गुरु-शिष्यांनी वादळ निर्माण केलं !
आर. के. जुमळे
लेखांक १
११ एप्रील ला क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या गुरु- शिष्यानी या महाराष्टातच नव्हे तर संपुर्ण भारतात एक प्रकारचा झंझावात, वादळ निर्माण केले होते. संपुर्ण समाजमन त्यांनी ढवळून काढले होते.
फुले-शाहु-आंबेडकर चळवळीचा १८४८ ते १९५६ पर्यंतचा १०८ वर्षाचा हा संघर्ष होता. ज्योतीबा फुले यांनी या समाज क्रांतीच्या इमारतीचा भक्कम असा पाया रोवला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावर कळस चढविला.
या देशात त्यांनी न भुतो न भविष्यती असा क्रांतीकारी इतिहास घडविला. त्यांच्याच संघर्षामुळे आम्हाला आज गोड फळे चाखायला मीळत आहे.
एक शायर म्हणतो-
हजारो सालोसे नरगीस अपने बेनुरीपे रोती है।
बडे मुश्किल से होती है चमन मे दिदारे पैदा॥
याचा अर्थ, हजारो वर्षापासून नरगीस आपल्या विद्रुप चेहर्याकडे पाहून रडत होती. परंतु जेव्हा बागेत फुलं उगवायला लागले तेव्हा ती हसली.
त्याच प्रमाणे हजारो वर्षापासून शुद्र अतिशुद्र, स्त्रिया, बहुजन समाज आपल्या विद्रुपतेकडे म्हणजे दयनीय परिस्थितीकडे पाहून रडत होते. परंतु जेव्हा याच खाणीत क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारखे हिरे पैदा होऊन ते समाजाचे दु:ख दुर करण्याचा प्रयत्न करायला लागले. तेव्हा कुठे या समाजाला हायसे वाटले. आशेचा किरण दिसला.
कालची मुके आज बोलू लागले. कालपर्यंत आम्ही मूके होतो. आज मात्र बोलू लागलो. ही किमया या दोन्ही गुरु शिष्यानी घडवून आणली आहे. एक काळ असा होता की प्रस्थापीत व्यवस्थेने येथील शुद्राती-शुद्र बहुजन समाजाला शिक्षणापासून दूर ठेवले होते. क्रांतीबा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हातात लेखणी दिली. त्यामुळे आज हा वर्ग मोठमोठ्या हुद्यावर जाऊन पोहचला आहे.
वामन दादा कर्डक आपल्या गाण्यात म्हणतात की, ‘शेणाचे हात लावले पेणाले‘ ज्यांचे हात नेहमी गाई-ढोराच्या शेणाने माखलेले असायचे, आता त्यांच्या हातात लेखणी आली आहे. ही लेखणी क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्या हातात दिली ही गोष्ट आपण कधिही विसरता कामा नये.
निसर्गातील साध्या पाण्याला तहान भागवण्यासाठी हात लावता येत नव्हता. ज्योतिराव फुलेंनी आपल्या आवारातील हौद त्यावेळी अस्पृष्यांसाठी खुला केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी सत्याग्रह करावा लागला होता. जेथे कुत्रे, मांजरे, गाई-ढोरे पाणी पित होते परंतु माणसांना मात्र पाण्याला शिवण्यास मनाई होती. त्यांची सावली सुध्दा उ़च्चवर्णीय आपल्या अंगावर पडू देत नव्हते. निरनिराळ्या प्रकारे त्यांनी गुलामीत जखडून ठेवले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्यांना इतिहास माहीत नाही ते इतिहास घडवू शकत नाही. एक इतिहास व्यक्तीला बदलवू शकतो तर व्यक्ती सुध्दा इतिहासाला बदलू शकतो असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. या दोन्ही गुरु-शिष्याने अस्पृष्यतेचा, विषमतेचा हजारो वर्षापासून चालत आलेला अमानवी इतिहासाचा प्रवाह रोखून धरला. परिवर्तन करण्याची एवढी प्रचंड ताकद त्यांच्या चळवळीमध्ये होती. ही बाब नाकारता येणार नाही.
जोसेफ मॅझनी नावाच्या एका विचारवंताने म्हटले होते की, माणूस जरी मर्त्य असला तरी त्याचे विचार मात्र जिवंत राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा खोडून काढतांना सांगितले की, असे समजणे घोडचुक होईल. कारण एखाद्या रोपट्याला जिवंत ठेवण्यासाठी खत व पाणी देण्याची आवश्यकता असते. नाहीतर ते मरुन जाईल. त्याचप्रमाणे विचाराला जिवंत ठेवण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार होणे तितकेच महत्वाचे आहे. नाहीतर ते विचार सुध्दा मरुन जाईल. क्रांतीबा ज्योतिराव फुलेंचे विचार सुध्दा असेच काळाच्या आड लपलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले व त्यांचे मानव कल्याणाची चळवळ शुध्द स्वरुपात पुढे नेली.
कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांनी बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी अनेक शाळा, कॉलेज, वसतीगृह काढले, ते म्हणतात-
‘एक वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा..
शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसे पेरा..
व पाच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा…’
म्हणून महापुरुषांचे विचार एका पिढीतून दुसर्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहचविण्यासाठी विचार पेरणे आवश्यक आहे. नाहीतर ते विचार खंडीत होवून जातील.
क्रमशः
आर. के. जुमळे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत