मागच्या निवडणुकीत नवनीत राणांना पाठिंबा देऊन फार मोठी चूक झाली – शरद पवारांची कबुली.
अमरावती : लोकसभा 2024 च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारा साठी सर्वत्र सभांचा धडाका सुरू आहे. अमरावती लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी अमरावती च्या मतदारांची माफी मागितली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष म्हणाले की, मागच्या निवडणुकीत आमच्या पक्षाने इथल्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता, त्या उमेदवारासाठी मी अमरावतीत प्रचार सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना खासदार केले. परंतु मागील ५ वर्षांचा त्यांचा कार्यकाळ अत्यंत वाईट होता, तो पाहून मी अस्वस्थ झालो, मागील वेळेस माझी चूक झाली असे मला वाटते. अमरावतीकरांनी मला माफ करावे आणि झालेली चूक दुरूस्त करावी, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.
नवनीत राणा यांचा पराभव करा, असे आवाहन पवार यांनी मतदारांना केले. याआधी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंच्या पोटनिवडणुकीवेळी देखील शरद पवार यांनी सातारकरांची माफी मागितली होती. त्यावेळी सातारच्या जनतेने पवारांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊन श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. त्यानंतर आता अमरावतीकर काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत