संजय राऊत हेच कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार – संजय निरुपम यांचा पत्रकार परिषदेत घणाघात
मुंबई : काँग्रेसने पक्षातून निलंबित केलेले संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत कोरोना काळातील बहुचर्चित खिचडी घोटाळ्या प्रकरणी गौफ्यस्फोट केला.
शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे संजय राऊत हेच खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत असा गंभीर आरोप यांनी केला आहे. मुलगी, भाऊ आणि पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत असा धक्कादायक आरोप संजय निरुपम यांनी केला आणि या प्रकरणात दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान याच प्रकरणी उद्दव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावले असून, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
“सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीत राजीव साळुखे, सुजीत पाटकर हे संजय राऊतांचे पार्टनर आहेत. कोविडमध्ये त्या कंपनीला 6 कोटी 37 लाखांची खिचडी पुरवण्याचं कंत्राट मिळालं होतं. या कंपनीतून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंब, मित्रांनी 1 कोटी रुपये दलाली म्हणून घेतले. बँकेतील खात्यातून मुलीच्या नावे संजय राऊतांनी चेकने लाच घेतली. 29 मे 2020 रोजी 3 लाख 50 हजार रुपये खात्यात आले होते. 26 जून 2020 रोजी 5 लाख रुपये मिळतात. 6 ऑगस्टला 1 लाख 25 हजार, 20 ऑगस्टला 3 लाखांचा एक चेक येतो. याचदरम्यान संजय राऊतांचे सख्खे भाऊ संदीप राऊत यांच्या खात्यावर 6 ऑगस्टला 5 लाखांचा चेक मिळाला,” असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
“35 रुपयात 300 ग्रॅम खिचडी पुरवठा कऱण्याचं कंत्राट सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीला मिळालं होतं. कोविडमध्ये सगळीकडे हाहाकार माजला होता. सगळं काही बंद पडलं होतं. अशावेळी हतबल लोकांना खिचडी पुरवण्याचा कंत्राट पालिकेने कंपनीला दिलं होता. पण नंतर 16 रुपयात 100 ग्रॅम खिचडी देण्याचं कंत्राट दिलं जातं. म्हणजे 200 ग्रॅम खिचडी चोरण्यात आली. म्हणूनच फक्त उमेदवार (अमोल कीर्तिकर) नाही, तर संजय राऊतही खिचडी चोर आहेत. त्यांनी पैसे खाल्ले आहेत. कंपनीत कदम नावाचा व्यक्ती नसताना, करारात मात्र त्याचाच उल्लेख आहे,” असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा सगळा घोटाळा झाला आहे. लोकांचा जीव जात असताना उद्धव ठाकरे गटाचे लोक गरिबांच्या हक्काच्या खिचडीत घोटाळा करत होते. ईडीने चौकशी वाढवावी आणि संजय राऊतांना अटक करावी. त्यांनी जी चोरी केली आहे ती अमानवीय आणि निर्दयी गुन्हा आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत