श्री जे एफ रिबॅरो यांना अनावृत्त पत्र –सुरेश खोपडे
सर नमस्कार ,
मी आपला लोकसत्ता वर्तमानपत्रातील सदानंद दाते आयपीएस यांचे बद्दल लिहिलेला लेख वाचला. केंद्रीय तपास यंत्रणा NIA चे डायरेक्टर म्हणून नेमणूक झाल्याबद्दल आपण श्री सदानंद दाते यांचे अभिनंदन केल्याचे पत्र वाचले. सदानंद दाते व मी एकत्रितपणे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये काम केलेले आहे. ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्याबद्दल लिहिताना तुम्ही असा उल्लेख केला की, “ते ज्या समाजामधून येतात तो समाज सत्य आणि न्याय, मूल्य प्रणाली, साधी राहणी , उच्च विचारसरणी यासाठी ओळखला जातो.” माझ्या माहितीप्रमाणे दाते हे ब्राह्मण समाजातून आलेले आहेत. त्या ब्राह्मण समाजातील किती अधिकारी वर नमूद केलेले गुण आचरणात आणण्यासाठी प्रसिद्ध आहेत? याबद्दल मी केलेल्या परिस्थितीजन्य अभ्यासातून (empirical study) अनेक प्रश्न उपस्थित होतात.
ब्राह्मणच काय कोणतीही जात ही बायोलॉजिकल/ नॅचरल नसते .ती सायकॉलॉजिकल म्हणजे कृत्रिम असते. त्यामुळे एक जात श्रेष्ठ / सच्ची व दुसरी नीच/ लूच्ची असते याला कुठलाच शास्त्रीय आधार नाही. हो पण जाती-जातीमध्ये बाल संगोपन व संस्कार वेगळे असल्याने त्यांच्या वर्तनावर परिणाम होतो. ब्राह्मण वर्ण/ समाज सत्वगुणी व भूतलावरील देव असतो, ब्राह्मण कितीही भ्रष्ट असला तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ असतो असे आमच्या हिंदू धर्मग्रंथात लिहिले आहे. ते तसे त्यांच्या अबोध मनात साठलेले आहे.
तुमच्याबद्दल माझा व्यक्तिगत अनुभव शेअर करण्यासारखा आहे.माझी पहिली नेमणूक पनवेल येथे डीवायएसपी म्हणून झाली होती. त्या काळात 22 वर्षे फरारी असलेल्या राम आणि श्याम या दरोडेखोरांवर छापा घालण्याचे ठरवले पण त्याच दिवशी माझ्या भावाचा फोन आला की आईला हृदय विकाराचा झटका आलेला आहे आणि ती तुझी आठवण काढत आहे. असे असतानाही मी आईला भेटायला जाणे ऐवजी दरोडेखोरांच्या मोहिमेवर गेलो. तिथे मला तीन गोळ्या लागल्या तरीही आम्ही दरोडेखोरांना खल्लास केले. आईला चांगल्या दवाखान्यात दाखविणे आवश्यक होते पण अपॉइंटमेंट मिळाली नाही मग मी डॉक्टरी सल्ल्याविरुद्ध दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन तुम्हास भेटलो. त्यावेळी तुम्ही मुंबई पोलीस कमिशनर होतात. तुम्ही आस्थेने चौकशी केली . व बॉम्बे हॉस्पिटल मधील डॉक्टर गोयल यांची अपॉइंटमेंट मिळवून दिली. माझ्यासारख्या अगदी ज्युनिअर अधिकाऱ्याला चेअर मधून उठून दारापर्यंत सोडवायला तूम्ही आले. विशेष म्हणजे त्या दिवशी मला अपॉइंटमेंट मिळाली का याची तुम्ही स्वतः खात्री केली होती. मलाच नव्हे तर असंख्य पोलीस अधिकारी व सामान्य जनतेला तुमच्या चांगुलपणाचा अनुभव आलेला आहे. दाते यांच्या ब्राह्मण समाजातील सर्व अधिकाऱ्यांचे वर्तन तुम्ही म्हटल्याप्रमाणे तसे असते का?
रामशाम दरोडेखोर चकमकीमध्ये माझे तत्कालीन पोलीस अधीक्षक पुरुषोत्तम जाधव यांनी शौर्य पदकाबद्दलचा हेतू पुरस्सर चुकीचा अहवाल पाठवला. तो दुरुस्त करावा त्याबद्दल मी आग्रह धरला. तत्कालीन पोलीस महासंचालक एस एस जोग यांनी दखल घेतली नाही.उलट ‘कामाबद्दल पुरस्कार मागणे हा तुमचा हक्क नाही’ असे लेखी उत्तर दिले. पुढे महाराष्ट्र गुप्तचर संघटनेमध्ये मी उपायुक्त होतो व जातीय दंगली हा विषय मी हाताळीत होतो. चर्चे दरम्यान जातीय दंगली हाताळण्याची महाराष्ट्र पोलिसांची कार्यपद्धती ही फायर ब्रिगेड सारखी असते असे विधान मी करित असे व नक्की कशा पद्धतीने दंगली थांबविल्या पाहिजेत याबद्दलचे मॉडेल मी चर्चेमध्ये मांडत असे. (पुढे त्याच निरीक्षणा नुसार मोहल्ला कमिटी हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेला प्रयोग मी भिवंडी मध्ये राबविला होता.) पुराण मतवादी वसंत सराफ यांना माझ्यासारख्या गवार अधिकाऱ्याने सल्ला दिल्याचे आवडले नसावे आणि म्हणून त्यांनी माझा वार्षिक अहवाल खराब लिहिला. त्यात उल्लेख केला की सुरेश खोपडे यांच्यामध्ये विचार करण्याची दुर्बलता ही प्राकृतिक दृष्टीने(inherent inability)आलेली आहे.( याला आधार मनुस्मृती व भगवद्गीता गीता आहे.) त्यांच्या दृष्टीने मी मराठा क्षत्रिय असल्याने विचार करणे हा क्षत्रियाला अधिकारच नाही. मला कमी लेखणारा शेरा लिहिला त्याविरुद्ध मी अपील केले. उत्तरात मी म्हटले की मी एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आलो व राम शाम दरोडेखोरां चा सामना केला.राम शाम शोध दरोडेखोरांचा हे पुस्तक लिहिले. त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. असा अधिकारी प्राकृतिक दृष्ट्या दुबळा कसा असू शकतो? ते अपील पोलीस महासंचालक एस एस जोग यांनी कचऱ्याच्या टोपलीत फेकले. पुढे आयपीएस केडर प्रमोशन कमिटी मध्ये मेंबर असलेले डी एस सोमण यांनी पुढाकार घेऊन माझे प्रमोशन रद्द केले. मला ज्युनियर असलेले 36 अधिकारी कायमचे सीनियर बनले. यातील वसंतराव सराफ हे हयात आहेत (त्यांना उदंड आयुष्य लाभावे) त्यांनी आजही याबद्दल आपले स्पष्टीकरण द्यावे.
फ्रायबॉर्ग युनिव्हर्सिटी स्विझर्लंड येथील जागतिक परिषदेमध्ये भिवंडी प्रयोग सादर करण्यासाठी मला निमंत्रण मिळाले. मी रीतसर अर्ज केला. आठ महिने तो अर्ज अरविंद इनामदार यांनी दडपून ठेवला व जाण्यासाठी चार दिवस बाकी असता तो मंजूर केला. तयारी, विमान बुकिंग, व्हिसा कधी करणार?
महाराष्ट्र गुजरात राजस्थान येथे धुमाकूळ घालणाऱ्या ज्वाला सिंगला त्याच्या 67 साथीदारासह आमच्यासमोर शरण यायला मी भाग पाडले.त्यावर मी एक शोध निबंध लिहिला. पोलीस महासंचालक यांच्या वार्षिक बैठकीमध्ये सादर करण्यासाठी पाठविला व मंजुर झाला. पण अरविंद इनामदार यांनी तो पेपर वाचू दिला नाही. एस आर पी रामटेकडी येथे श्रमदानातून श्रेष्ठता नावाचा प्रकल्प उभा केला.तो प्रकल्प एकेकाळी पुणे शहरातील पर्यटन स्थळ होते. त्या उद्घाटनाला इनामदार यांना बोलावले असता आम्हा पोलिसांचे कौतुक करण्याऐवजी बिन पाण्याने खरडपट्टी केली. अरविंद इनामदार हा देखील सत्वगुणी ब्राह्मण समाजातील होता. पण तो एवढा खुनशी व खुजा होता यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.
जयंत पाटील गृहमंत्री असताना माझी बदली पोलीस एस्टॅब्लिशमेंट या महत्त्वाच्या पदावर झाल्याचे समजले होते. पण मला लेखी ऑर्डर मिळाली नव्हती.मी वाट पाहत राहिलो एवढ्या महत्त्वाच्या पोस्टवर मी राहणे आयपीएस अधिकाऱ्यांना अडचणीचे वाटले असावे त्या ठिकाणी सुरेश कक्कर हे अधिकारी होते. मला त्या ठिकाणी हजर होऊ दिले नाही उलट 11 महिने विदाऊट पे वेटिंग मध्ये ठेवले. त्याच काळात माझी एक वेतन वाढ देय होती. वेतन वाढ देण्याऐवजी तत्कालीन महासंचालक ए एन रॉय यांनी शासनाला कळविले की सुरेश खोपडे हे मिळून येत नाहीत म्हणून त्यांची वार्षिक वेतन वाढ देऊ नये. त्याच काळात मी माझा पासपोर्ट रिन्यूअल साठी पाठवला असता याच एन रॉय यांनी नकार कळविला. ज्यांना आपला एक आयपीएस दर्जाचा अधिकारी मिळून येत नाही तेच ए एन रॉय महाराष्ट्रातील एक आदर्श आयपीएस अधिकारी ठरतात.
अकोला येथे पोलीस अधीक्षक असताना एक आगळा वेगळा प्रयोग सुरू केला होता. तत्कालीन गृहमंत्री भुजबळ यांनी रेंज आयजी पंकज गुप्ता यांच्या संगनमताने पाच महिन्याच्या आत माझी बदली केली. त्या प्रकरणात तत्कालीन पोलीस महासंचालक के के कश्यप व अतिरिक्त पोलीस महासंचालक अनिल ढेरे यांनी माझेविरुद्ध अँटी करप्शन मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. हे दोघेही दातेंच्या समाजातील ब्राह्मण अधिकारी आहेत. ज्या प्रकल्पामध्ये मी एक साधा चहा सुद्धा प्यालो नाही त्या प्रकल्पाबद्दल के के कश्यप व ढेरे यांनी अँटी करप्शन विभागातर्फे चौकशीचे आदेश दिले. पण हेच कश्यप आयपीएस मध्ये निवड झाल्यावर एक साधी ट्रंक घेऊन कल्याण स्टेशनला उतरले होते व आता त्यांचे असंख्य ठिकाणी बंगले आहेत. त्यांनी माझे विरुद्ध चौकशीचे आदेश दिले. पुढील नऊ वर्ष चौकशीचा ससेमिरा चालू होता.
अकोला प्रकरणामध्ये पंधरा दिवसात सुरेश खोपडे यांना जेलमध्ये डांबतो असे म्हणणारे अँटीकरप्शनचे प्रमुख राहुल गोपाल हे एक लाखाची लाच घेताना स्वतःच जेलमध्ये अडकले. मी मात्र छाती पुढे काढून वयाच्या 60 वर्षापर्यंत पोलीस दलात काम केले आणि सन्मानाने निवृत्त झालो. कश्यप आणि ढेरे हे आजही हयात आहेत त्यांनी याबद्दल जाहीर स्पष्टीकरण द्यावे अशी विनंती आहे.
उभ्या नोकरीमध्ये पहिल्यांदा ए ग्रेड म्हणजे आऊटस्टँडिंग ऑफिसर असा शेरा मी अमरावती एस आर पी ला असताना मिळाला होता. तो इकबाल अहमद या अधिकाऱ्याकडून. पण पुढे रिव्ह्यू करणारे अधिकारी अरुप पटनाईक यांनी तो खोडून काढला व त्या खालचा शेरा दिला. गुजरात दंगलीनंतर गुजरात पोलिसांनी मोहल्ला कमिटी हा प्रयोग समजून घेण्यासाठी मला खास निमंत्रित केले होते. रीतसर केलेला अर्ज पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी कोणतेही सबळ कारण नसताना नाकारला. मग मी किरकोळ रजा काढून त्या कार्यक्रमाला गेलो. सादरीकरण आवडल्याचे सांगून सर्व अधिकाऱ्यांनी उभे राहून माझे अभिनंदन केले. संजीव दयाळ यांनी राकेश मारिया यांना मी कसा गेलो याबद्दलची चौकशी करण्याचे आदेश दिले. केवढा हा खूजेपणा!
चीनमध्ये मोठी प्रगती झाली. त्याचे फायदे काही गटांना पोहोचले. काहींना पोहोचले नाहीत. म्हणून तिथे तणाव वाढलेला आहे.सामाजिक तणाव कमी करण्याचे जगभर कोणकोणते प्रयोग झालेत याबद्दलची विचारणा चीन सरकारने अमेरिकेतील एका संस्थेकडे केली. त्यांनी जगभरातील 21 प्रयोगांची यादी चीन सरकारला सादर केली. त्यात भिवंडी प्रयोग होता. वांगचुक येथे होणाऱ्या जागतिक परिषदेचे रीतसर निमंत्रण मला मिळाले. सगळा खर्च ते सरकार करणार होते. पोलीस महासंचालक कार्यालयाने शेवटपर्यंत परवानगी दिली नाही की नकारही कळविला नाही. शेवटच्या क्षणी होम डिपार्टमेंटला लेखी कळवून मी रजा घेऊन चीनला गेलो .तिथे भिवंडी प्रयोग हा सर्वोत्कृष्ट ठरला. महासंचालक कार्यालयात परवानगी देण्याचा माझा अर्ज गेली सतरा वर्ष पडून आहे. त्यावेळी ए एन रॉय हे महासंचालक होते.
नागपूर येथे महाराष्ट्र स्पोर्ट्स निमित्त कार्यक्रम चालू होता. आयपीएस अधिकाऱ्यांचे डिनर ठेवले होते .त्या ठिकाणी दोन अधिकारी जे जिल्हाप्रमुख होते पण आयपीएस नव्हते ते सहकुटुंब निमंत्रणावरून हजर होते. पण ते आयपीएस नसल्याने त्यांना त्या हॉल मधून हाकलून देण्यात आले. तेही नागपूर पोलीस कमिशनर जयंत उमराणीकर यांच्या आदेशानुसार! रिबॅरो सर आपणाला या गोष्टी नवीन वाटतील कारण तुम्ही ख्रिश्चन धर्म संस्कारात वाढला आणि मी हिंदू धर्म संस्कारात वाढलो. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असे का वागतात याबद्दल फ्रेड रिग्ज यांनी फिलिपाईन्स, भारत, इंडोनेशिया यासारख्या प्रगतिशील देशामधील प्रशासनाचा अभ्यास केला. त्यांनी एक सूत्र सांगितले की या देशातील प्रशासन व्यवस्था ही त्या देशातील सामाजिक व्यवस्थेची उप व्यवस्था असते. भारतात मनुस्मृतीवर, वर्ण, जात उतरंडीवर आधारित सामाजिक व्यवस्था आहे. भारतातील प्रशासकीय व्यवस्थेतील प्रत्येक वरिष्ठ अधिकारी हा ब्राह्मणासारखा वागायला लागतो. आणि तो जर ब्राह्मण असेल तर मग प्रश्नच नाही. जोग, वसंत सराफ, अरविंद इनामदार, ए एन रॉय, यासारखे अधिकारी ब्राह्मणासारखेच वागतात. आपण मालक समाज (master race) असून इतर हे गुलाम समाज (slave race)मधील आहेत अशी त्यांची अबोध मनातील विचारधारा असते. ती त्यांच्या बालसंगोपणातून त्यांच्यावर बिंबविली जाते.
सदानंद दाते यासारखे अगदी मोजके अधिकारी यातून बाहेर पडतात व स्वतः मधील लोकशाहीतील एक अधिकारी व माणूस जागा ठेवतात. स्वातंत्र्यानंतर याच ब्राह्मण अधिकाऱ्यांचे प्रशासनाच्या प्रत्येक विभागामध्ये वर्चस्व होते. त्यांनी आपले श्रेष्ठत्व कायम ठेवत बहुजनांच्या हिताचा प्रत्येक प्रयोग हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी व त्यांच्या राजकारण, प्रशासन, न्याय, प्रसारमाध्यमे, समाजकारण, शिक्षण संशोधन या व इतर क्षेत्रातील स्वतःला ब्राह्मण म्हणून घेणाऱ्यांनी नागपूरच्या रेशीम बागेच्या विचाराला सुसंगत असे सरकार आणण्यामध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे.
रिबॅरो साहेब तुम्ही पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांच्या कृतीचा निषेध केलेला आहे परंतु एकटे मोदी हे करू शकत नाहीत. त्यांना या सर्व आर्य ब्राह्मण सनदी अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे किंबहुना हे सर्वजण नरेंद्र मोदी यांचे मार्फत करवून घेत आहेत. रिबॅरो साहेब आपणास एवढेच सांगावयाचे आहे की सदानंद दाते हे स्वतःला आर्य ब्राह्मण म्हणवितात की नाही हे माहीत नाही पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता ते ज्या समाजामधून येतात तो समाज सत्य आणि न्याय, मूल्य प्रणाली, साधी राहणी, उच्च विचारसरणी यासाठी ओळखला जातो” हे खरे नाही. ब्राह्मण श्रेष्ठत्व कायम राखत इतर समाजाचे शोषण करत असलेली ती एक मालक जमात (master race) आहे. देशांमध्ये मनुस्मृति राहावी व त्या पद्धतीने प्रशासन असावे याच विचाराचे आहेत. हवे तर आपण जाहीर चर्चा करूया!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत