कागदावरील मनुस्मृतीचे दहन झाले हृदयातील मनुस्मृतीचे दहन कधी होणार?
‘हमे तो अपनोंनेही लुटा!
गैरो में कहा दम था?
कश्ती जहां ढुबी,
वहां पाणी कम था!’
ही एक हिंदीमधील शायरी आहे. त्या शायरीचा प्रत्यय गेले 97 वर्षे येत आहे. हा लेख वाचल्याशिवाय समजणार नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळण्यास आज 25 डिसेंबरला 97 वर्षे पूर्ण होत आहेत. 25 डिसेंबर 1927 रोजी रायगड तालुक्यातील महाड मुक्कामी त्यानी मनुस्मृती जाळण्याचे ऐतिहासिक महान कार्य केले होते. त्या मनुस्मृतीचा अध्याय जसा सुरू झाला तसे बहुजनांचे अतोनात नुकसान झाले. मनुस्मृतीचा काळ पावणे दोन हजार वर्षापुर्वीचा असून शंकराचार्य पीठ स्थापन झाल्यानंतर मनुस्मृती लिहिली गेली आणि तिची अंमलबजावणी होवू लागली असे सांगितले जाते. बौध्द काळातील बहुजनांत मोठी फूट पाडून त्यांना जातीत विभागले आणि जातवार त्याना कामे वाटून दिल्याचे मानले जाते. त्या बहुजनातील जे लढावू आहेत त्याना नुसते गुलामच केले नव्हे, तर जनावरांपेक्षा हिन दर्जाची वागणूक दिली. त्याना ज्या सार्वजनिक ठिकाणावरचे पाणी कुत्री मांजरे पक्षी प्राशन करत होते, आपला मैला त्यात टाकून पाणी अशुध्द बनवत होते ते पाणी पिण्यास मज्जाव केला. त्याना ताजे अन्न खाण्यास विरोध केला. त्यानी आपले घर विटा मातींचे बांधायचे नाही, कुडाच्याच घरात राहायचे, प्रेतावरच्या कपनाचेच त्यानी कपडे वापरयाचे, नोकरी ना व्यवसाय करायचा नाही. तरीही त्यानी आर्थिक धन साठा केला, तरी तो मनुवादी आपल्या नावावर करून घेई. दगड विटा मातीचे घर बांधले तर ते पाडण्याचे फर्मान निघत, घरात सण, उत्सव करायचा नाही. त्यांची लग्नाची पध्दत अवलंबावयाची नाही. घरात प्रकाश असता कामा नये. शेती करायची नाही. शेती केलीच तर शेतात नांगर फिरवून शेतीचे नुकसान करायचे. कसले ते शिक्षण घ्यायचे नाही. त्यानी वरच्या जातीतील महिलेकडे वर मान करून वघायचे नाही, बघितले तर त्याचे डोळे काढून हातात दिले जात. त्यानी मांडीला मांडी लावून बसले तर मांडी कापली जात, वरच्या जातीतील लोकांची चर्चा ऐकली तर त्याच्या कानात उकळलेले गरम शिसे ओतले जात, प्रेम केले तर मृत्युदंडाची शिक्षा. अशा भयंकर व अमानवी शिक्षा गुलामांना दिल्या जात होत्या. हे गुलाम म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून ज्यावेळी खैबरखिंडीतून भारतात घुसखोरी करतेवेळी परकीय आर्यांना अर्थात आजच्या भाषेतील दहशतवाद्यांना विरोध केला ते अनार्य अर्थात नागलोक, द्रविड, शाक्य, कौलिय वंशीय वगैरे मूलनिवासी होय. हेच लोक म्हणजेच आजच्या आर्यांच्या धर्माच्या महाराष्ट्रातील महार, मांग, चांभार, ढोर, भंगी, खाटीक, बुरूड जाती व भारतात तत्सम जातीचे तसेच भटके, भटके विमुक्त, ओबीसी, एसबीसी, एसटी या प्रवर्गात मोडणार्या सर्व जातींचे लोक आहेत. यांनीच सर्वप्रथम आर्यांना भारतात येण्यास विरोध केला. यानीच सम्राट अशोक राजाचा नातू राजा बृहद्रथ यांची मौर्यांची अर्थात बौध्दांची सत्ता बळकविणार्या आर्यवंशज पुष्पशृंग मित्राला विरोध केला. प्रसंगी युध्द छेडले. या लोकांनी आर्यांबरोबरच कधीच सेटलमेंट केली नाही. त्यामुळेच आर्यांनी या लढावू लोकांनी पुन्हा आपल्याशी युध्द करू नये, संघर्ष करू नये म्हणून त्यांच्या विरोधात मनुस्मृतीत कायदे केले. यामध्ये चुकीचे असेल असेही वाटत नाही.
प्राचीन काळातील युध्दात ज्याचा पराभव होईल त्या लोकांना विजेता आपल्या सेवेसाठी गुलामच करत असे. हे परकीय मुस्लीमांच्या सत्तेतही दिसून आले आहे आणि ब्रिटीशांच्या साम्राज्य काळातही तसली प्रथा होती. मात्र परकीय मुस्लीम व ब्रिटीशांनी भारतातील सरसकटांना गुलाम केले. पण आर्यांनी त्यांच्याबरोबर पंगा घेणार्या मुलनिवासींना केले. पंगा घेणारे महाराष्ट्रात प्रामुख्याने महार मांग, चांभार, ढोर, खाटीक, बुरूड आदी एससी प्रवर्गात मोडणार्या सर्व जाती, ओबीसी, एसबीसी, एस.टी. प्रवर्गात मोडणार्या सर्व जाती भटके, भटके विमुक्त म्हणून ओळखतात. थोडक्यात आजचा आरक्षण समाज. पण हेच लोक भारतातील त्या त्या प्रांतातील तेथील स्थानिक जातीने लोक ओळखतात. पण हे सर्व लोक मुलनिवासी आहेत. बौध्द धम्मातील बहुजन आहेत. यातील ओबीसी, एसबीसी या प्रवर्गातील जातीचे लोकांना अॅडजेस्ट म्हणूनच स्पृश्य बनवले अन्यथा. कपडे कोण शिवणार? त्यांची कपडे कोण धोणार? कपड्यांना इस्त्री कोण करणार? दाडी कोण कापणार? प्रांपचिक भांडी कोण बनविणार? घरे कोण बांधणार, घरावर छप्पर कोण करणार? बागायत कोण करणार? कोंबडं, बकरं कोण कापणार? शेंगा व अन्य धान्य कोण दळणार? गाई, म्हैशीची धार काढून दूध कोण देणार? या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच अस्पृश्यांमधील कर्माने साळी, माळी, तेली, कुंभार, कासार, लोणार, न्हावी, शिंपी, सुतार, लोहार, गवळी, खाटीक, बुरूड धोबी, परिट होवून ते लोक ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्यांच्या वस्तीच्या आजूबाजूला राहताना दिसत होते. त्यांची दुकाने त्यांच्या वस्ती शेजारी होती. आजही आहेत. अन्यथा त्याना अस्पृश्यच ठरवले होते. जे खडूस होते. बदला घेण्याची भाषा करत होते, कर्मात उठावदार नव्हते ते मात्र कायमच अस्पृश्य राहिले. किंवा अस्पृश्यातून स्पृश्य झालेल्या लोकांकडून त्यांची अडवणूक झालेली असली पाहिजे. अन्यथा त्यांच्या आसनाला धक्का. पण आज ओबीसी, एसबीसी मधील सर्व जातीच्या लोकांनी आपण मूळचे कोण आहोत हे समजून घेतले पाहिजे. जी व्यवस्था जनावरांपेक्षाही हिन दर्जाची वागणूक देईल, त्या व्यवस्थेला आपले म्हणायचे का? त्या व्यवस्थेचा कायदा ग्रंथ अर्थात मनुस्मृती आपली मानायचे का? मनुस्मृतीमुळे मुलनिवासी अस्पृश्य झाले. शुद्र बनले.
ब्रिटीश भारतात आल्यानंतरच अस्पृश्य, शुद्र जीवन जगणार्या बहुजनांना माणुसकीची वागणूक मिळू लागली हे सत्य नाकारता येणार नाही. त्यानुसार सन 1923 साली मुंबई प्रांतातील ब्रिटीश सरकारने मुंबई इलाख्यातील जितकेही सार्वजनिक तळे, विहीरी आहेत ते पाणवटे सर्वांसाठी खुले करावेत असा ठराव संमत केला होता. त्याची अंमलबजावणी अनेक ठिकाणी केली जावू लागली, पण महाड नगरपरिषदेने महाड मधील चवदार (चार दरवाजे) तळे सर्वांसाठी खुले केले नव्हते. म्हणजे त्या नगरपरिषदेतील बहुतांशी लोकप्रतिनिधी व अधिकारी हे मनुस्मृती कायदाच मान्य करत होती. कर्मठ मनुवादी होते. मात्र तो काळ मनुस्मृतीचा नसून ब्रिटीश आमदनीचा होता. ब्रिटीशांनी 1890 सालीच राजसत्ता नाकारून लोकसत्ता मान्य केली होती. ‘हे लोकांचे राज्य आहे’ असे त्यानी जाहीर करून तशा पध्दतीचे कायदे आणण्यास सुरवात केली होती. त्याचाच एक भाग म्हणून देशातील सार्वजनिक पाणवटे सर्व जातींसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र किमान पावणे दोन हजार वर्षे ज्यांच्या नसानसात पाण्यावरच नव्हे, तर निसर्गातील जितक्याही वस्तु-घटक आहेत त्या आपल्या आहेत आणि मनुस्मृतीतून निर्माण केलेली व्यवस्था ही योग्य आहे ही रूढ भिनली होती, त्या लोकांना पाणवटे खुले करण्यास अवघड वाटू लागले होते. पण ब्रिटीश लोकसत्ताक कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नव्हता. अन्यथा लोक स्वत: कृतीने त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यास सज्ज होते. ज्याना गुलाम केले म्हणजेच अस्पृश्य केले, शुद्र केले, भटके केले त्या लोकांना कळून चुकले होते की, आताची सत्ता विेदशी आर्यांची वा मनुवाद्यांची नसून ब्रिटीशांची आहे. ‘मायबाप सरकार’ची आहे. आता मनुस्मृतीचा काहीच संबंध नाही. देत नसतील, तर हिसकावून घेतले पाहिज आणि तेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी महाड येथे केले.
20 मार्च 1927 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी आपल्या अनुयायांसह महाड येथील चवदार तळ्यावर जावून त्यातील पाणी प्राशन करून लोकसत्ताक कायद्याची अंमलबजावणी केली. निसर्गातील पाण्यावर आमचाही अधिकार आहे हे दाखवून दिले. पण रोजच्या अन्न पदार्थाएैवजी अचानक नवीन अन्न पदार्थ सेवन केला तर तो जसा पचायला जड जातो तसे महाड मधील मनुवाद्यांना ब्रिटीशांचा लोकसत्ताक कायदा मान्य झाला नाही. अस्पृश्य, शुद्र, भटक्यांनी चवदार तळ्यातील पाणी शिवल्याने ते पाणी दुषित-अशुध्द झाल्याचे मनुवादी म्हणू लागले. ते अंतर्मानातून दु:खी झाले होते. याचा बदला घेतलाच पाहिजे. मनुस्मृतीच्या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. पाणी प्राशन करणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे. म्हणूनच महाडमधील मनुवाद्यांनी सत्याग्रहांवर अमानुष हल्ला चढवला. सत्याग्रही सामुहिक जेवण करत असतानाही मनुवाद्यांना त्याची दया आली नाही. जेवणात माती खालवली. निशस्त्र सत्याग्रहींना पळवून पळवून मारले. खरे तर त्या दिवशी महाड मधील सावित्री नदीला पाण्याचा नव्हे, तर मनुष्य प्राण्याच्या रक्ताचा महापूर आला असता. सत्याग्रही देखील खवळले होते. झालेल्या हल्ल्याचा बदला आताच घेणार म्हणून सत्याग्रही हत्यारासह महाडमधील मनुवाद्यांच्या घरावर चाल करून जाण्यास सज्ज झाले होते. फक्त ते डॉ.बाबासाहेबांच्या आदेशाची वाट पाहत होते. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याना हिंसेचा आदेश दिला नाही. ते मुर्ख आहेत म्हणून आपण मुर्ख व्हायचे नाही. संयमाने जावूया. लोकसत्ताक कायद्याने जावूया. ज्या कारणासाठी आपण येथे आलो आहोत ते कारण यशस्वी ठरल्याची जाणीव करून सत्याग्रहींना शांत केले.
त्यानंतर मनुवाद्यांनी चवदार तळ्याचे शुध्दीकरण करण्याचे ठरवले. शुध्दीकरणाशिवाय त्या तळयातील पाणी प्राशन करायचे नाही असे महाड मधील मनुवाद्यांनी ठरवले. ब्राम्हण पुजार्यांनी आणून तळ्यावर पूजा घातली. 105 घागरीतून अन्य ठिकाणचे पाणी आणले. त्या घागरीतील पाण्यात पंचामृत म्हणून शेण, मुत्र, दूध, दही, तूप मिसळले. वेद गुणगुणले आणि त्या 105 घागरीतील पाणी चवदार तळ्यात ओतून सांगण्यात आले की, या तळ्यातील पाणी जरी अस्पृश्यांनी स्पर्श करून अशुध्द केले असले, तरी आता ते शुध्द झाले आहे. पाणी पिण्यास हरकत नाही. पण डॉ.बाबासाहेब व अन्य सत्याग्रहींनी आपल्या हातानी स्पर्श करून पाणी प्राशन केले होते ते हात स्वच्छ होते. त्यामुळे पाणी अशुध्द होण्याचे काहीच कारण नव्हते. जगातील कोणत्याही पाण्याचे पृथ:करण करणार्या जलतज्ञास बोलावून त्याला विचारले असते, तर त्यानी सांगितले असते की, ‘माणसाच्या स्पर्शाने चवदार तळ्यातील पाणी अमृतच राहणार आहे, उलट त्या पाण्यात जे शेण, जनावराचे मुत्र मिसळल्याने ते पाणी अशुध्द होणार आहे.’ मग ते पाणी केव्हा अशुध्द झाले? याचे उत्तर आतातरी आम्ही जातीवाद मानत नाही, मनुस्मृती मानत नाही म्हणणार्या ब्राम्हणासह, क्षत्रिय, वैश्यातील सुज्ञांनी द्यावे.
महाडमधील चवदार तळयावर पाणी शुध्दीकरणाचा धार्मिक विधी केल्याची वार्ता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कानी पडली. मग मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयम सुटला. सत्याग्रहींवर हल्ला करणार्यांवर अटकेची कारवाई होवूनही जर ते सुधारत नसतील, तर मात्र त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. आजच्या ब्रिटीश काळात ज्या मनुस्मृतीचा काहीच संबंध उरलेला नाही त्या मनुस्मृतीप्रमाणे जर कोणी कृती करत असेल, तर त्या मनुस्मृतीतील मानवी न्याय विरोधातील कायद्यांनाच अर्थात श्लोक/अध्यायानाच आग लावण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी ठरवले. तारीख ठरली 25 डिसेंबर 1927 ची. महाड मध्ये मनुस्मृतीला आग लावण्यासाठी परिषदेचे आयोजन केले. मात्र महाड मध्ये परिषदेसाठी कोणी जागा देण्यास तयार होईनात. अखेर मुस्लीम समाजातील फत्तेखान तयार झाले. ते फत्तेखान म्हणजे धर्मांतरीत मुस्लीम. म्हणजे ते पुर्वीच बहुजन. मुळनिवासीपैकीच एक. अखेर रक्त एकच असल्याने कदाचित फत्तेखान यांच्यावर महाडमधील प्रतिष्ठीत मनुवादी लोकप्रतिनिधींनी दबाव आणला पण त्यानी त्या दबावाला जुमानलेे नाही. खरे तर काळानेच फत्तेखान व अस्पृश्यांना एकत्र आणले असे म्हटले तर वावगे ठरू नये. ठरवलेल्या तारखेला परिषद झाली आणि त्याच ठिकाणी गंगाधर सहस्त्रबुध्दे या ब्राम्हण व्यक्तीच्याच हस्त मनुस्मृतीचे विधीवत दहन करून तळे शुध्दीकरणाचा बदला घेतला. तसेच त्या माध्यमातून दाखवून दिले की, आता येथूनपुढे आम्ही तुमच्या मनुस्मृतीला जुमानणार नाही. ते दिवस गेलेत. ब्रिटीशांनी लोकसत्ता मान्य केली तेव्हाच या देशावर आमचाही अधिकार आहे. तुम्ही आम्हाला गुलाम बनवले पण आता आम्ही तुमच्या गुलामगिरीतून, अस्पृश्यातून मुक्त झालो आहोत. आझाद झालो आहोत. हा देश आमचाच होता आणि आणि आहे हे पुन्हा एकदा काळाने सिध्द केले आहे. येथून पुढे मनुस्मृतीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला, तर ती पुन्हा पुन्हा जाळण्यात येईल असा अप्रत्यक्ष संदेशच मनुवाद्यांना 25 डिसेंबर 1927 च्या मनुस्मृती दहन दिनी दिला. म्हणूनच आज 97 वर्षे होत असतानाही देशातील ठिकठिकाणी 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन दिनाचा स्मृती कार्यक्रम होत असतो. तसेच मनुस्मृतीचे दहनही केले जाते. तशी कृती करणे योग्य असले, तरी आपल्या मनात मनुस्मृती ठेवून कागदावरची मनुस्मृती जाळून योग्य होईल का? हा प्रश्न महत्वाचा आहे.
96 वर्षांनंतरही मनुस्मृती का जाळली जाते? आजच्य सरकारकडून त्या मनुस्मृतीची अंमलबजावणी होत नाही. 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी देशाला मानवतावादी भारतीय संविधान समर्पित केले आहे. त्या संविधानाची अंमलबाजवणी 26 जानेवारी 1950 पासून आजपावेतो होत असतानाही मनुस्मृतीचे भय कशासाठी? याचे उत्तर म्हणजेच बहुजनांच्या घरा घरात, मना-मनात ठाम मांडून बसलेली मनुस्मृती अद्याप जळालेली नाही. ती आचरणातून आजही दिसते. ज्या अर्थी बहुजन कुटुंबे विदेशी आर्यांची संस्कृती उत्सव, उरूस, जत्रा, यात्रा, उपवास, दिवाळी, शिमगा, दसरा यासह विविध सणांतून इमाने इतबारे जपत आहेत, त्या अर्थी त्यांच्या मनातील मनुस्मृती जळालेली नाही. मग केवळ कागदावरची मनुस्मृती जाळून काय उपयोग होणार आहे? जाळायचीच असेल, तर आपल्या शरीराच्या रक्तात भिनलेल्या मनुस्मृतीला आग लावा. ती शरीरातून बाहेर काढा, फेकून द्या म्हणजे कागदावरील मनुस्मृती
जाळण्याची वेळच येणार नाही.
कोल्हापुरात मनुस्मृती दहनाचा 25 वा, 50 वा स्मृती दिनही झाला नव्हता. पण 75 वा अर्थात अमृत महोत्सव मनुस्मृती दहन स्मृती दिन साजरा झाला होता. मी स्वत: त्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दसरा चौकातील शाहू स्मारकच्या मुख्य सभागृहात 25 डिसेंबर 2002 रोजी सार्वजनिक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी होते. मुख्य वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत बा.ह.कल्याणकर (औरंगाबाद), डॉ.अच्युत माने, प्रा. डॉ.वासंती रासम व दशरथ पारेकर (तत्कालिन संपादक दै.लोकमत (सांगली आवृत्ती)) आदींना निमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमाला 22 वर्षे झाली. पण उपयोग काय? 96 वर्षात बहुजनांच्या मनातील मनुस्मृती पुर्णत: जळालेली नाही हेच सत्य आहे. केवळ प्रबोधन होवूनही 98 टक्के लोकांनी परिवर्तन केले नाही. त्याचे परिणाम म्हणजेच मनुस्मृती काळातील गुलामावर आजही अन्याय अत्याचार होत आहेत. अमित शाह यांच्या सारखा मनुवादी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्याचे धाडस करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी त्याना पुन्हा या देशाचे मालक बनवले असतानाही ते गुलामासारखे वागत आहेत. मराठा संबंधित असलेल्या कोपर्डीतील बलात्कार व खून प्रकरणाला न्याय मिळतो, पण अस्पृश्यासंबंधी असलेल्या खर्डा, खैरलांजी सारख्या असंख्य घटना आहेत की त्या घटनांना योग्य तो न्याय मिळत नाही. अनेक प्रकरणातून आरोपी मोकाट सुटतात. म्हणजे कायदा मनुस्मृतीचा आहे की भारतीय संविधानाचा? आर्यांनी सर्वच मुलनिवासीना गुलाम केले नव्हते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. सर्वांनाच शत्रू केले तर पुन्हा बंड होण्याचा धोका होता. ही मानवनिती ओळखूनच आर्यांनी जे तळ्यात मळ्यात आहेत, जे आपल्या बाजूने बोलतात त्यांना सुट दिली होती. जैन धर्मातील लोक अस्पृश होते असा इतिहास आहे का? ठाकूर, राजपूत, मराठा (आजच्या काळातील जात) यांच्यासम जाती अस्पृश्य का नाही बरे? त्यांना गुलाम का केले नाही? या प्रश्नांची उत्तरे देण्याचे कारण नाही. जे बौध्द धम्माशी इमान राखत होते त्यानाच गुलाम केले. आयुष्यातून उठवले, इतके मात्र सत्य. मग या लोकांनी आपल्या मनातील मनुस्मृती जाळली पाहिजे की नको? माणसाच्या वैयक्तिक जीवनातील संघर्ष कधीच संपत नाही. मग सामुदायिक संघर्ष संपेल का? आरक्षणामुळे चार दिवस चांगले आले तर हेच मांग, चांभार, ढोर, भंगी, खाटीक, बुरूड, भटके, भटके विमुक्त, एस.टी (या प्रवर्गात मोडणार्या सर्व जातीतील लोक) मधील लोक म्हणत आहेत की, आता कुठे आहे संघर्ष? जातीवाद? पण मेल्यानो, ज्या अर्थी खर्डा, जवखेडा, खैरलांजी सारख्या अमानवी प्रकरणाला न्याय मिळत नाही, त्या अर्थी मनुस्मृती अद्यापही जिवंत आहे.
अनेक मुलनिवासीच मनुवादी झाले आहेत. मी वर म्हटल्याप्रमाणे आर्यांनी सर्वांनाच गुलाम केले नाही. मग ज्याना केले नाही. ज्यांना आर्यांनी स्वीकारले त्याना मनुस्मृती बरीच वाटणार. म्हणूनच भारतीय संविधान असूनही देशात सत्ता मूठभर असणार्या आर्यांची येत आहे. सन 1984 साली आर्यांच्या भारतीय जनता पक्षाचे 543 पैकी केवळ 2 खासदार निवडून आले होते. आज त्याच पक्षाची तीन वेळा सत्ता येते. त्यानी आपले पुर्वीचे दिवस आणण्यासाठी भारतीय संविधान स्वीकारले. त्याना माहित आहे की, जरी मुलनिवासींच्या हिताचे भारतीय संविधान असले, तरी त्यांच्यातील बहुतांशी लोक हे मनुस्मृतीच्या विचाराचे आहेत. सत्ता येवू शकते. वारंवार सत्ता आणूनच ते भारतीय संविधान संपवणार आहेत. तेव्हा ज्या जातीच्या लोकांनी हजारो वर्षे गुलामगिरीत जीवन घालवले त्या लोकांनी भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र आले पाहिजे. रात्रीचा दिवस केला पाहिजे. बानकरप्रमाणे प्रत्येकानी आपले कोणी नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी आर्यांची संस्कृती सण, उत्सवाच्या माध्यमातून जपत आहे का हे पाहिले पाहिजे. त्यास विरोध केला पाहिजे. समजून सांगितले पाहिजे. हे काम एकट्या-दुकट्याचे नाही वा एक-दोन वर्षात संपणारेही नाही. हे आर्यांकडून शिकले पाहिजे. पण सर्वांनी एकत्र येण्यापुर्वी मनात रूतलेली मनुस्मृती जाळली पाहिजे. आपण मुळचे कोण आहोत? कुणाचे अनुयायी आहोत? याचा शोध घेतला पाहिजे. तो शोध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी घेतला. म्हणूनच त्यानी आपले गुरू तथागत महामानव गौतम बुध्द असल्याचे सांगितले. आपला आदर्श बौध्द राजा सम्राट अशोक असल्याचे ओळखले. आपली संस्कृती बौध्द धम्मीय असल्याचे जाणून त्यानी अश्विनी शुध्द महिन्यातील अमावश्येनंतरच्या दहाव्या दिवशी आणि अश्विनी शुध्द पौर्णिमेच्या 5 दिवस अगोदर अर्थात दसमीला की ज्या सम्राट अशोक राजांनी धम्मदीक्षा घेतली त्या दिवशी सन 1956 साली नागपूर मुक्कामी घर वापसी केली. धम्म स्वीकारून थोडी बहुत होती ती देखील मनातीलही मनुस्मृती जाळून टाकली. त्यानंतर त्यानी कधीच आर्याच्या संस्कृतीचे आचरण केले नाही. याला म्हणायचे खरा अनुयायी.
पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना आपले सर्वस्व मानणारे. अनुयायी म्हणून घेणार्यांनी मनातील मनुस्मृती जाळून टाकली का? मी दहा वर्षे कोण कोण दिवाळी साजरी करतेय, कोण बुध्द जयंती साजरी करतेय, कोण करतय धम्म विजया दसमी (धम्मचक्र प्रवर्तन दिन) हे पाहण्यासाठी कोल्हापूर शहर व उपनगररातून फेरफटका मारत असताना अगदी बौध्द धम्माची दिक्षा घेणार्यांपैकी सुमारे 98 टक्के लोकांनी तसेच आपल्या घरात बौध्द पध्दतीने विवाह, गृहप्रवेश, मरणोत्तर विधी करणार्यां कुटुुंबांनी घरातील, मनातील मनुस्मृती जाळलेली नाही हे दिसून आले आहे. तेथे मांग, चांभार, ढोर, भंगी, बुरूड, खाटीक, धनगर, भटके, भटके विमुक्त, ओबीसी, एसबीसी व एस.टी.प्रवर्गात मोडणार्या जातींचे लोक मनुस्मृती मनातीलच काय पण कागदावरचीही जाळणार नाहीत. एकाला तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर होण्यास आवडते पण तोच व्यक्ती यल्लम्माला जात असेल तर… तिच व्यक्ती 9 महिन्यापुर्वी आपल्या घराचा गृहप्रवेश बौध्द पध्दतीने करून आर्यांची दिवाळीला तेच घर विद्युत रोषणाईने सजवत असेल आणि त्याच्या घराचा विधी करणारा जो बौध्दाचार्य (तथाकथित) च आपल्या घरात दिवाळी साजरी करत असेल तर… अशी कित्येक उदाहरण सांगता येतील. ग्रंथ तयार होईल. इतकी नालायक व हरामखोर लोक मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी म्हणवून घेणारे आहेत. यामध्ये बहुतांशी वरिष्ठ शासकीय अधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, लोकप्रतिनिधी, प्रसिध्द विचारवंत, इतिहासकार, व्याख्याते, लेखकांचाही समावेश असल्याचे ऐकून वेढ लागण्याची वेळ आलेली आहे.
मनातील मनुस्मृती जाळायचीच असेल तर जितक्याही आर्यांच्या जुन्या रूढी, परंपरा आहेत त्या टाकून दिल्या पाहिजेत. मग त्यातील चांगल्या असल्या तरी बेहत्तर. दैनिक मुक्तनायकच्या संघम दिनदर्शिकामध्ये जानेवारीच्या पानावर आर्यांच्या रूढी, परंपरेच्या कृतीला पर्याय दिलेत आहेत. ते जर मुलनिवासींनी पर्याय कृतीत आणले, तर मनातील मनुस्मृतीला आपोआप आग लागणार आहे. दैनिक मुक्तनायकच्या माध्यमातून मी सात दिवसाचा सम्राट अशोक कालिन घरगुती बुध्द उत्सव, 5 दिवसाचा सम्राट कालिन घरगुती धम्म विजया दसमी, बुध्द कालिन वर- सुजाता पौर्णिमा उत्सव, प्राचीन काळातील नाग पचराजा लोकोत्सव, 6 डिसेंबरला घरातील मृत वारसांना अभिवादन, 1 जानेवारीला शस्त्र वंदन, धम्म (बंधन) धागा, यशोधरा-राहूल स्मरण दिन आदी पर्याय दिले आहेत . हे पर्याय प्रत्येक बौध्दांनी स्वीकारले, तर मनुस्मृती जाळण्याची आवश्यकता भासणार नाही. पण काही महारच कुट काढतात. त्यांच्या व त्यांच्या घरातील बायकांच्या रक्तात भिनलेली मनुस्मृती जाळून काढेनात. मात्र दै.मुक्तनायकने मनुस्मृती जाळण्यासाठी दिलेल्या पर्यायावर तोंडसुख घेण्यात लोक धन्य मानत आहेत. पण एक दिवस मी दिलेले पर्यायच घराघरातील, मनामनातील, रक्तामासातील मनुस्मृती जाळण्यासाठी किती योग्य आहेत हे समाजाला दिसून येणार आहे. आज केवळ आणि केवळ दैनिक मुक्तनायकच प्रबोधनच नव्हे तर परिवर्तनाचे कार्य करत आहे हे टिकाकारांनी लक्षात ठेवावे.
आज देशातील मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, लिंगायत, शिख, पारशी या धर्मियाना मनुस्मृती लागू पडते का? त्यांनी आर्यांची संस्कृती केव्हाच टाकून दिली आहे. ते आपल्या धर्माचे सण, उत्सव, उपासना करतात. त्यामुळे त्यांच्या मनातही मनुस्मृती नाही, त्यामुळे ते कधीच मनुस्मृती जाळत नाहीत. मग बौध्दांनी का बरी मनुस्मृती जाळावी? दोन दगडावर हात ठेवून कधीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे ‘बौध्दमय भारत’चे स्वप्न साकार होणार नाही आणि मनातील मनुस्मृती जळूली जाणार नाही. चूक मुनवाद्यांची नाही, तर डॉ.बाबासाहेबांना फसविणार्यांची आहे. म्हणूनच लेखाची सुरूवात शाहिरीने केली आहे. 97 वर्षापुर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी मनुस्मृती जाळली ती आमच्यासाठी धन्य ते बाबासाहेब! मनुस्मृती जाळणारे बाबासाहेब भाजप व संघ परिवारला कधीच नको असणार आहेत. तेव्हा भाजपचे बाबासाहेबांवरील प्रेम हे खोटे आहे. त्यांच्यावर मुननिवासींनी विश्वास ठेवू अन्यथा तुम्ही पुन्हा त्यांच्या आधुनिक मनुस्मृती व्यवस्थामध्ये संपणार आहात इतके लक्षात ठेवा.
(आज बुधवार (दि.25 डिसेंबर 2024) च्या दै.मुक्तनायकमधील ‘निर्भीड अग्रलेखासाठी अग्रेसर’ या सदरातील संपादक देवदास बानकर यांचा संपादकीय लेख.लेख योग्य असेल तर पुढे शेअर केला तरी चालेल. कोल्हापुरातून गेले 17 वर्षे अखंडपणे नियमित सुरू असलेले पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव सर्वाधिक खपाचे व लोकप्रिय दैनिक मुक्तनायक रोज वाचा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत