क्रांतिबा…..!;
क्रांतिबा…..!; तुला त्यांनी लग्नाच्या भर वरातीतून हाकलंलं शुद्र म्हणून अपमानित करुन. अन्……
चेतली तुझ्यात स्वाभिमानाची—मानवी अस्मितेची ठिणगी.
तु शोधू लागलास;
“ढोल, गँवार, पशु, शुद्र, नारी।
ये सब ताडनके अधिकारी।।” या धर्म वचनातलं सत्य.
चीरफाड करु लागलास सार्या ईश्वर निर्मित धर्म ग्रथांची, ईश्वरांची, त्यांच्या भाकड कथांची, कर्मकांडांची, ब्राह्मणी पुरोहित व्यवस्थेची.
“जेव्हा ब्रह्मदेव बाळंत झाला” म्हणत;
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्रांच्या जन्माच्या भाकड कहाण्यांची.
तु केलीस पोलखोल.
स्वत:च्या लेकीवर बलात्कार करणार्या ब्रह्म्याच्या ब्रह्मत्वाला आव्हान देत.
विष्णु अन् त्याचे नऊ अवतार, सत्यनारायण.
देव—धर्माच्या नावाने पुरोहितांनी चालवलेली लूट.
रामाच्या रामलीला.
गणपतीचा जन्म.
सार्या भाकड कथांची केलीस चीरफाड.
बळीराजाचा खून पचवणारी दिवाळी.
बृहदरथाचा खून.
या सार्यांना वाचा फोडत.
त्यांनी शुद्र म्हणून गाडुन टाकलेल्या शिवबाला
दिलास पुर्नजन्म.
कुळवाडी भुषण म्हणून केलीस.
पहिली जयंती साजरी राजा शिवाजीची. क्रांतिबा! ;ज्यांनी अंथरल्या होत्या इंग्रजांच्या सत्तेसाठी पायघड्या.अन् …
अंमलदार—कारभारी म्हणून सत्तेवर बसवली होती पकड जन्मजात.
इंग्रजांनी शिक्षणाची फळे पोहचवायला केला आरंभ.
शुद्र(ओबीसी), अस्पृश्य, आदिवासी, भटक्या—विमुक्तांपर्यंत.
तेव्हा पुकारले बंड त्यांनी स्वराज्याचे.
त्यावेळी वंचीतांना ज्ञानाची कवाडे खोलणार्या.
इंग्रजी सत्तेची केलीस तु खुलेआम पाठराखण.
कुणाचाही मुलाहीजा न ठेवता.
क्रांतिबा…!; तु देव-धर्माच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाला आव्हान देत.
स्री, शुद्र, शुद्रातिशुद्र, बळीराजा (शेतकरी-श्रमिक) ,शोषित-वंचीतांना.
केलंस शिक्षित—शहाणं;
“विद्येविनं मति गेली।मतिविनं नीति गेली।।
नीतिविनं गति गेली।गतिविनं वित्त गेले।।
वित्ताविनं शुद्र खचले।
इतुके सारे अनर्थ एका अविद्येने केले।।”;
असं अज्ञानाविरुद्ध बंड करत.
शेतकर्यांचा आसूड फटकारत.
सत्यशोधक धर्माची फिरवलीस द्वाही.
तथागत बुद्धांशी नातं सांगत.
क्रांतिबा…..!; तुझ्या मानवी हक्क लढ्याचा वसा पत्करुन.
तुझं शिष्यत्व स्वीकारलं मुक नायकाने आपल्या खांद्यावर.
मांडला जगाच्या वेशीवर धर्माच्या नावाने अधर्म.अन्….
देवांच्या बाजारातील माणसाच्या माथी मारलेलं जनावराचं जीणं.
क्रांतिबा…!; आज तु ही नाहीस.
तुझा शिष्यही नाही.
१९ व्या शतकात तु पेरलेले क्रांतिचे बीज रुजुन मानवतेचा वृक्ष फोफावला असता; तर….
गळुन पडले असते सारे भेदाभेद. जाती, धर्म, लींग, वर्णाच्या नावाने माणसांचेच शोषण करणारे.अन् ….
माणसातल्या पशूंचा धींगाना घालणारेही.
झाली असती माणसे, माणूसकीचं गाणे गाणारी.
पण; आजही वंचीत आहेत वंचीतच माणूसकी पासून.
दलित न्यायाधीशालाही भोगावी लागते सजा.
न्यायाचा दरवाजा ठोठावल्याची.
न्यायालयात आजही ब्राह्मणी वर्चस्व कसे रे?
जातीनुसार जागतात स्री वरच्या अत्याचारांच्या संवेदना. दलिताला पूजार्याचा अन्…
स्रिला देवळात प्रवेशाचा हक्क मागत.
गुलामीचे साखळदंड २१व्या शतकात होताहेत अधिकच जखडबंद.
तुझ्या मुकनायक शिष्याने दिलेलं.
समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची हमी देणारं.
संविधानही धोक्यात आलंय.
धर्माधीष्ठित राष्र्टासाठी धर्मयुद्ध सुरु झालंय.
क्रांतिबा;तु झाला होता तथागतासारखाच.
दु:खाचे मुळ जे अज्ञान.
ते दूर करणारा दीपस्तंभ.
ज्ञान तळागाळापर्यंत पोहचवणारा.
ज्ञानाने अंधश्रद्धांची पाळेमुळे उखडून टाकणारा.
खराखुरा सत्यशोधक.
आज मृत्युचं संकट मानवी जीवनावर घोंघावत असतानाही.
धर्मांधतेने जखडबंद केलेल्या.
भेजाची कवाडे घट्ट बंद करुन. आम्ही जेव्हा महाशक्ती जागवायला.
अकलेचे दिवे पाजळायला लागतो.
अश्यावेळी तु असतास;तर…
तु फटकारला असतास तुझा आसुड अन्….
गुलाम भेजांवर केली असती शस्रक्रिया सत्यशोधनासाठी.
मानवतेची बीजे जातधर्मांपल्याड जावुन.
मनामनात पेरण्यासाठी.
क्रांतिबा…..!; तुझा आसूड पुन्हा उगारायची गरज आहे.
जाती—धर्मांचे साखळदंड तोडून टाकायची गरज आहे.
धर्मस्थळेच उखडुन टाकुन ज्ञानस्थळे उभारायची गरज आहे.
सत्ता,संपत्ती,धर्म आणि न्यायाचे नाते.
उध्वस्त करायची गरज आहे.
कोरोनाने मरणारांच्या प्रेतांबरोबरच.
धर्मांधतेच्या चितेला चेतवायची गरज आहे.
माणसाचं माणसाशी माणूसकीचं नातं जागवायची गरज आहे.
हेच तर क्रांतिबा जोतिबा फुलेंना विनम्र अभिवादन…….!!!!
-जयवंत हिरे
“क्रांतिकारी जनता”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत