देशहिताचे निर्णय घेताना संविधान बदल करावा लागेल – भाजपा उमेदवार ज्योती मिर्धा

कर्नाटकमधील भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या पाठोपाठ आता पुन्हा एकदा भाजपाच्या उमेदवाराने संविधान बदलण्याची भाषा वापरली आहे.
३० मार्च रोजी राजस्थानच्या नागौर येथे एका सभेत बोलत असताना भाजपाच्या उमेदवार ज्योती मिर्धा म्हणतात, “देशहितासाठी अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी संविधानात बदल करावे लागतात. जर संविधानात काही बदल करायचे असतील तर तुमच्यापैकी अनेक लोकांना माहीत आहेच की, दोन्ही सभागृहात म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत असणे आवश्यक आहे.”
ज्योती मिर्धा यांच्या विधानाचा व्हिडिओ काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यावरील कॅप्शनमध्ये लिहिले, “या आहेत राजस्थानच्या नागौरमधून भाजपाच्या तिकीटावर लढणाऱ्या ज्योती मिर्धा. त्या म्हणत आहेत की, संविधान बदलण्यासाठी आम्हाला दोन्ही सभागृहात बहुमत हवे आहे. भाजपाचे खासदार अनंत हेगडेही हेच म्हणत होते की, आम्हाला ४०० हून अधिक जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू. यावरून स्पष्ट होते की, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान आणि लोकशाहीचा द्वेष करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान निकामी करून भाजपाला सर्वसामान्यांचे अधिकार खेचून घ्यायचे आहेत.”
ज्योती मिर्धा यांचा प्रचारसभेचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात त्या म्हणताना दिसतात की, “लोकसभेमध्ये भाजपा आणि एनडीएचं बहुमत आहे. लोकसभेत आपल्याला काहीच अडचण नाही. पण राज्यसभेत आजही आपले बहुमत नाही. जर यावेळी तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार आले तर…”
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ज्योती मिर्धा यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. “अनंत हेगडे यांच्यानंतर आता एक एक जण आपले खरे रुप दाखवत आहे. आता आणखी एका उमेदवाराने जाहीरपणे संविधान बदलण्याचा मानस व्यक्त केला आहे. आणखी किती उमेदवार सत्य उघड करण्यास नकार देत आहेत?” अशी टीका शशी थरूर यांनी केली. थरूर यांच्या विधानाचा आधार घेत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माध्यम विभागाचे प्रभारी जयराम रमेश म्हणाले की, हे सर्व एका महासूत्रधाराने ठरविल्याप्रमाणे होत आहे. हे एक ठरवून केलेली योजना आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत