आंबेडकरी बौद्ध समाजाची निर्णायक भूमिका.. ! – डॉ. केशव मेंढे
महाराष्ट्रात आंबेडकरी बौद्ध समाजाची काही जिल्ह्यात निर्णायक शक्ती आहे. विशेष म्हणजे हे ताकदवार मतदार जिल्हे आहेत. वर्धा जिल्ह्य़ातील बाभळे या अभ्यासक व्यक्तीने गोळा केलेली माहिती समाजमाध्यमातून झळकली आहे. त्यात सत्यता आहे.
नागपूरला बारा लाख बौद्ध मतदार आहेत. रामटेक हा मतदार संघ वेगळा झाल्यामुळे आणि 2023 च्या नवीन तरुण मतदारांची नोंदणी झाल्यामुळे ही संख्या वाढली असणारच. नागपूर, रामटेक या मतदार संघात सात सात लाख मतदार फक्त बौद्धांची असणार हे संभव आहे. मुंबईत दिड करोडफपैकी चाळीस लाख बौद्ध, अमरावतीत वीस लाखांपैकी आठ लाख बौद्ध , वर्धा पंधरा लाखांतून पाच लाख पन्नास हजार बौद्ध, अकोला वीस लाखांपैकी आठ लाख बौद्ध , सोलापूर एकोणीस लाखांपैकी आठ लाख बौद्ध, औरंगाबाद ( आता संभाजीनगर) वीस लाखापैकी सहा लाख बौद्ध, अहमदनगर बावीस लाखांतून सात लाख बौद्ध, नाशिक पस्तीस लाखांपैकी नऊ लाख बौद्ध, सातारा बावीस लाखांपैकी आठ लाख बौद्ध, वाशिम पंधरा लाखात सहा लाख बौद्ध, बुलढाण्यात पंधरा लाखात सहा लाख बौद्ध, चेंबूर पाच लाखात दिड लाख बौद्ध, डोंबिवली कल्याण वीस लाखांपैकी सात लाख बौद्ध मतदार आहेत.यात वाढ होण्याची शक्यता आहे.या मतदार संघात फक्त आंबेडकरी बौद्ध समाजाची मते एकवटली तरी चौदा खासदार आंबेडकरी पक्षाचे स्वबळावर निवडून येतात. हे वास्तव आहे. या वास्तवाची चर्चा न करता आंबेडकरी चळवळीतील अनेक बुद्धिवादी लेखक,विचारवंत काँग्रेस, राष्ट्रवादी पवार,शिवसेना ठाकरे या महाविकास आघाडीसोबत बाळासाहेब आंबेडकर जुळवून घेत नाहीत असा आव आणून लेखन करताना दिसतात.
आंबेडकरी स्वतंत्र राजकीय अस्तित्व वंचित च्या माध्यमातून फोफावत असताना ही मंडळी काँग्रेसची गुलामी करताना दिसतात. आपली सामाजिक, आर्थिक सुबत्ता,प्रतिष्ठा,सन्मान काँग्रेस, भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी मिळवून दिली काय ? या सर्व सुबत्ता आपल्या वाडवडिलांच्या आंदोलनाने आणि त्यांच्या प्रयत्नामुळे मिळाली आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत निवडून जाऊ नये म्हणून पराभूत केले. 1951-52 च्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर मुंबईतून काँग्रेस ने काजोळकरांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवारी देऊन बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला. पुन्हा 1954 मध्ये भंडारा पोटनिवडणुकीत काँग्रेस चा उमेदवार बोरकर या हरिजनाला उमेदवारी देऊन बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला. आता हिच काँग्रेस 2024 च्या निवडणुकीत अकोला येथून बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार देऊन इतिहासाची पुनरावृत्ती करताना दिसते. एकीकडे कोल्हापूरला शाहू महारांजांचे वंशज म्हणून सारे पक्ष एकवटले आहेत. हे समर्थनीयच आहे.वंचितनेसुद्धा सामाजिक ऋणानुबंध लक्षात घेऊन राजे यांचे समर्थनच केले. तर दुसरीकडे घटनेचे शिल्पकार यांचे वंशजाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने उमेदवार दिला.ही काँग्रेसची परंपरागत बदमाशी नव्हे काय? काँग्रेसने आजपर्यंत जातीयवादी,धर्मवादी राजकारणाचा बागुलबुवा करून ब्लॅकमेलिंगचे राजकारण केले आहे. काँग्रेसने सार्वजनिक उद्योगाचे गुंतवणूक न करण्याचे धोरण स्वीकारले.बीजेपीचेसुद्धा आर्थिक धोरण औद्योगिक निर्गुंतवणुकीचेच आहे. हे बाळासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे यथार्थ आहे. काँग्रेसने सार्वजनिक उद्योगांकडून गुंतवणूक काढून घेतल्यामुळे नोक-या कमी झाल्या. काँग्रेसनेच गॅट करारावर सही करून मुक्त बाजारपेठ खुली केली. आपल्या देशातून तयार होणा-या वस्तू मुक्त बाजारपेठेत टिकेल की नाही याचाही विचार केला नाही. याचा परिणाम असा झाला की,भाजपने याच नीतिचा पुढे विस्तार करून सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण केले.अदानी,अंबानीच्या हाती आर्थिक स्रोत बहाल केले. काँग्रेस आणि बीजेपी या दोघांचेही आर्थिक धोरण सारखेच आहे. कधी काँग्रेस तर कधी भाजप हे आलटूनपालटून सत्तेत राहावी हे यांचे मनसुबे आहेत.
तिसरा पर्याय उभा राहू नये हे दोघांचेही प्रयत्न असतात.या दोघांच्या मांडिला मांडी लावून बसणारे राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना आहे. नामांतर लढ्यात बौद्ध समाजाने एकजूट दाखवली होती. ती ताकद खूप मोठी होती. त्यामध्ये चळवळीत नसणारे पण बाबासाहेबांना मानणारेही सहभागी होते. ही उभी राहिलेली चळवळ नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान काँग्रेस व शरद पवारांनी केले. असंख्य बौद्ध तरुणांवर खटले भरून शरद पवारांनी आयुष्य बरबाद केले. घरी नाही पीठ,कशाला हवे विद्यापीठ अशी अवहेलना करणारे शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे होते. 1987 मध्ये शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईला ‘ रिडल्स इन हिंदुइझम’ विरोधात मोठा मोर्चा काढून दलितांची घरे जाळा असा आदेश दिला होता. हा सारा काळा इतिहास माहित असतानाही बाळासाहेब आंबेडकरांनी सरंजामी सत्तेचा पराभव करण्यासाठी देशात इंडिया व महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे मैत्रीचा हात दिला पण महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी गारुड्याचा खेळ केला. वास्तविक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे यांना वंचितला सोबत घ्यायचेच नव्हते तर राष्ट्रवादी शरद पवार व शिवसेना ठाकरे यांच्या पक्षाचे जे चिन्ह गेले व जी पक्षाची मान्यता गेली ती त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून मिळवायची आहे. काँग्रेसनी 2019 मध्ये 25 जागा लढवल्या व फक्त एक जागा जिंकता आली, व 6.12 % इतकीच महाराष्ट्रात मते मिळाली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने 48 जागांपैकी 47 जागा लढवल्या व मताची टक्केवारी 7.65 होती. म्हणजे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची मताची टक्केवारी काँग्रेसपेक्षा जास्त आहे. काँग्रेसचे इथे दुखणे आहे. हे कारण वंचित बहुजन आघाडीला न घेण्याचे आहे असे म्हणणे भाग आहे. वंचित हा महाविकास आघाडीचा घटक आहे हा महाविकास आघाडीचा खोटा प्रचार होता. फक्त कांगावा होता. 2019 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मिळालेल्या टक्केवारीनुसार वंचित सोबत काँग्रेसला – 08, शिवसेना उबाठा- 13, राष्ट्रवादी शरद पवार-06, वंचित- 06 व राजू शेट्टी 01 अशा एकूण 34 जागा निवडून आल्या असत्या. असे विश्लेषण प्रवीण जाधव यांनी मांडले. यात तत्थांश आहे. हे घडू शकले नाही. याला महाविकास आघाडीचा अहंकार जबाबदार आहे. आता अशावेळेस आंबेडकरी बौद्ध समाजाची भूमिका महत्वाची आहे.
कुठल्याही राजकीय नेतृत्वाला त्याच्या समाजाचा पाठिंबा नसेल, तर ती चळवळ उभीच राहू शकत नाही. बाळासाहेब आंबेडकरांशिवाय दुसरे राजकीय नेतृत्व नाही. महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांपैकी चौदा जागेवर सात ते आठ लाख आंबेडकरी बौद्ध मतदार आहेत. ही संख्या लक्षणीय आहे. येवढ्यावर उमेदवार निवडून येऊ शकतात. याची जाणीव काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी,शिवसेना या पक्षांना आहे, म्हणूनच हे बोंबाबोंब करतात की ,यांच्यात खूप गटबाजी आहे. यांच्यात खूप तुकडे आहेत वगैरे वगैरे. हा त्यांचा मतविभाजन करण्यासाठी खोटा प्रचार आहे. भाजपचे अनेक नेते काँग्रेस मध्ये येतात.काँग्रेसचे अनेक नेते भाजपात जातात. सत्तर टक्के राष्ट्रवादी भाजपात गेली. एवढीच शिवसेना भाजपात गेली पण यांना कोणी म्हणत नाही यांच्यात गट आहे. कोणी प्रचारही करीत नाही. आपण मात्र अपप्रचाराला बळी पडतो, आणि म्हणत सुटतो की, आपल्यात खूप गट आहेत, यापेक्षा काँग्रेस बरी. आंबेडकरी बौद्ध समाजातून असेही म्हटले जाते की,दगडापेक्षा विट मऊ. याबाबत प्रबुद्ध साठे यांनी मार्मिक टिप्पणी केली. ते म्हणतात, दगडानेही डोकं फुटणार आणि विटेनेही डोकं रक्तबंबाळ होणारच. डोकं तर फुटणारच आहे. त्यापेक्षा आपलाच राजकीय मार्ग बरा. दगडापेक्षा विट बरी या भूमिकेतून आंबेडकरी बौद्ध हा मोठ्या प्रमाणात काँग्रेस व इतर पक्षाकडे झुकलेला दिसतो. उदाहरणार्थ अकोला जिल्ह्य़ात आठ लाख बौद्ध मतदार आहेत. बाळासाहेब आंबेडकरांना 280000 लाख मते मिळाली. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्तीची मते कुठे गेली? अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यातील आहे.आपणच मते द्यायची नाही, आणि आपणच म्हणतो की, एक तरी बौद्धाचा उमेदवार निवडून येतो का? याला जबाबदार आपणच आहोत.
1980 साली बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय चळवळीला सुरूवात झाली. त्यावेळेस आंबेडकरी समाजाकडून नामांतर आंदोलन झाले.मराठा अस्मिता विरूद्ध आंबेडकरी अस्मिता असा संघर्ष पेटला.परिणामी दंगल झाली. या दंगलीत अनेक दलित व आंबेडकरवाद्यांची घरे उध्वस्त करण्यात आली. बहिष्कार टाकण्यात आले. कत्तली करण्यात आल्या.दलितांना एकाकी पाडण्यात आले. त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील गावोगावी जाऊन भांडण मिटविले. सामंजस्य निर्माण केले.ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या पुनर्वसनासाठी लढा उभारला. ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या विरोधात धर्मांध शक्तींनी फेब्रुवारी 1987 मध्ये वातावरण पेटविले होते ते क्षमविण्याचे काम बाळासाहेब आंबेडकरांनी केले. शंकराचार्याच्या गादीवर ओबीसींमधील विद्वान साधू वा संताची नेमणूक हिंदुत्ववादी संघटनांनी करावी अशी मागणी 1993 मध्ये अधिवेशनातून केली.
बाळासाहेब आंबेडकर यांनी वि.पी सिंग यांच्याबरोबर राजकीय समझोता व करारनामा केला होता. बौद्धांना सवलती, प्रशासनाकडून मागासवर्गीय जनतेवर होणारे अन्याय, अत्याचार व एससी साठी केलेले प्रावधान, अंमलबजावणी व चौकशी,एससी,एसटी. वित्तीय महामंडळांना दरवर्षी किमान दोनशे कोटीचे अनुदान मिळावे, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करावे, मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र पार्लमेंटच्या मध्यवर्ती सभागृहात लावणे इत्यादी गोष्टी वि.पी. सिंगाचे सरकार आल्याबरोबर लगेच बाळासाहेबांनी सोडवणूक केली.याला म्हणतात ईमानदारी. ‘ राजकारणात ज्याच्याशी समजोता व करार करायचा असतो तो आपल्याला विश्वास देणारा, प्रामाणिकपणे आपले प्रश्न सोडविणारा सहकारी असावा लागतो. त्याच्याबरोबरच समझोत्याचे राजकारण होऊ शकते.’ असे बाळासाहेब आंबेडकरांचे निरिक्षण आहे.बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत करार करण्याच्या प्रयत्न केला पण आघाडीने ईमानदारी दाखवली नाही.
बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या राजकीय चळवळीत कठोर परिश्रम घेतले. नागपूर जिल्ह्य़ातील बेला या गावातील दशरथ पाटील जे बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते,त्यांच्या गावी बाळासाहेब हे आंबेडकरी कार्यकर्त्याच्या सायकलवरून मागच्या सीटवर बसून प्रवास केला. अशापद्धतीने कार्यकर्ते जोडले. आदिवासी,भटके विमुक्त, मुस्लिम,न्हावी,बेलदार, ओबीसी ,रयतेचा गरीब मराठा, ज्यांची लोकसंख्या कमी आहे अशा समुहांना लोकशाहीच्या प्रवाहात आणण्यासाठी वर्षभर फिरत असतात. बाकीचे आंबेडकरी नेते निवडणुका लागल्या की बिळातून बाहेर निघतात. बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय लोकशाहीचे रुपांतर हे सामाजिक लोकशाहीत हवे होते.हे लवकरात लवकर झाले नाही तर लोकशाही उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा दिला होता. बाळासाहेब आंबेडकर सामाजिक लोकशाहीसाठी अहोरात्र परिश्रम करीत आहेत.
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,भाजपा, यांनी आंबेडकरी राजकीय चळवळीसाठी हे केले काय? या पक्षांनी दलितांच्या प्रश्नाबाबत कधी आंदोलने केलीत? कधी रस्त्यावर उतरून मोर्चे काढलेत? भोतमांगे प्रकरण,वेमुला प्रकरणात या पक्षांनी कधी न्यायासाठी जनआंदोलन उभारले? भीमाकोरेगाव दंगलीत आंबेडकरी जनतेवर हल्ले झाले. हल्ले करणाऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांचे नेते पाठीशी असल्याचे लपून राहिले नाही. जेव्हा जेव्हा आंबेडकरी बौद्धांवर संकटे आलीत तेव्हा तेव्हा बाळासाहेब आंबेडकरच धावून आलेत. ‘ नुसता विचार मांडून उपयोग नाही; तर तो अमलातही आणावा लागतो.’ पटलेला विचार अमलात आणण्यासाठी जिद्द, वैचारिक प्रामाणिकता, संघटनात्मक कौशल्य व संघटनात्मक ताकद उभी करावी लागते. घरी न बसता तो उद्देश साध्य करण्यासाठी त्याग करावा लागतो. चळवळीला वेळ द्यावा लागतो. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आचरणातून हे सिद्ध केले आहे. बाळासाहेब आंबेडकर या आंबेडकरी राजकीय नेतृत्वाने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यामातून वादळ निर्माण केले आहे. या नेतृत्वाने आंबेडकरी राजकारणाला प्रकाशात आणले आहे. लहान लहान समुहाला जोडले आहे. बाळासाहेबांमुळे ज्यांची निवडून येण्याइतपत संख्या नाही अशाही समूहाची आशा पल्लवीत होत आहे.जे आंबेडकरी पक्षाकडे पाठ फिरवत होते ते आज वंचितकडे तिकीटे मागण्यासाठी किंवा समर्थनासाठी प्रयत्न करीत आहेत. ही प्रतिष्ठा बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यामातून मिळवून दिली.
आंबेडकरी बौद्ध, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्यास सत्ता दूर नाही. लॉर्ड ऑलिव्हियर म्हणतात, ” No Caste can be uplifted by destroying self-respect.”
हे वाक्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एका लेखात लिहिले आहे. स्वाभिमान नष्ट करून कोणत्याही जातीची उन्नती करता येणार नाही.
डॉ. केशव मेंढे
नागपूर
फुले-आंबेडकर विद्वत सभा
(पूर्व विदर्भ समन्वयक )
9890206577
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत