कर्नाटकातील बौद्धधर्म Buddhism in Karnataka
कर्नाटक म्हटले म्हणजे आपल्याला सीमा प्रश्नाचा वाद आठवतो. कानडी भाषा आठवते. दक्षिण भारतातील हे सुंदर राज्य पूर्वी म्हैसूर प्रांत म्हणून ओळखले जात होते. १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक अस्तित्वात आले आणि १९७३ मध्ये त्याचे कर्नाटक नामकरण झाले. हा म्हैसूर प्रांत म्हणजे बौद्ध संस्कृतीची खाण आहे. मध्यप्रदेशात स्तूप, महाराष्ट्रात लेण्यां तर कर्नाटकात शिलालेख आणि विहारे (मंदिरे) दृष्टीस पडतात. येथे अशोक कालीन १७ शिलालेख आहेत. यामध्ये १३ लघु शिलालेख आणि ४ मोठे शिलालेख आहेत. सन्नाती आणि बनवासी ही स्थळे मौर्य आणि सातवाहन राजवटीची साक्ष आहेत. एकेकाळी बौद्ध विहार असलेले मल्लिकार्जुन देऊळ आणि काशी विश्वनाथ देऊळ यांचा समावेश आज जागतिक वारसा यादीत आहे. तसेच मुंदगोड येथे तिबेटी निर्वासित १९६६ पासून रहात असून तेथे २ मॉनेस्ट्री आणि बौद्ध शाळा आहेत.
सम्राट अशोक यांचे अगोदर चंद्रगुप्त यांनी जैन धर्मास जरी म्हैसूर प्रांतात आश्रय दिला होता तरी विविध राजवटीतील शिलालेख, त्यांची नाणी आणि चिनी भिक्खूंची प्रवासवर्णने यातून कर्नाटकमध्ये बुद्धधम्माचे कसे आगमन झाले याची माहिती मिळते. सिलोनच्या दीपवंस आणि महावंस ग्रंथात देखील म्हैसूरमधील बौद्ध धर्माची प्राथमिक माहिती मिळते. बौद्ध भिक्खू महादेवा यांना महिषामंडला आणि रक्खीतां यांना बनवासी मध्ये पाठविले असा दाखला आहे. येथील शिलालेखावरून लक्षात येते की त्या काळी बौद्ध धर्म या प्रांतात चांगलाच रुजला होता. अंकोला येथे बाबरावाडा, सिरीसा येथील बिदिराहल्ली आणि मुंडागोडू मधील बेडागाव येथे बुद्धप्रतिमा सापडल्या आहेत.
बदामीचे चालुक्य हे वैदिक आणि जैन धर्माचे पाठीराखे दिसत असले तरी येथील गुहा नंबर २ आणि ३ मध्ये पद्मपाणि अवलोकितेश्वर कोरला आहे. तलकाडू येथील एका ताम्रपटावर बोधिसत्व यांना दान दिल्याचा उल्लेख आढळतो तसेच त्यावर शक्यशिला हा शब्द आढळतो. होयसळ राजवटीत बुद्धाचे झालेले विष्णूरूप पहायला मिळते. त्याचेही शिल्प प्राप्त झाले आहे. चंद्रवल्ली आणि बल्लीगमे येथील शिलालेखात तारा भगवती, लोकेशा देवता आणि बुद्धदेवा येथील देवस्थानानां दान दिल्याचे उल्लेख आहेत. बनवासी येथे ब्राम्ही लिपितील तिसऱ्या शतकातील शीलालेख आढळलेला आहे. बनवासी येथील मधुकेश्वरा देवळातील नागप्रतिमा महाभोज राजाची बौद्धराणी शिवस्कंदा नागश्री हिने दान दिलेली आहे.
चिनी भिक्खू ह्युएन-त्संग याने प्रवास वर्णनात लिहिले आहे की महायान आणि थेरवादी या दोन्ही पंथांचा प्रसार इ.स.६ व्या शतकात इथे झाला होता. बदामी टेकडीवरील गुहा या त्याच्या साक्ष आहेत. बिजापूर जिल्ह्यात लोकापुर गावातील लोकेश्वरा नावाचे शंकराचे देऊळ हे मूळ बुद्ध विहार आहे. होयसळ राजवटीत बुद्ध हे विष्णू म्हणून पुजले जाऊ लागले. मंगलोर येथील कादरीका मंदिर हे मूळ मंजुश्री विहार होते. तुळू प्रांतातील तर सर्व मंदिरे ही महायान मधील मंजुश्रीची होती. त्यानंतर त्यांचे सनातनी लोकांनी ‘मुकाम्बिका’ देवळात रुपांतर केले. कांचीपुरम येथील कामाक्षीचे मंदिर हे बौद्ध तारा बोधिसत्त्वाचे विहार होते. (शंकराचार्यांच्या काळात हा बदल झाला)
पुढे बौद्ध आणि जैन यांच्यामध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष झाला. त्यात जैनांची सरशी झाली. इ.स.१०६५ मध्ये बनवासी येथील जयंती प्रबुद्धा विहाराचे देखील रूपांतर देवालयात झाले. परंतु तेथे आता तारा-भगवती, लोकेश्वरा आणि केशवा यांची पूजा होते. केशवा-माधवा ही मूळ बौद्ध संस्कृतीच्या महायान पंथातील बोधिसत्वांची नावे आहेत. तसेच कर्नाटकात महायान पंथातील तारा देवीची अनेक विहारे होती. धारवाड मधील डोंबा (डंबाल) हे एक तिचे प्रसिद्ध ठिकाण आहे. कनगनहल्ली येथील सन्नाती स्तूप तर प्रसिद्ध आहे. येथे अद्याप उत्खनन चालू असून बुद्धिझम आणि बौद्धकालीन कला यावर प्रकाश पडत आहे. येथील शिलालेखावर ‘राया अशोक’ असे ब्राह्मी लिपीत लिहिलेले स्पष्ट आढळते. यावरून ‘राया’ ( प्रिय व्यक्ती ) हा सुद्धा बौद्धकालीन शब्द असून आज तो मराठी गीतात वारंवार दिसून येतो. पुढे काळाच्या ओघात ‘कादरीका’ म्हणून असलेल्या सर्व बुद्ध विहारात शैव पूजा होऊ लागली. मंजुश्रीचे मंजुनाथ झाले.
अशा रीतीने तिसऱ्या शतकात प्रवेश झालेल्या बौद्ध धर्माने म्हैसूर प्रांत पूर्णपणे व्यापून टाकला होता. म्हणून आज असलेली तेथील प्राचीन मंदिरे आणि तेथील शैक्षणिक संस्था मूळ महायान पंथाची केंद्रे होती हे ध्यानात असुद्या. त्यांची नावे जरी आज बदलली असली तरी एकेकाळच्या संपन्न बौद्ध संस्कृतीच्या त्या खुणा आहेत.
— संजय सावंत ( नवी मुंबई )
⚛⚛⚛
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत