‘जागतिक वसुंधरा दिन’ विशेष..
जगभरात दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस किंवा ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात अमेरिकेमध्ये 1970 मध्ये जॉन मॅकोनेल यांनी केली होती. पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा या दिनामागचा उ्द्देश आहे. एकूण १९३ देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.
आपण पर्यावरणाची काळजी न घेतल्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्ती जगभरात निर्माण झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे हवामान बदल होय, जो आपण सर्वजण अनुभवत आहोत. दरवर्षी या दिवशी पर्यावरण रक्षणासाठी एक थीम ठरवली जाते आणि यावर्षीची थीम आहे प्लॅनेट वर्सेस प्लॅस्टिक म्हणजेच पृथ्वी विरुद्ध प्लॅस्टिक. पर्यावरणावर दुष्परिणाम करण्यासाठी बरेच घटक कारणीभूत आहेत, त्यातील एक म्हणजे प्लॅस्टिक. प्लॅस्टिक हा अत्यंत उपयोगी असा पदार्थ आहे. परंतु, त्याचा वापर गेल्या काही वर्षात भरमसाठ वाढलेला आहे. त्याचा दुष्परिणाम सर्व पर्यावरणावर व मानवाच्या आरोग्यावर होत आहे.
त्यामुळे, या वर्षी प्लॅस्टिकचा वापर विशेषत: सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याबद्दल आणि प्लॅस्टिकचे उत्पादन 2040 पर्यंत 60% पर्यंत कमी करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येक माणसाने आपल्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी प्लॅस्टिकचे दुष्परिणाम कोणते? ते आपण जाणून घेऊया. प्लॅस्टिक हे जगातील सर्वोत्तम शोधांपैकी एक आहे. जगातील बहुतांशी सर्वच शोध प्लॅस्टिकमुळेच आपल्या हातात आलेले आहेत. परंतु, त्याचा अतिवापर आणि अयोग्य व्यवस्थापन यामुळेच या विषयावर आता गांभीर्याने दखल घ्यावी लागत आहे.
जगातील एकूण लोकसंख्या ही 730 कोटी इतकी आहे तर त्याचबरोबर या पृथ्वीवर पडून असलेलं एकूण प्लॅस्टिक याची संख्या पाहता ती 830 कोटी टन इतकी आहे. म्हणजे आज सरासरी प्रत्येक माणसाच्या नावावर अबाल वृद्धांपर्यंत सर्वांच्या नावावर बाराशे किलो कचरा आपल्या या पृथ्वीवर पडून आहे, यापैकी काही जमिनीवर तर काही नदी, नाले, समुद्रात. तयार झालेला सर्व प्लॅस्टिक कचरा हा इतर कचऱ्यामध्ये मिक्स होऊन कचरा डेपोमध्ये जातो. तो एकतर तिथे जाळला जातो किंवा तसाच पडून राहतो, किंवा ऊन वाऱ्यामुळे उडून जाणारा कचरा हा गटारे, नदी, नाले यामध्ये जाऊन अडकतो.
प्लॅस्टिक कचऱ्याचे विघटन होत नाही. जमिनीवर पडून राहिलेला प्लॅस्टिक कचरा कालांतराने त्याचे फक्त छोट्या प्लॅस्टिकच्या तुकड्यांमध्ये रूपांतर होते. त्यालाच मायक्रो प्लॅस्टिक असं म्हणतात आणि हेच मायक्रो प्लॅस्टिक वेगवेगळ्या माध्यमातून प्राणी पक्षी तसंच माणसाच्याही पोटात जाऊ शकते. जमिनीवर पडून पडून ते जमिनीखाली एका विशिष्ट स्तरावर जाऊन अडकून राहते. तसंच जे प्लास्टिक गटारे, नदी-नाले, समुद्रात जाऊन पडतं त्यामुळे गटारी तुंबतात नदी समुद्रात प्लास्टिक तरंगताना आपल्याला आढळतं. या व्यतिरिक्त उरलेला जो कचरा जाळला जातो त्यामध्ये जे प्लास्टिक मिसळलेले असते त्यामुळे टॉक्सिक केमिकल वातावरणात मिसळले जातात. वायु प्रदूषण होते. या सगळ्यामुळे आपल्याला विविध आजारांना सामोरे जावे लागते. फुफुसाचे आजार, स्किनचे आजार किंवा कॅन्सर सारखे आजार देखील उद्भवतात. आज कॅन्सर चे प्रमाण वाढण्यास प्लास्टिक हा एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा घटक ठरला आहे. आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्काने प्रदूषित आणि प्लॅस्टिकने वेढलेली पृथ्वी देण्यापेक्षा स्वच्छ सुंदर हरित पृथ्वी पुन्हा एकदा दाखवण्याचा संकल्प आपण या वसुंधरा दिनानिमित्त करूया.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत