हाताची घडी आणि तोंडावर बोट!
संपादकीय(अवेक इंडिया)
‘जेव्हा लोकशाहीची लक्तरं वेशीवर टांगली जात होती, जेव्हा आमच्या भवितव्याची राख रांगोळी केली जात होती, जेव्हा समाजाला पुन्हा गुलाम बनविण्यासाठी प्रतिक्रांती केली जात होती तेव्हा तुम्ही कुठे होता?’ येणारी पिढी आपल्या पालकांना हा प्रश्न विचारणारच आहे.
गेल्या दहा वर्षात हा देश एवढा अस्थिर झालेला आहे की येणारा काळ हा फारच महाकठीण ठरणार आहे. बृहदथाची हत्या करून ज्याप्रमाणे विषमतावादी व्यवस्थेची स्थापना केली, त्याकाळी त्याने बुद्धाच्या जनकल्याणी, समतावादी विचारांचा व लोकगुरूंचा, भिक्खूंचा ज्या पद्धतीने नाश करून या देशात अंधार युगाची सुरुवात केली त्याहीपेक्षा भयानक पद्धतीने विद्यमान शासनकर्ते संविधानाची उघड उघड हत्या करून संपूर्ण लोकशाहीचाच नाश करण्यात गुंतलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला सन्मान व प्रतिष्ठा देणाऱ्या नैतिक पाया असलेल्या संविधानावर आधारलेली लोकशाही जोपर्यंत या देशात शाबूत आहे तोपर्यंतच या देशातील बहुजनांना काही किंमत उरणार आहे, पण गेल्या दहा वर्षात या संविधानाला तुडवून त्यावर नाचण्याचा नीज प्रकार सुरू आहे. याबाबत खरे तर आक्रोश निर्माण झाला पाहिजे होता. मात्र आपल्या हिताचे अहिताचे काय आहे काय नाही हे, अजिबात न समजू शकणारी व धर्म कशाला म्हणतात हेही न समजू शकणारी बहुतांश जनता नाचणाऱ्याच्या तालावर डोलू लागली आहे, ही चिंतेची बाब आहे. या बेताल नाचणाऱ्या निर्बुद्ध देशद्रोही कटपुतली बाहुल्याची सूत्र पुष्यमित्र शृंगाच्या वैचारिक वंशाच्या कडेच आहेत हेही काही दडून नाही. रोग संक्रमक संप्रदाय (RSS) स्थापन करून या देशातील संविधानालाच नष्ट करण्याची शपथ त्यांनी संविधान निर्मिती वेळेस घेतली होती कारण या देशातील संविधानाने सर्वांना न्याय स्वातंत्र्य समता व स्नेहसमादर बहाल केला होता. मनुस्मृतीने बहुजन समाजाला जे जे अधिकार अत्यंत वाईट पद्धतीने नाकारले होते ते सर्व संविधानाने पुन्हा बहाल केले होते. त्यामुळेच या वर्ण जात वर्चस्ववादी ब्राह्मणवाद्यांना पोटशुळ उठला होता त्यामुळे त्यांनी कसेही करून या संविधानाला उकडून फेकण्याची प्रतिज्ञा केली होती ‘जणू जोपर्यंत संविधानाचा नाश करणार नाही तोपर्यंत शेंडीला गाठ मारणार’ नाही अशा प्रकारची प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे. 1950 ते 2013 पर्यंत संविधानाची निर्धारपूर्वक अंमलबजावणी करून जनतेला एका स्तरापर्यंत न आणणे हा संविधान नष्ट करण्याचा एक छुपा प्रकार होता. नंतर उघडपणे दुसरा प्रकार दुसऱ्या टीमने सुरू केला 2014 पूर्वी सत्तेत आड मार्गाने घुसून त्यांनी उंदराप्रमाणे संविधान कुरतडण्यास सुरुवात केली होती आणि 2014 नंतर त्यांनी वाळवी प्रमाणे संविधानाचा नाश केला आहे. मौर्य समाजाचा नाश करण्यासाठी या विषमता वाद्यांना त्याकाळी 140 वर्षे वाट पहावी लागली पण भारतीय संविधानिक लोकशाहीचा नाश केवळ 75 वर्षात केला जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकी 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास तर आपण या देशाचे संविधानच बदलून टाकू असे या संप्रदायाचा एक प्रवक्ता एक मंत्री आनंद हेगडे नामांक म्होरक्या खासदार बोलला आहे. गेली दहा वर्षे हा ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे हे यावरून लक्षात यायला हवं.
या देशात गेल्या दहा वर्षात अशा अनेक घटना घडल्या की ज्यात जनतेच्या संविधानिक अधिकारांची उघड उघड हत्या केली गेली. त्याच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांना एक तर जिवानिशी संपविण्यात आलं, नाही तर जेलमध्ये सडविण्यात आलं. लोकशाहीचे जे स्तंभ आहेत ते एकेक करून जमीन दोस्त करण्यात आले प्रशासन तर अशाप्रकारे वापरले गेलं की त्यात सर्वसामान्य जनता चिरडून जाईल आणि थेट दोष सरकारवर येणार नाही. त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी न्यायव्यवस्था उपलब्ध आहे पण त्याचेही कधीकाळी सताड उघडे असलेले दरवाजे बंद करून केवळ खिडक्याच उघड्यातल्या जात असल्याचे कधीकधी जाणवते. अर्णव गोस्वामी या गोदी मीडियाच्या अँकर ला एक दिवसात सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळतो तर सीएए विरोधात शाईन बाग आंदोलनात सहभागी झाल्याने दिल्ली दंगलीचा ठपका ठेवून तुरुंगात टाकलेल्या उमर खालीद या विद्यार्थ्याला तीन वर्ष जामीन मिळत नाही. शेवटी त्याने जामीन अर्जच मागे घेतला अशा प्रसंगी ठराविक लोकांसाठी न्यायालयाने दरवाजे उघडे ठेवले व ठराविकांसाठी तावधानही बंद करून टाकले आहेत की काय असा प्रश्न पडतो. माजी सरन्यायाधीश जेव्हा भाजपाच्या कोट्यातून खासदार बनतो, एका उच्च न्यायालयाचा न्यायाधीश जेव्हा राजीनामा देऊन भाजपमध्ये सहभागी होतो, तेव्हा ही वाळवी कुठे कुठे घुसली आहे याची कल्पना येते. संसदेमध्ये तर विरोधकांचा आवाज सरळ सरळ दाबून टाकला जात आहे संपूर्ण देश हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे पण तो काहीच हालचाल करत नाही कारण लोकशाहीचा आणखी एक स्तंभ मानला जातो तो म्हणजे माध्यमं. ही माध्यमं निर्लज्ज दलालीच्या दलदलीत फसलेली आहेत. लैंगिक अत्याचार करणाऱ्या भाजपा खासदार विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला पहलवानांनाच पोलिसांनी मारहाण करणे, रेल्वे सुरक्षा दलाचा एक कर्मचारी मुस्लिम प्रवाशांना गोळ्या घालून ठार करतो, एक पोलीस अधिकारी नमाज पडणाऱ्यांना लाथ मारतो, किमान हमीभावाची मागणी करणाऱ्या शेतकरी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या जातात, शिक्षण व्यवस्थेतून इतिहास व विज्ञान पुसून आपल्याला पाहिजे तो बनावटी इतिहास बनावटी विज्ञान शिकविण्याचे कारस्थान रचले जाते, मणिपूरमध्ये गृह युद्धजन्य परिस्थिती आहे, काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हटविल्यानंतर सर्वकाही विस्कळीत केलेले आहे, लडाखमध्ये जनतेचे राज्य स्थापनेसाठी पर्यावरण रक्षणासाठी रोजगारासाठी आंदोलन सुरू आहे, त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे व मुख्य धारेतील माध्यमं ही त्याबाबत अवक्षर काढत नाहीत, उलट विरोधकांनाच धारेवर धरत आहेत. हे सर्व या देशात होत आहे, याही पुढे जाऊन इलेक्ट्रोलर बॉण्ड्सच्या नावाखाली हा संविधानिक पद्धतीने करोडो रुपयांचा निवडणूक फंड गोळा केला गेला. सर्वोच्च न्यायालयानेही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले व इलेक्ट्रॉनिक बोंड बाबतचा कायदा संविधानिक ठरवला. एसबीआय ला कोणत्या राजकीय पक्षाला कोणी किती निधी दिला हे उघड करण्याचा आदेश दिला त्यालाही टाळण्याचा प्रयत्न एसबीआय ने केला हे सर्व भ्रष्टाचार सुरूच आहेत. याशिवाय एकीकडे ईव्हीएम मशीन हॅक केलं जातं असल्याचा आरोप होत असताना संपूर्ण निवडणूक आयोगच हॅक केला गेला आहे असे चित्र दिसून येत आहे. चंदीगड मेयर निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी कशाप्रकारे विरोधकांच्या मतपत्रिका बाद करतो हे सर्व देशाने उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत नाराजी व्यक्त केली. लोकशाहीचा प्राण असलेली निवडणूक प्रक्रिया अपारदर्शक करून टाकण्यात आली आहे. त्यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आहे. सरकारच्या मुजोरीच्या, मनमानीच्या अशा अनेक घटना गेल्या दहा वर्षात घडल्या आहेत. विद्यमान संविधान असताना जर ही अवस्था असेल तरी संविधान बदलले गेले तर काय अवस्था असेल याचा नमुना मनुस्मृतीच्या रूपाने आपल्यासमोर आहेच.
अशा या अस्थिर परिस्थितीत जर कुणाचे भले झाले असेल तर ते अडाणी, अंबानी सारख्या मोजक्या उद्योजकांचेच, बहुजनांचे प्रश्न मागे पडले, त्यांची चर्चा होऊ शकली नाही, तर त्यावर तोडगा निघणे दूरच. महागाई बेरोजगारी या समस्या तर कायम आहेतच. बहुजनांची तोंड बंद करण्यासाठी 80 कोटी लोकांना मोफत अन्य, शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी सहा हजार रुपये, अशा बिन कामाच्या व लाचार बनविणाऱ्या योजना आणल्या आहेत, तर युवकांना दंगलखोर बनविण्याचे वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. जे युवक चांगल्या मार्गाला लागण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या वाट्याला पेपर फुटी, भरती प्रक्रिया खोळंबने, परीक्षाच न घेणे असे प्रकार सुरू आहेत. अशा सर्वच स्तरावर आपल्या कुबुद्धीने या देशातील जनतेच्या भवितव्याची राखरांगोळी केली जात आहे.
अशावेळी जे पालक आज हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आपल्या बिळात गांडूळासारखे बसून आहेत ते आपल्या पुढच्या पिढीला काय काय उत्तर देतील? जेव्हा तुमच्या भवितव्याची राख रांगोळी होत होती तेव्हा आम्ही बऱ्या वाईट मार्गाने केवळ पैसा कमविण्यात गुंतलो होतो! तेव्हा आम्ही केवळ आमच्या पुरताच विचार करत होतो! तेव्हा आम्ही तुमच्या करिअरला प्राधान्य दिलं! तेव्हा आम्हालाही वाटत होतं की काहीतरी व्हायला हवं आणि कोणीतरी ते करायला हवं! तेव्हा हे काम करणाऱ्या लोकांनी लोकांना आम्ही साथ दिली नाही! लोक आम्हाला हा धोका सांगत होती तेव्हा आम्ही तात्पुरत्या माना डोलावल्या! पण त्या गोष्टी आम्हाला प्राधान्याच्या वाटल्या नाहीत! तेव्हा आम्ही कातडी बचाव धोरण स्वीकारलं! तेव्हा प्रत्येकाकडे आम्ही संशयाने पाहत राहिलो! आणि त्यांच्या संगतीत राहून आपण आपला वेळ व पैसा वाया घालवू नये असे वाटून आम्ही गप्प बसलो! तेव्हा आम्ही एकमेकांतील कमीपणा शोधत बसलो! तेव्हा आम्ही जयंती पुण्यतिथी साजरी करण्यापर्यंतच मर्यादित राहिलो! तेव्हा आम्ही आमच्या गल्ली छाप मंडळातच कधी मधी काम करत राहिलो! तेव्हा आमच्या संघटनेत जमेल तेवढं जमेल तसं काम करत राहिलो! तेव्हा आम्ही गोंधळून गेलो होतो! तेव्हा आम्ही बधीर होऊन गेलो होतो! तेव्हा आम्ही चळवळीकडे पाठ फिरवली! चळवळीच्या लोकांना वेड्यात काढल! तेव्हा राजकारण व समाजकारण यांची आम्ही सरमिसळ केली! तेव्हा आम्हाला बाबासाहेबांनी, काशीरामजींनी पुन्हा जन्म घ्यावा असं वाटत राहिल! तेव्हा आम्ही चुकलो! काय, नेमकं काय उत्तर देतील यापैकी? किंवा यासारखे कोणतेही उत्तर दिले तरी पुढची पिढी अशा पालकांना माफ करणार नाही. तुम्हीच खरे गुन्हेगार आहात.आमच्या प्रगतीचे मारेकरी आहात असे पालकांना दोष दिल्याशिवाय राहणार नाही.
ही परिस्थिती टाळायची असेल तर आज सर्वांनीच सामाजिक व वैचारिक दिशा देणाऱ्या चळवळीत सहभागी व्हायची वेळ आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात जागृत करण्याची आवश्यकता आहे. चेतविण्याची गरज आहे व संघटित करण्याची गरज आहे. याही परिस्थितीत हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आपण बसणार असू तर येणाऱ्या काळात वेगळ्या स्वरूपात आपल्या गुलामीच्या दावणीला,अधिकार विहीनतेच्या दावणीला, दुय्यम नागरिकतेच्या दावणीला बांधले जाण्याचीच शक्यता नाकारता येत नाही.
किमान सोशल एज्युकेशन मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी तरी आळस झटकून शक्तिशाली लोकसंघ बनविण्याच्या कामाला लागायला हवं व किमान आपल्या पुढच्या पिढीला तोंड दाखवता येईल अस सकारात्मक काम करायला हव!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत