भाजपकडून पाकीट घेऊन विशाल पाटील निवडणूक लढवतायत- असा घनाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केला.


मिरज ता.२४:महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही म्हणून बंडखोरी करत भाजपकडून पाकीट घेऊन पाकीट या चिन्हावर विशाल पाटील हे निवडणूक लढवत आहेत, असा घनाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केला.
चंद्रहार पाटील यांनी मिरज पूर्व भागात संवाद यात्रा काढली. यावेळी सलगरे येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले, ‘संजय पाटील, विशाल पाटील या दोघांनाही विरोधक मानत नाही. त्यांनी कोणता विकास केला जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनता माझ्याच पाठीशी आहे. विशाल पाटील त्यांच्याच धुंदीमध्ये आहेत. एकेकाळी सांगलीतून काँग्रेसचे तिकीट वाटप केलं जायचं. तोच काँग्रेस पक्ष आज तुम्हाला उमेदवारी देत नाही. तुम्हाला २०१९ आणि २०२४ या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी का नाकारली याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे.”आपलं सांगली जिल्ह्यातलं कर्तृत्व शून्य आहे म्हणून आपल्याला काँग्रेस पक्षाने नेतृत्वाने उमेदवारी दिली नाही, हे सुद्धा तितकच खरं आहे म्हणूनच अपक्ष राहण्याची वेळ आली आहे. विशाल पाटलांनी स्वतःला खरा पैलवान म्हणणे म्हणजे आम्हा पैलवानांना चेष्टा वाटायला लागली आहे. विशाल पाटील जर पैलवान झाले, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानांनी तालमी सोडून घरी जायला पाहिजे.’
‘खरी कुस्ती ही भाजपचे संजय काका पाटील आणि माझ्यातच आहे. उगाच सहानभूतीच्या नावाखाली सांगली जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करू नये. भारतीय जनता पक्षाला सांगली जिल्ह्यातील लोक कंटाळलेली आहेत. तेच ते वादे, तीच ती आश्वासनं आणि तोच तो खासदाराचा चेहरा बघून लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळे या वेळेला सांगली जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि परिवर्तनाच्या लाटेमध्ये उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये केलेलं काम हे मला विजय मिळवून देईल यात शंका नाही.’
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत