला तसे मुळीच वाटत नाही. काही माणसांना आपले वाढदिवस साजरे झालेले आवडत असतील, माझा वाढदिवस साजरा झालेला मला आवडत नाही. म्हणून मी त्या तरुणांना भगवान बुद्धाचा वाढदिवस साजरा करण्यास सांगितले आणि म्हणूनच माझी सर्व कामे बाजूला सारून मी आलो आहे.
आपल्या देशातील लोक देवपूजा करतात आणि त्यांना रामजयंती, कृष्णजयंती साजरी करण्यात मोठा आनंद वाटतो. *राम, कृष्ण जयंतीस मी हजारो माणसे पाहतो; परंतु भगवान बुद्धाच्या जयंतीला जेमतेम १०० लोक देखील जमलेले मला कधी दिसले नाहीत. बुद्ध मंदिरामध्ये मी दरवर्षी जातो तेव्हा हा फरक मला दिसून येतो.* रामाची अगर कृष्णाची जयंती लोक का साजरी करतात ? त्यांना वाटते की राम व कृष्ण हे देव आहेत. मी धर्मशास्त्राचा मोठा पंडित नाही, तथापि जे काही धार्मिक वाङ्मय मी अभ्यासिले आहे त्यावरून हे सांगू इच्छितो की, *देव पदास चढणारी व्यक्ती ही पवित्र विचारांची असावी लागते. अशा व्यक्तीने दुसऱ्याचा द्वेष करू नये, स्वार्थी हेतू बाळगू नयेत आणि वैरत्व कोणाशीही ठेवू नये. त्याजपासून कोणाचेही नुकसान होऊ नये.
या कसोटीवर राम व कृष्ण खरोखरीच देव आहेत काय ? प्रथम रामाची छाननी करू. राम खरोखरच देव होता काय ? दोन तीन कारणास्तव रामाला देव मानता यावयाचे नाही._
ज्या वेळी राम, सीता, लक्ष्मण यांचेसह जंगलात (वनवासात) राहात होता. त्यावेळी त्याने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. देव माणूस असे कृत्य करील काय ? हे पहिले कारण आहे. वाली आणि सुग्रीव यांच्या कारभारात रामाने नाहक ढवळाढवळ केली. एवढेच नव्हे तर वालीने आपले राज्य व पत्नी सुग्रीवाच्या हवाली करावी अशी सक्ती केली. या गोष्टी का देव माणूस करतो ? हे दुसरे कारण आहे. कोणी एका धोब्याने सीतेच्या चारित्र्याबद्दल वाईट उद्गार काढले म्हणून रामाने तिचा त्याग केला. ऐन मध्यान्हीचे वेळी सीतेस जंगलात सोडावे असा हुकूम लक्ष्मणाला सोडणारा राम देव माणूस होता काय ? रामाने सीतेच्या बऱ्यावाईटपणाची चौकशी १० वर्ष केली नाही, त्यामुळे त्याजकडे न जाता तिला धरणी मातेची आराधना करून आत्महत्त्या करावी लागली. ज्या रामाला लोक देव मानतात, त्याचे चरित्र असे होते.
आता कृष्णाकडे वळू. महाभारताच्या लढाईत कृष्ण ही प्रमुख व्यक्ती होती आणि त्यावेळी कृष्णाने आपला लांडा कारभार केला नसता तर कदाचित कौरव पांडव या बंधु-बंधुमधील युद्ध उद्भवलेही नसते. कृष्णाने दोन्ही पक्षांना एकमेकांविरूद्ध चिथाविले आणि त्यांच्या युद्धाचे रणकुंड पेटविले. एखाद्या व्यक्तिकडे अमुक गोष्टी मागण्यासाठी जा, असे कृष्ण एकास सांगत असे, तर आलेल्या माणसाचे म्हणणे ऐकू नका असे दुसऱ्यास बनवीत असे.
या गोष्टी का देव माणसाच्या व पवित्र व्यक्तीच्या हातून घडतात ? मग कृष्णाला आपण देवाचे स्थान कसे देणार ? हे मी काही खोटे सांगत नाही. महाभारतात व इतर धर्मग्रंथातच कृष्णाच्या आगलावेपणाबद्दल पुरावा आहे. तुझी आई तुला नग्नावस्थेत पाहील तर तू वज्रदेही बनशील असे कोणीतरी दुर्योधनास सांगितले होते. ही गोष्ट जेव्हा कृष्णास कळली तेव्हा कृष्ण गांधारीच्या घरी गेला. ज्यावेळी दुर्योधन घरी निघाला त्यावेळी कृष्णाने दुर्योधनास त्याच्या नग्न स्थितिसंबंधी काही विचारले आणि शरीर झाकण्यास सांगितले. गांधारीस दुर्योधनाच्या शरीराचा जेवढा भाग पाहावयास मिळाला तेवढा भाग वज्रदेही बनला. हे गुपित कृष्णास माहित असल्याने त्याने ते सर्वांना सांगितले आणि त्या गुपितावर घाला घालून भीमाने दुर्योधनाचा वध केला.
दुर्योधनाच्या मरणाचे गुपित कृष्णास माहित होते. अर्जुनाचे मरण टाळण्यासाठी कृष्णाने दुष्ट योजना केली द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा हा जेव्हा कृष्णाने दुखवत होता तेव्हा कृष्णाने द्रोणाचार्यास विपर्यस्त माहिती दिली आणि धर्मराजास” नरो वा कुंजरो ” असे विधान करावयास भाग पाडले. कृष्णाच्या फसव्या कृत्यामुळे शिशुपाल एवढा संतापला की कृष्णाला भर दरबारात त्याने शिव्या दिल्या. शिशुपालाच्या या निर्भय वृत्तीमुळे देवादिकांना देखील आनंद झाला आणि कृष्णाची खरडपट्टी केली म्हणून त्याजवर पुष्पवृष्टी जाहीरपणे करण्यात आली. कृष्ण हा देव नव्हता. एवढेच नव्हे तर सामान्य माणसा- पेक्षा तो हीन होता, हे सिद्ध करण्यासाठी अशी किती तरी उदाहरणे देता येतील.
म्हणून आपण बुद्ध जयंती साजरी करीत आहोत आणि तुम्हास मी सांगू इच्छितो की जरी सध्या हिंदू धर्माइतका बौद्ध धर्माचा प्रसार भारतात नसला तरी स्वातंत्र्य प्राप्तीपासून जनतेची मते बौद्ध धर्माकडे अधिक झुकत आहेत. तुम्ही घटकाभर विचार करा, जवळ जवळ २,५०० वर्षांनी बुद्ध जयंती येथे साजरी केली जात आहे. बौद्ध धर्माकडे आजपावेतो दुर्लक्ष केले तरी बुद्ध जयंती साजरी होते. ही गोष्ट असामान्य नव्हे असे कोण म्हणेल ? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‘आपले’ म्हणता येईल, अशा तत्त्वज्ञानाची आपल्याला आवश्यकता आहे. हिंदू संस्कृतीत आपण पुष्कळ शोधून पाहिले पण त्यात विशेष काहीच सापडत नाही. फक्त बौद्ध धर्मामधूनच खऱ्या ज्ञानाचे किरण दिसतात आणि बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान असल्याचे आपण जगाला सांगू शकतो.
आपल्या राष्ट्रध्वजावर बुद्धाचे चक्र आहे. आपली राजमुद्रा बौद्ध तत्त्वज्ञानावर अधिष्ठित आहे. शिवाय, नवीन भारतीय घटनेप्रमाणे आपल्या राष्ट्राध्यक्षास जेव्हा अभिषेक करण्यात आला तेव्हा बुद्धाची मूर्तीच सर्वात श्रेष्ठ मानण्यात आली.
हिंदू धर्म इतर धर्माहून कसा श्रेष्ठ आहे, याचे उत्तर हिंदू लोक देऊ शकतील काय ? अस्पृश्यांचे जीवन बरबाद करण्याची ताकद हिंदू धर्मात आहे, म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ म्हणावयाचा काय ? एखादा अस्पृश्य ब्राह्मणापेक्षा अधिक गुणसंपन्न असला तरी तो ब्राह्मणासमान होऊ शकत नाही, अशी शिकवण हिंदू धर्म देतो म्हणून तो श्रेष्ठ म्हणायचा काय ? *एखाद्या अस्पृश्याने पवित्र उद्गार काढले तर त्याची जीभ छाटली जावी, हे रास्त आहे काय ? अस्पृश्य मनुष्य गुरू होऊ शकत नाही म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ आहे काय ? तप्त शिसे अस्पृश्यांच्या कानात ओतावयास सांगणारा ” हिंदू धर्म ” “धर्म” या संज्ञेस पात्र आहे काय ?
या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीच पाहिजेत. कोणता धर्म चांगला व कोणता धर्म वाईट हे आतापर्यंत तुम्ही ओळखलेच असेल. ज्यांना विचार, शिक्षण व स्वातंत्र्य लाभले नाही ते हिंदू संस्कृतीस कशी मान्यता देतील. शूद्रांना ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांची फक्त चाकरी करण्यास सांगितले होते.
आश्चर्याची गोष्ट अशी की हे ब्राह्मण कधीच राज्यकर्ते बनले नाहीत. राज्य करणारे लोक नरकात जातात अशी ब्राह्मणांची समजूत होती. ब्राह्मण लोकांना नरकाची मोठी भीती वाटते, म्हणून क्षत्रियांना राज्य करण्याची ब्राह्मणांनी मुभा दिली. तेव्हा या सौद्यात शूद्र आणि अस्पृश्य कसे भागीदार ठरतील ? आपण अस्पृश्य म्हणून हिंदू धर्मात राहावयाचे की धर्म बदलावयाचा या संबंधी विचार करण्याची वेळ आता आली आहे. मला व्यक्तिशः हिंदुंचा मग्रूरपणा व विषमता मुळीच मान्य नाही. बौद्ध धर्म व हिंदू धर्म यात केवढा तरी फरक आहे. *बौद्ध धर्म जातीविरहित एकजिनशी समाजरचनेचा पुरस्कार करतो तर हिंदू धर्म जातीवरच मुख्य अधिष्ठान ठेवतो. हिंदुंच्या हरेक जातीमध्ये चिरेबंदी भिंत घालून विभागणी करण्यात आली आहे.*_
दरेक व्यक्तिमात्रास, समाजास व सरकारास धर्माची आवश्यकता आहे. हे कोणीही नाकारू शकणार नाही. खऱ्या धर्माशिवाय कोणाचीही प्रगती होणार नाही. तेव्हा कोणता धर्म श्रेयस्कर हे तुम्ही ठरविले पाहिजे. बौद्धवाद व ब्राह्मणवाद यामधील फरक व भेद नीट लक्षात ठेवण्यास मी तुम्हास सांगत आहे. यापैकी एकाची तुम्हास निवड करावयाची आहे. बुद्ध हा मानव होता. बुद्धाची तत्त्वे जातीय वर्गाविरुद्ध होती. बुद्धाने सामान्य जनतेत वास्तव्य केले आणि मानवी दृष्टिकोनातून जनतेची दुःखे दूर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आजपासून कोणता धर्म तुम्हास उपकारक आहे, हे तुम्हास ठरवावयाचे आहे आणि ते स्वातंत्र्य तुम्हास निर्विवादपणे आहे.
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
संकलन – महेश कांबळे
दिनांक :- ०२/०५/२०२४
संदर्भ :-
१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३, पान नं १९९-२०३
_२) जनता: १३ में १९५०
संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत