दिन विशेषभीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

खूप झाले नाचून, आता वाचले पाहिजे.

(14 एप्रिल 2024, जयंती विशेष ) 

                          जगात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव जर कशासाठी प्रसिद्ध असेल तर ते सर्वात जास्त उच्च शिक्षित व्यक्ती म्हणून , सर्वात जास्त तत्वनिष्ट ,सर्वात जास्त प्रामाणिक आणि सर्वात जास्त स्वाभिमानी आणि असे अनेक गुण आहेत पण एक विश्लेषण म्हणून इथे सांगत आहे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धीच्या क्षेत्रात असे कोणते क्षेत्र नाही की, ज्यात त्यांचे योगदान नाही. बुद्धी आणि प्रामाणिक पणाच्या जोरावर बाबासाहेबांनी अनेक लोकांवर  मात केली आहे हे जगजाहीर आहे. त्यांचे अनेक किस्से आहेत की, ज्याचा सबंध हा ग्रंथ आणि वाचन याबाबत आहे. त्यांच्यावर लिहलेल्या अनेक पुस्तकात याचा उल्लेख आहे की, अनेक वेळा बाबासाहेब वाचन करीत असताना त्यांना रात्र संपली याचे भान राहत नसे, अनेक वेळा ते वेळेवर जेवत नसत कारण त्यांना भारतातील बहुजन समाज आणि त्यांचे कल्याण हा मोठा हेतु असल्यामुळे वेळ नव्हता. म्हणून एक गीतकार म्हणतो की, छाती ठोकून सांगू जगाला असा विद्वान होणार नाही. हे गाणे ऐकतांना आपल्या अंगावर काटा उभा राहतो आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा महापुरुष या पृथ्वीवर झाला असेल यावर विश्वास बसत नाही. कारण त्यांचे संपूर्ण जीवन एक मोठा संघर्ष आणि संघर्षच आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या संघर्षाला पुरून उरले आहेत. माझी आत्मकथा या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “ ही जयजयकाराची प्रदर्शने मला बैचेन करतात. या जयजयकारांनी व्यक्त केली जाणारी विभूतिपूजेची भावना माझ्या लोकसत्तात्मक प्रवृत्तीला व्यथित करून सोडले आहे. हे जयजयकाराचे सोहळे माझ्या मनाला कशदायी वाटतात.” यावरून आपणास लक्षात येईल की, बाबासाहेबांना जयजकार जास्त पसंत नव्हता तर यापेक्षा काम महत्वाचे होते. कारण त्यांना माहीत होते की, आपल्या समाजाला शह देणारी शक्ती ही फार मोठी षड्यंत्रकारी आहे आणि त्यांना टक्कर देण्यासाठी असे सोहळे आणि मिरवणुका करून चालणार नाही. असे जयजयकाराचे कार्यक्रम हे तात्कालिक असतात. त्याला दीर्घकालीन लढाईसाठी फार उपयोग होत नाही. आणि आपले असेच झाले आहे. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असतांनाच त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम (जयंती) करण्याचा प्रस्ताव आपल्या त्यावेळी असणार्‍या कार्यकर्त्यांकडून आला होता पण बाबासाहेब आंबेडकर यांना तो पसंत नव्हता. तेंव्हा ते म्हणाले होते की, “ माझा जयजयकार करण्यापेक्षा मी जो मार्ग सांगितला आहे त्यावर मार्गक्रमण करा हे जास्त महत्वाचे आहे.” आणि त्यांचे हे शब्द आजसुद्धा आपणास तंतोतंत लागू पडतात. आजपर्यंत आपण सोहळे केले पण आपला समाज आज कुठे आहे ? हा प्रश्न आपणास जास्त सतावतो. आज आपले राजकीय आणि सामाजिक नेतृत्व कोणत्या थराला गेले आहे याची कल्पना आहे आपणा सर्वांना आणि त्यामुळे यावर चिंतन होणे गरजेचे आहे. कांही वर्षापूर्वी आमच्या परभणी  येथील एक प्राध्यापक डॉ. भीमराव खाडे सर यांनी एकूण 14 एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त किती आर्थिक उलाढाल होते आणि ती कशी फार उपयोगी नाही याचे मार्मिक विश्लेषण केले होते. आणि एकूण आपल्या आंबेडकरी विचरवंतांचा आज कल सुद्धा त्याच बाजूला जात आहे की, आपण या जयजयकारापेक्षा इतर महत्वाच्या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे. आणि आपले स्वरूप सुद्धा फार बदलले आहे. म्हणजे इतका गोंगाट असतो त्या डि.जे. आणि इतर साहित्याचा की, मूळ उद्देश बाजूला जातो. म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला कोणते गीत असावे याचे सुद्धा भान आपणास राहिले नाही. म्हणजे कमीत कमी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असणार्‍या गीतावर नाचलो तर कांही प्रमाणात ठीक आहे पण याला सुद्धा खूप विचित्र स्वरूप आले आहे. म्हणजे आपला आनंदाचा दिवस असला तरी आपले आदर्श आणि गाणे याचा मेळ बसत नाही. याच माझी आत्मकथा या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की, “ एखाद्या वेळेस असे वाटते की, जगात एकटे असावे ,शांत व स्वतंत्र जीवनक्रम उपभोगता यावा. अशा तर्‍हेच्या सुशांत ,अलिप्त आणि बिनभानगडीच्या आयुष्यक्रमाची माझ्याइतक्या फार थोड्या लोकांना असू शकेल. अशा प्रकारच्या निवांत ,सुखप्रद आयुषयक्रमावर माझ्यापेक्षा अधिक हक्क तरी कोणाचा असू शकणार ? दु:खाअंती सुख अगर कष्टाअंती विश्राम हा सिद्धान्त अचूक व सर्वांना लागू पडणारा असला, तर मला पाहिजे असलेला निवांत ,स्वतंत्र अलिप्त असा जीवनक्रम मला यापूर्वीच लाभायला हवा होता. परंतु तो सिद्धान्त मला लागू पडणार नाही, हे मी आता समजून चुकलो आहे. गोंगाटाचा आयुष्यक्रम माझ्या पाचवीला पूजलेला असून तो मला यापुढे शेवटपर्यंत पुरून उरणार आहे.” आणि या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याचा अंदाज सत्य ठरला आपल्यासाठी बाबासाहेबांना कधीच शांतता आणि आराम मिळाला नाही. त्यांचे अनेक प्रसंग आहेत भारताचे संविधान लिहतांना त्यांना खूप शारीरिक पीडा होती पण तसेच बाबासाहेब काम करीत होते केवळ आपला उद्धार व्हावा म्हणून आणि शिक्षण घेतांना सुद्धा अनेक पदव्या आर्थिक अडचणीमुळे कमी वेळेत जास्त मेहनत करून पूर्ण केल्या आहेत याचा सर्व इतिहास आपणास माहीत आहे. आणि मग इतके कष्ट जर आपल्या महामानवाने आपल्यासाठी घेतले असतील तर आपण त्याचे वारसदार कसे वर्तन केले पाहिजे याचे भान आपण ठेवले पाहिजे. पुढे माझी आत्मकथा या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, अस्पृश्यांना काय संदेश द्यावा असा विचार करतांना आणि आपल्या अस्पृश्य समाजाला मार्गदर्शन करतांना ते म्हणतात, “ माझ्या पंचावन्नाव्या वाढदिवसी तुम्ही खास अंक काढणार आहात, त्यासाठी तुम्हाला संदेश दिला पाहिजे. आपल्या या हिंदुस्थान देशामध्ये राजकीय पुढार्‍याला अवतारी पुरुषाप्रमाणे मान दिला जातो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदुस्तानाबाहेर केवळ महापुरुषांच्या जयंत्या साजर्‍या केल्या जातात, पण हिंदुस्थानात अवतारी पुरुष व राजकीय पुरुष या दोघांचेही जन्मदिवस पाळले जातात. हे असे असावे ही दु:खाची गोष्ट आहे. व्यक्तिश: माझा वाढदिवस साजरा व्हावा हे मला मुळीच आवडत नाही. मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. मला विभूतिपूजा कशी आवडेल ? विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याजबद्दल कौतुक ,प्रेम ,आदर ह्या भावना बाळगायला हरकत नाही. तथापि तेवढयानेच त्या अनुयायाचे समाधान व्हायला हवे. पण पुढर्‍याची देवाप्रमाणे पूजा करणे ही गोष्ट मला बिलकुल मान्य नाही. त्यामुळे पुढार्‍याबरोबर त्या भक्तांचाही अध:पात होतो. पण हे याठिकाणी सांगून काय फायदा ? राजकीय पुढार्‍याला अवतारी पुरुषांच्या आसनावर एकदा चढवून बसवले म्हणजे त्याला ते सोंग उत्तम तर्‍हेने पार पाडलेच पाहिजे आणि आपल्या अनुयायांना हा संदेश दिलाच पाहिजे.” ( संदर्भ : माझी आत्मकथा ,लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पण क्र.117 ) आता हा संदेश आपण पहिला म्हणजे आज आपणास लक्षात येईल की , आज सुद्धा आपणास हा महामानव डॉ. बाबासाहेबांनी दिलेला संदेश 100 टक्के उपयोगी पडतो असे दिसते आहे. आज आपल्या देशात अशीच स्थिती आहे. आणि यामुळे आपणास नाचगाण्यात मश्गुल न होता सावध राहून पुढील दिशा निश्चित करावी लागेल. आपण वैचारिक प्रगती पाहिजे त्या प्रमाणात केली नाही आणि मग पुढे आपणास फार चांगले दिवस आहेत असे समजू नये.  एक दिवस नाचल्याने 365 दिवसाचे प्रश्न मिटत नाहीत. तर जास्त गंभीर होतात. एखादा व्यक्ती किंवा समाज रस्त्यावर नाचल्यानेच जास्त आनंदात आहे असे समजणे एक मोठा भ्रम आहे. तो एक दिवस असतो आपण आनंद आणि खुशीने साजरा करावा. पण उद्यापसून मात्र संकल्प करावा की, मी जास्तीत जास्त अभ्यास करील माझ्या कामात पुढे जाईल त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करील असे झाले तर मग पुढील वर्षी जयंती साजरी करण्यात आणि नाचण्यात मजा आहे. नाही तर शिक्षण नाही , अभ्यास नाही , आणि फक्त एक दिवस नाचून काय उपयोग आहे ? आपल्या 95 टक्के समाजाला शेती नाही आणि भांडवल सुद्धा नाही आपला एकच मार्ग आहे शिक्षण घेऊन काही प्रमाणात आपली प्रगती करता येते. मग आपण त्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपले राजकीय भवितव्य सुद्धा फार काही विशेष नाही. एका घरात चार राजकीय पार्टया असतील तर काय होईल आपल्या समाजाचे ? याचा विचार केला पाहिजे. 

                            आपल्या देशात आणि राज्यात पूर्वी जेंव्हा महापुरुषांच्या जयंत्या सुरू झाल्या त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव प्रथम येते. कारण यांनी आंबेडकरी अनुयायीच नाही तर संपूर्ण बहुजन समाजाला एक माणूस म्हणून स्वाभिमान दिला आणि जगण्याचे भान दिले. पण आपल्याकडे सर्व महापुरुषांनी सर्वांसाठी कार्य केले पण जेंव्हा त्यांची जयंती येते तेंव्हा मात्र आपल्याकडे ते महापुरुष ज्या जातीत जन्मले आहेत तेच लोक पुढाकार घेऊन जयंती साजरी करतात. हे आपल्या भारतीय समाजाचे वास्तव आहे. आणि आता या 20-25 वर्षात थोडा बदल झाला आहे म्हणजे काही प्रमाणात का होईना पण इतर लोक सामील होत आहेत. नाही तर पूर्वी सामील होणे तर दूरच पण काही अडचण आणता येईल का याची काळजी घेत होते. आणि याला करणीभूत आहे आपली समाज व्यवस्था म्हणजे मनुवादी व्यवस्था कारण यांना सांगितले आहे की, समाजात श्रेष्ठ आणि कनिष्ट अशी श्रेणी रचना आहे आणि त्यामुळे ज्यांचे महापुरुष त्यांनीच त्यांचे उत्सव साजरे करावेत. आता आपण साधा विचार केला तर भारतात मुलींना शिक्षण देण्याची सुरवात कोणी केली तर 1818 मध्ये महात्मा फुले यांनी मग त्यांनी फक्त त्यांच्या समाजातील मुलींनाच ही सुविधा केली का ? तर नाही सर्व भारतीय समाजाला पण ज्या सनातनी समाजाला याचा लाभ मिळाला म्हणजे त्या मुलींना शिक्षण मिळाले आणि आज अनेक उच्च पदावर त्या कार्यरत आहेत,त्यांनी जाऊ द्या पण निदान आपल्या बहुजन स्त्रिया यांनी तरी याची जाणीव ठेवली पाहिजे की, आपल्यासाठी आपलेमहानायक आणि नायिका यांनी आपले जीवन खर्च केले आपण त्यांची जाणीव ठेऊ पण नाही आपल्या बहुजन स्त्रियांना कधी माहीत नाही की, कोण हे महापुरुष आणि महान स्त्रिया आहेत ?आणि कोणते त्यांचे जन्म आणि निर्वाण दिवस आहेत.? आज आपल्या बहुजन स्त्रिया आणि पुरुष फक्त पैसे आणि भौतिक प्रगती यात गुंग आहेत पण ज्यांच्यामुळे आपणास हे दिवस पाह्यला मिळाले त्यांना मात्र विसरले आहेत. आज जगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष आहेत की, ज्यांची जयंती जगभर साजरी केली जाते आणि त्यांचे पुतळे जगात सर्वात जास्त आहेत. आता आपल्याकडे आपला बहुजन समाज खुप उत्सव प्रिय आहे आणि त्यात आंबेडकरी समाज जरा जास्तच आहे.त्यामुळे 14 एप्रिल येणार की, आपल्याकडे जयंती कमिटया तयार होतात मग ते 15-20 दिवस वर्गणी जमा करतात आणि मग 14 एप्रिल या दिवशी अनेक शहरामध्ये मिरवणूक आणि डी.जे. लावून असे तरुण आणि सर्वच नाचतात आणि सर्व वातावरण भीममय होते. आणि त्यादिवशी सर्व अनुयायी भावनिक होतात. देशात लाखो –करोडो रुपयाचा  एका दिवसात चुराडा होतो आता हे वाचून काहींना राग येईल पण आपण वास्तव स्वीकारले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असतांनाच त्यांच्या जन्मदिवसाचा कार्यक्रम घ्यावा असा प्रस्ताव आला तेंव्हा त्यांनी याला विरोध केला होता. कारण एखाद्या महापुरुषाचा विचार पुढे नेण्यासाठी आपणास असे भावनिक होऊन चालत नाही तर वास्तव काय आहे ते स्वीकारावे लागते. आणि ते एक मोठे मिशन असते त्याला पुढे नेण्यासाठी आपल्याला या बाबी आता तरी बदलाव्या लागतील. याचा अर्थ मी महापुरुषांची जयंती साजरीकरू नये किंवा ते खूप चुकीचे आहे असे अजिबात म्हणत नाही,तर त्याचे स्वरूप आता बदलावे लागेल. कारण आपण उत्सव साजरे करण्यात दंग आहोत आणि आपले विरोधी म्हणजे आपल्या चळवळीला विरोध करणारे आपल्या विरोधी कारवाया करण्यात गुंग आहेत. त्यामुळे आपला कोणताच हेतु साध्य होताना दिसत नाही. प्रतिगामी व्यवस्था आज सतत काम करीत आहे आणि मी यापूर्वी सुद्धा सांगितले आहे की, सनातनी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते हे जास्त काम करतात आणि  त्यामुळे त्यांचा उद्देश चांगला नाही तरी ते यशस्वी होतात. कारण ते सतत काम करतात भावनिक होऊन आणि मिरवणुका काढून नाचत नाहीत.तर रोज मिटिंगा आणि चर्चा मंथन करतात आणि वास्तव काय आहे याचा स्वीकार करतात. आता आपण कधी पाहिले आहे का ? मी आता म्हणजे मार्च महिन्यात एका लग्नासाठी गावी गेलो होतो. आणि 4 मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2024 ची मीटिंग झाली आणि जो जयंती कमिटीचा अध्यक्ष निवडला गेला त्याने मिरवणूक काढली आणि एवढा आवाज आणि गोंधळ पाहिला आणि खूप वाईट वाटले की, आमच्या नगर मधील महिला आणि पुरुष त्या मिरवणुकीला पाहत होते. आणि पहिले तर एवढया  लवकर मीटिंग झाली आणि पुन्हा मिरवणूक जसे फार मोठा परक्रम केला आहे. म्हणजे पूर्वी आमच्या नगरात लोक अध्यक्ष आणि इतर पदे घ्यायला पुढे येत नव्हते आणि आज मिरवणूक काढतात याचे मोठे आश्चर्य वाटले. आणि हे बाबासाहेबांच्या चळवळीला मारक आहे हे आपणास कधी समजणार आहे ?. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ चालवणारे लोक जर एवढे अविचारी असतील तर चळवळ पुढे कशी जाणार ? डॉ. बाबासाहेबांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यावे लागेल हेच याना  माहीत नाही. आणि जयंतीचा अध्यक्ष ही मोठी जबाबदारी आहे ते नाचण्याचे काम नाही. पण पाहणारा समाजच एवढा बुद्धीने अंध आणि अपंग झाला असेल तर पुढील काळ फार कठीण येईल यात शंका नाही. आज अनेक भागात लोकांना राजकारण आणि चळवळ यात फरक समजत नाही. म्हणजे जयंतीचा अध्यक्ष आणि पुढील राजकारण याचा लोक संबध लावत आहेत हेच मुळात चूक आहे. आणि सामान्य लोक सुद्धा आपल्या बुद्धीचा विचार न करता सारखे पळत आहेत. आणि त्यामुळे आज सत्य सांगायला कोणी पुढे येत नाही ,हिंमत करीत नाही. पण सत्य सांगणारे लोक आज फार गरजेचे आहेत. हुजरेगिरी करणारे समाजाला घातक आहेत. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “ लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नको.” आणि आज आपले लोक विकले जात आहेत. आणि नाचत आहेत वाचत नाहीत त्यामुळे यांचा कोणीही वापर करू शकतो. ज्ञानाचा धाक असतो आणि आपला बाप जर एवढा प्रामाणिक आणि विद्वान असेल तर मग आपण त्यांचे वारसदार आहोत तर मग आपण का काही प्रमाणात प्रयत्न करू नये ? त्याकाळात नेहरू, पटेल आणि गांधी यांना आपल्या बापाचा धाक होता कारण तो बाप विद्वान होता आणि आपण त्यांची लेकरं आज त्यांना लाज वाटेल एवढी लाचार आणि बेइमान झाली  आहेत याचे फार आश्चर्य वाटते. आज तात्विक माणूस प्रवाहाच्या बाहेर आहे. आज  मा. कांशीराम साहेबांच्या भाषेत चमचा युग अवतरले आहे. म्हणून कोणी आपली राजकीय दखल सुद्धा घेत नाही. आज काही आपले विद्वान आहेत पण त्यांना पद आणि प्रतिष्ठा पाहिजे आहे त्यासाठी त्यांनी तत्व विकले आहेत. आज जागतिक कीर्तीचे विद्वान त्यांना शरण गेले आहेत हे पाहून मनाला खूप वेदना होतात. आणि यासाठी आमच्या बापाने आम्हाला शिक्षण दिले का ? त्यांनी त्याग केला का ? असे अनेक प्रश्न मनाला सतावतात. आज आपला समाज एका अधोगतीला आमंत्रण देत आहे असे नाइलाजाने म्हणावे लागते. 

              कधी परशुराम याची जयंती मोठया थाटात साजरी झाली का ? एक तर ते संख्येने कमी त्यामुळे कोण येणार? आणि कोण नाचणार? हा प्रश्न आहे ते असे कार्यक्रम साधे करतात त्यांना माहीत आहे याचा फारसा उपयोग नाही. पण त्यांचे नियोजन आणि अजेंडा मात्र असा असतो की, आपल्या बहुजन तरुणांना कसे वाईट मार्गाला लावायचे कसे त्यांना अंधभक्त बनवायचे आणि त्यामुळे कसे हे सर्व आपले गुलाम होतील ?आणि ते या कार्यात यशस्वी झाले हे आपण पाहत आहोत. ते आपल्या बहुजन तरुण पिढीला कामाला लावतात आणि स्वत: मात्र अभ्यास करतील आणि आपले बहुजन तरुण वर्षभर अनेक सण-उत्सवात सहभागी असतात आणि मग आपण सर्व मानसिक गुलाम झालो आहोत. आपल्या बहुजन तरुणांना एक नशा दिली आहे हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, अखंड भारत होईल यांना हे खरेच वाटते. पण आपल्याला हे वास्तव समजत नाही की,हे आता कसे शक्य आहे पण आपले बहुजन तरुण लागले कामाला आणि यांचे तरुण मात्र घरी आपला अभ्यास आणि शिक्षण करतील विदेशात जाऊन शिक्षण घेतील, आणि आपले तरुण मग शिक्षणाचे वय संपले की, मग त्याला कळते आणि मग काही उपयोग होत नाही. पण आता सावध व्हावे लागेल. आपले अनेक वर्ष नाचण्यात गेले आता सावध होऊन आपल्या विचार परिवर्तन करण्यात वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल. आपलीसमाज व्यवस्था काय आहे ? आपल्याला कोण कसे दिशाहीन करीत आहे ? आपला वापर आपल्याच बहुजन बांधवा विरुद्ध कसा केला जात आहे ? आपल्याला देवा धर्माच्या नादी लावून कशी त्यांची राजकीय पोळी भाजली जात आहे ? असे अनेक प्रश्न आज आपल्या आंबेडकरी आणि बहुजन तरुणांना पडले पाहिजेत. असे सांगितले जाते की, कार्ल मार्क्स यांचा अंत्यविधिला सात लोक होते आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधिला लाखो लोक होते पण नंतर हेच लाखो लोक अनेक दिशेला गेले आणि त्यांच्यात विचार आणि एकी राहिली नाही. आणि कार्ल मार्क्सचे अनुयायी मात्र काम करीत राहिले आणि आज भारतात या सात लोकांनी निष्ठेने काम करून कांही राज्यात सत्ता आणली आहे याला म्हणतात मिशन आणि काम नाही तर आपण कधी पाहिले आहे का की, कार्ल मार्क्स च्या जयंतीला काही अनुयायी नाचत आहेत. नाही कारण मिशन पुढे नेण्यासाठी नाचण्याची नाही तर पुस्तके आणि माणसे वाचण्याची खरी गरज आहे. हे आपण ओळखले पाहिजे. आणि आपल्याला एवढा मोठा वारसा आहे शिक्षण आणि वाचन करण्याचा पण आज आपण जरा काही नौकरी किंवा उत्पन्नाचे साधन मिळाले की, लगेच आपला समाज आणि बाबासाहेबांचे कार्य विसरून जातो. आपण आज इतके उत्सव प्रिय झालो आहोत की, त्यामुळे आपल्याला कुठे जायचे आहे आणि काय करायचे आहे याचा आपल्याला विसर पडला आहे. त्यामुळे विरोधी संस्था आणि लोक याचा पुरेपूर फायदा घेतात. आज अनेक षडयंत्र चालू आहेत आपल्याला फोडण्याचे पण आपण सावध नसल्यामुळे आज अनेक आपले विद्वान लोक सुद्धा काही लाभासाठी बळी पडत आहेत. आणि मला एक फार विशेष वाटते आणि वाईट सुद्धा वाटते की, आपले अनेक उच्च शिक्षित लोक सुद्धा सनातनी लोकांच्या डावाला बळी पडत आहेत. आज अनेक उच्च शिक्षित अधिकारी आणि विशेष करून अनेक क्षेत्रातील विद्वान लोक काही थोड्या फायद्यासाठी आपले काम सोडून त्यांचे काम करीत आहेत. हे ऐकून आणि पाहून मनाला खूप वेदना होतात आणि यासाठी बाबासाहेबांनी हे सर्व केले होते का ? हा प्रश्न पडतो. आपल्या सर्वच महापुरुषांनी जे आपल्यासाठी कार्य केले आहे ते आपण सर्व एक होऊन आपल्या बहुजन बांधवासाठी काम करणे हा उद्देश होता. पण आपण अनेक ठिकाणी जाऊन आपलेच तुकडे करून आपली चळवळ मागे नेत आहोत. आपली बहुजन चळवळ दिशाहीन होऊ नये म्हणून आपले नेतृत्व हे उच्च शिक्षित , अभ्यासू आणि प्रामाणिक  असले पाहिजे. आणि आपण सतत वाचन करून आपल्या बहुजन समाजाला दिशा दिली पाहिजे. आज हळूहळू आपले वाचन कमी होत चालले आहे.आणि आपण इतर आमिषाला बळी पडत आहोत. आपण 14 एप्रिल आणि इतर प्रसंगी फक्त मिरवणुका काढणे आणि नाचणे यालाच महत्व देत आहोत आणि असे करून आपल्या विरोधी गटाचे काम सोपे करीत आहोत. आपण हे तर केलेच पाहिजे कारण आपण आज जे काही आहोत ते या सर्व महापुरुषामुळे पण त्यांचा मार्ग मात्र आपण विसरता कामा नये. आज अनेक बहुजन तरुणांना डॉ. बाबासाहेब कोण होते आणि त्यांनी काय केले याचे काही घेणे –देणे नाही तो इतर सण-उत्सवात मश्गुल आहे आणि फक्त मुलांचे प्रवेश आणि नौकरी आली की, मग राखीव जागा कोणत्या आहेत आणि कसे प्रवेश घेता येते हे मात्र पाहतो पण हे सर्व कोणी केले आणि आज आपले कर्तव्य काय आहे हे मात्र विसरला आहे. आणि इतर अनेक काल्पनिक  बाबी वर मात्र खूप वेळ , पैसा खर्च करतांना दिसत आहे . पण असे न होता आपण आपल्या सर्वच महापुरुषांना न विसरता त्यांचे कार्य पुढे नेले पाहिजे आणि आपण सर्व बहुजन लोकांनी एकत्र राहिले पाहिजे.  

                               एखाद्या प्रसंगी नाचणे किंवा एखादे वाद्य वाजवणे हा क्षणिक आनंद असतो पण हे आपल्या समस्येवरचे कायमचे उत्तर नाही. आणि आपण आता कायमचे उत्तर शोधले पाहिजे. आणि हे आपल्याला अभ्यास करून मिळेल आणि म्हणून काही दिवसापुर्वी आपल्या महाराष्ट्रत 14 एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी अनेक शहरात 18 -18 तास अभ्यास करून जयंती साजरी करण्याची पद्धत सुरू केली होती तो एक अभिनंदनास पात्र उपक्रम आहे. पण यापासून आपण प्रेरणा घेऊन हे कार्य अनेक दिवस आपल्या वयक्तिक पातळीवर सुरू केले पाहिजे हे खरी जयंती साजरी केली असे म्हणता येईल. आणि अशी जयंती आपण आपल्या प्रत्येक महापुरुषाची साजरी केली पाहिजे कारण आज वेळ अशी आहे की, आपल्याला याचे स्वरूप बदलावेच लागेल. आज आपले तरुण दिशाहीन होत चालले आहेत, त्यामुळे आपले महापुरुष आणि त्यांचे कार्य आणि उद्देश आपल्याला समजला पाहिजे. आपल्याला सनातनी लोक कशा प्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला आपले उत्तर काय असावे याची जाणीव आपल्याला वाचन आणि चिंतन केले त्यावर आपण चर्चा केली तरच आपणास समजेल असे फक्त एक दिवस नाचून आपले महापुरुष समजत नाहीत. हे आपण आता लक्षात घेतले पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला आणि त्यामध्ये एक तत्व आहे कार्यकारणभाव त्याचा साधा अर्थ आहे की, आपण कोणतीही गोष्ट कारणाशिवाय करू नये आपण आज आपले अनेक  तरुण केश आणि वेशभूषा फार विचित्र प्रकारची करीत आहेत ज्यामुळे समाजात एक चिंतेचे वातावरण तयार झाले आहे अशी केश आणि वेशभूषा केल्यामुळे आपण समाजात एक विश्वास निर्माण करू शकत नाही. आणि जर समाजाचा विश्वास निर्माण केला नाही किंवा संपादन केला नाही तर मग आपली चळवळ पुढे नेऊ शकत नाही. कारण त्यासाठी लोकांचा आपल्यावर विश्वास असणे ही पहिली अट आहे. आजकाल अनेक तरुण नेतृत्व सुद्धा अशा विशिष्ट केशभूषा करून पुढे यात आहेत. आणि ते पाहून तर मला त्यांचे विचार ऐकण्यापेक्षा त्यांचे राहणीमान पाहून किळस येते. आणि हे आपल्या समाजाचे काय भले करतील हा प्रश्न सुद्धा पडतो. कारण समाजाची चळवळ पुढे नेण्यासाठी अशा केशरचनेची नाही तर वैचारिक पाताळीची गरज आहे. म्हणजे एखादा तरुण विदेशातून शिक्षण घेऊन आलेला आहे म्हणजे काय आपले राहणीमान विसरला आहे का ? आणि हा काय आजपर्यंत एकटाच परदेशात गेलेला आहे का ? प्रथम तर आपले आदर्श महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे गेले होते. मग त्यांनी काय असे विचित्र कपडे आणि केशरचना केली होती का ? याचा विचार यांनी केला पाहिजे. तुम्ही किती विद्वान आहात ,किती प्रामाणिक आहात आणि समाजाप्रती तुमची तळमळ किती आहे हे जास्त महत्वाचे आहे तुमची केशरचना आणि कपडे याचा काहीच उपयोग नाही. मग आपले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रुबाब आणि व्यक्तिमत्व तर एखाद्या सिनेमातील नायकाला लाजवेल असे आहे आणि त्याला जोड जागतिक विद्वत्ता आणि शीलवान आहेत. तर मग त्यांनी का बरे असे विचित्र कपडे आणि केशरचना केली नाही याचा विचार आज असे वर्तन करणार्‍या या तरुण नेतृत्वाने करावा अशी माफक अपेक्षा आहे. त्यासाठी वाचन , चिंतन आणि वैचारिक चर्चा या बाबी खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येक काळात समाजाची प्रगती करण्याची एक प्रक्रिया असते आणि त्या त्या काळात तशी प्रक्रिया होते मग कांहीना वाटेल मग सुरूवातीला तर आपण तेच केले म्हणजे अनेक वर्ष आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला नाचलो आणि आता काय हे नवीन सांगता आहात. पण तसे नाही तर आपल्याला सुरूवातीला तेच योग्य वाटले कारण वैचारिक समज एकदम येत नाही आपल्या समाजात एक पहिली पिढी शिकली आणि त्यामुळे तेंव्हा आपण एवढे प्रगल्भ झालो नव्हतो पण आता किती वर्ष झाले मग त्यात सुधारणा केली  पाहिजे. आणि आता आपण वयक्तिक पातळीवर सुद्धा आपली शैक्षणिक प्रगती कशी करता येईल याचा गंभीर विचार केला पाहिजे. कारण बुद्धाने आपल्याला अत्त दीप भव ! असा उपदेश केला आहे आणि त्याचा साधा अर्थ आहे की,आपण स्वत: प्रकाशित झाले पाहिजे म्हणजेच आपण स्वत: स्वत:ची प्रगती केली पाहिजे. आणि असा आपण प्रत्येक व्यक्तीने विचार केला तर त्याचा परिणाम समाज पुढे जाईल. आणि आपण आर्थिक , वैचारिक आणि इतर क्षेत्रात पुढे जावे हाच तर उद्देश होता. म्हणजे बघा डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी त्यांच्या जीवनात वेळ वाया कधीच घालवला नाही. आणि आपण आज अनेक ठिकाणी आपला वेळ वाया घालवतो आहोत. आपण आपल्या महापुरुषांचा विचार दररोज जगला पाहिजे असे मला वाटते. आपण दररोज वाचन लिखाण आणि चिंतन केले पाहिजे आणि आपल्याला जे नवीन माहिती झाले आहे ते इतरांना सांगितले पाहिजे. आणि ही वैचारिक चळवळ अशीच आपण पुढे नेली पाहिजे. आज आपल्या बहुजन समाजात अनेक चांगले वक्ते आहेत चांगले लेखक आहेत आणि त्यामुळे वैचारिक  चळवळ पुढे नेण्याचे चांगले मार्ग आहेत साधने आहेत मग आपण कुठे कमी पडतो तर आपण भौतिक प्रगतीकडे जास्त लक्ष दिले आणि वैचारिक मागे जात आहोत हे फार धोकादायक आहे. आज अनेक आपली माणसं नौकरी व्यवसायात पुढे गेली की, मग त्यांची पुढची  पिढी वैचारिक दृष्टीने अपंग होत आहे त्यांना फुले , शाहू ,आंबेडकर , शिवाजी महाराज , संभाजी महाराज , संत तुकाराम आणि पेरियार सारखे महापुरुष कोण होते ? आणि त्यांनी आपल्यासाठी काय केले आहे ? याची उत्तरे माहीत नाहीत. हा गंभीर धोका आहे. काही दिवसापुर्वी आपल्या मुंबई शहरात एका चॅनेलने सर्वे घेतला होता की, 26 नोव्हेंबर या दिवशी काय आहे म्हणजे या दिवसाचे महत्व काय आहे याचा एक आढावा घेतला तर जास्त लोकांना सांगता आले नाही. आणि कमी जास्त हीच अवस्था आहे आपल्या तरुण पिढीची आणि त्यामुळे  एक वैचारिक चळवळ पुढे नेणे आज काळाची गरज आहे. आज जर आपले महापुरुष आणि त्यांचे कार्य आपण विसरून गेलो तर मग पुढे सर्व अंधार आहे. आणि हाच तर उद्देश आहे येथील सनातनी लोकांचा आपल्याला दिशाहीन करण्याचा मग आपण आपल्या महापुरुषांचा विचार आणि लढा पुढे घेऊन गेले पाहिजे. 

                              आज अनेक बहुजन तरुण आपल्या महापुरुषांचे साहित्य वाचत आहेत त्यावर चर्चा करीत आहेत एक आशादायी बाब सुद्धा आहे. कारण आपल्या बहुजन समाजात वेगवेगळे गट पडले पाहिजे अशी व्यूहरचना सनातनी लोक करतात आणि त्यांनी हे केले आहे . म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर त्या दिवशी फक्त बौद्ध समाजानेच पुढे होऊन तयारी करावी आणि इतर लोकांनी तिथे जाऊ सुद्धा नये अशी व्यवस्था केली होती. पण गेल्या काही वर्षात एक मोठे आशादायी परिवर्तन झाले आहे की, अनेक मराठा समाज किंवा इतर समाजातील लोक येतात आयोजन करण्यास मदत करतात आज अनेक मराठा उच्च शिक्षित तरुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रभावी व्याख्यान देत आहेत आणि अनेक मुस्लिम तरुण शिवाजी महाराज , संभाजी महाराज यांच्यावर प्रभावी व्याख्यान देत आहेत हीच तर खरी आपली चळवळ आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या महापुरुषांची चळवळ पुढे नेण्याचा विचार केला तर ही सर्वात मोठी ताकद आहे. आणि याचे प्रमाण पुढे वाढले तर आपण पुढे जाण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. आणि हेच आपल्या सर्व महापुरुषांचे स्वप्न होते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आज आपण पाहतो की, कोणताही मोर्चा असेल ,आंदोलन असेल आणि कोणत्याही जाती धर्माचे लोक असतील ते म्हणतात की, आम्हाला संविधान महत्वाचे आहे आणि आज संविधान वाचले पाहिजे असे ते का म्हणतात ? याचे कारण त्यांच्यात जागृती निर्माण झाली आहे आणि शिक्षण घेतल्यामुळे त्यांना संविधान काय आहे आणि त्याचे आपल्या जीवनात काय महत्व आहे हे त्यांना आज समजत आहे. तीन तलाक असेल काहीही असेल तर महिला आणि पुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेऊन आज पुढे येत आहेत त्यांना एक अशा आहे की, आज आम्हाला संविधानच वाचवू शकते. त्यामुळे आता आंबेडकरी अनुयायावर मोठी जबाबदारी आहे की, आपण आपल्या महापुरुषांच्या जयंती निमित्त समाज जागृती केली पाहिजे. आज अनेक ठिकाणी लोक खूप घाई करतात म्हणजे महापुरुषांना हार घालणे आणि लगेच निघणे वेळ नाही पण मला वाटते असे कांहीच नसते आज आपल्याला वेळ असतो पण आपण विनाकारण व्यस्त असल्याचे नाटक करतो. जर आपण आज जे आहोत ते याच महापुरुषामुळे आणि जर त्यांच्यासाठी वेळ नसेल तर मग आपण गददार आहोत त्यांच्याप्रती असे मला वाटते. मी काही वर्षापुर्वी एका ठिकाणी 14 एप्रिल या जयंती दिवशी व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो तर त्यांनी मला सांगितले की, आपण 9 वाजता सकाळी सुरुवात करू आणि 10 वाजता कार्यक्रम संपला पाहिजे. जे इतर पाहुणे आहेत त्यांना वेळ नाही आता मला समजले हे फक्त औपचारिकता करून घेत आहेत. म्हणजे आपण कार्यक्रम घेतला म्हणजे झाली आपली जबाबदारी आहे. पण आंबेडकरी लोक जर असे  करीत असतील तर मग कसे होणार ? आणि मी त्याठिकाणी स्पष्ट सांगितले की, हे सर्व कसे नाटकी लोक आहेत कारण माझा स्वभाव स्पष्ट आहे बोलणे स्पष्ट आणि लिहणे सुद्धा स्पष्ट आपल्याला आपल्या महापुरुषांची चळवळ पुढे नेण्याचे कार्य करतांना आपला एक छोटासा खारीचा वाटा उचलावा पण यापेक्षा जास्त महत्वाचे आहे की, तो प्रामाणिक असावा त्यात कोणता स्वार्थ नको आणि आपल्याकडुन  एखादे चुकीचे काम नको . म्हणजे आपला वापर कोणी सनातनी करीत असेल तर आपण सावध असले पाहिजे. 

                                                                आजकाल आपले अनेक विद्वान कांही फायदे घेण्यासाठी आपल्या विरोधी गटात जाऊन बसत आहेत आणि आपली चळवळ मागे नेत आहेत. काही पदव्या आणि पुरस्कार मिळवण्यासाठी हे आपले अर्धवट विद्वान कोणत्याही मंचावर जात आहेत आणि त्यांचे पुरस्कार घेत आहेत पण ही आपल्या बापाशी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) आणि आपल्या सर्वच महापुरुषांशी केलेली बेईमानी आहे. आणि जे बाबासाहेबांशी बेइमान झाले त्यांचे काय झाले आणि आजही काय होत आहे आपण पाहत आहोत.आज अनेक स्वत:ला आंबेडकरी नेते म्हणवणारे लोक विरोधी विचार असणार्‍या लोकांशी हातमिळवणी करतात. आणि मग ते आर्थिक हेतु साध्य करतात. पण आपल्या समाजाच्या मनात मात्र त्यांचे स्थान निर्माण होऊ शकत नाही. जो समाजाशी प्रामाणिक असतो त्याची प्रतिमा आपोआप चांगली तयार होते. आणि जे गद्दारी करतात त्यांचे हाल आज आपण पाहत आहोत आणि पुढे सुद्धा यापेक्षा वाईट अवस्था होणार आहे. आज कांही आपले कार्यकर्ते भावनिक करून समाजाचे मत घेण्याचा प्रयत्न करीत आहेत पण ते चूक आहे. तुम्ही प्रामाणिक काम करा समाज तुमच्या मागे निश्चित येईल. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे कार्य पार पाडताना कधीच भावनिक झाले नाही. पण आपण आज फार भावनिक होऊन आपल्या समाजाला सत्य काय आहे यापासून दूर ठेवत आहोत. कर्तव्य पार पाडतांना बाबासाहेब आंबेडकर फार कठोर होत असत आपण त्यांचा पत्रव्यवहार जर वाचला तर लक्षात येईल. त्यांचे पहिले लक्ष समाज होता आणि मग नाते आणि कुटुंब होते. म्हणून आपण एक दिवस भावनिक होऊन नाचण्यापेक्षा सतत वाचन ,चिंतन आणि चर्चा यातून आपली आंबेडकरी आणि बहुजन चळवळ पुढे नेण्याचे काम केले पाहिजे. आणि तेच करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. 

                                                                                       प्रा. डॉ. आर. जे . इंगोले 

 नाशिक   9423180876 )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!