निळ्या झेंडया खाली सर्वांनी एक व्हा रे !


प्रा. डॉ. आर .जे. इंगोले
निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हा रे हे गाणे रचले आहे रमेश वाघचौरे आणि गायले आहे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी आणि 70 च्या दशकात हे गाणे ग्रामीण आणि शहरी भागात अनेक आंबेडकरी जनतेच्या कोणत्याही कार्यक्रमात ऐकायला मिळत असे आणि कोणतेही गाणे असेल किंवा एखादा विचार असेल त्याचा परिणाम फक्त ते ऐकल्यामुळे होत नाही तर त्या विचाराचा अंमल केला तर होते. तथागत बुद्ध सुद्धा म्हणतात की, एखाद्या धर्मात खूप चांगले विचार आहेत ते काही धर्म प्रसारकांनी ते केवळ मुखपाठ केले म्हणून तो धर्म पुढे जात नाही, तर त्या धर्माचे अनुयायी त्याचे अनुकरण किती करतात यावर ते अवलंबून आहे. आपल्याकडे अनेक गीतकार आहेत त्यांनी त्यांची प्रतिभा वापरुन तळमळीने अनेक गीत रचना केली आहे अनेक प्रसिद्ध गायकांनी ते गायले आहे आणि समाज मोठया आनंदाने ऐकतो आहे यावर काम भागत नाही तर समाजाने त्याची अंमलबजावणी केली तर त्याचा योग्य परिणाम आपणास पाहयला मिळतो. आपण निळ्या झेंडया खाली एक होणे म्हणजे काय तर आपण सर्व पक्ष एकाच झेंडया खाली एकत्र येणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते. आणि मग त्याची सुरुवात त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष , शेड्यूल्ड काष्ट फेडरेशन आणि शेवटी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशा स्वरुपात अपेक्षित होते. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यावर लगेच रिपब्लिकन पक्षात फुट पडली आणि त्याकळातील आपल्या राजकीय नेत्यांनी शपथ घेऊन एक होण्याचे निश्चित केले होते त्यांनी लगेच काही क्षुल्लक स्वार्थासाठी गट –तट तयार केले आज पर्यन्त एक होऊ शकले नाही. आणि आपण राजकीय चळवळ पुढे नेण्याची भाषा करीत आहोत. आपल्या देशात आणि विशेष करून महाराष्ट्रात एवढे राजकीय आणि सामाजिक संघटन आहेत की, मला वाटते आपण कितीही प्रयत्न केला त्यांची नांवे आठवण्याचा तरीही कांही नांवे आपण निश्चित विसरून जाणार आहोत एवढी संख्या मोठी आहे.
प्रत्येक नविन राजकीय पक्ष स्थापन करणार्याला असे वाटते की, यापूर्वीच्या पक्षाचे काहीतरी चुकत आणि मी त्याला दुरुस्त करतो पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की, पहिले तर आपण असे करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधी काम करीत आहोत. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असे सांगितले आहे की, “ तुम्ही संख्येने कमी आहात म्हणून घाबरू नका फक्त एक रहा तुमचे कोणीच काही नुकसान करू शकत नाही.” तुम्ही फक्त एकत्र रहा. पण आपण आपला स्वार्थ पाहतो आणि अनेक संघटना स्थापन केल्या आहेत. आता यामुळे काय होते तर समजा साधी गोष्ट आहे आपल्या भागात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत आणि एका वार्डात एक आपला व्यक्ती निवडणुकीला उभा आहे तर दूसरा म्हणतो आम्ही त्यांच्या गटाचे नाहीत तर त्यांचा एक दूसरा गट असतो म्हणजे समजा RPI पक्ष आहे तर या पक्षाच्या नांवापुढे कंसात एका नेत्याचे नांव असते उदा : आठवले गट . कवाडे गट आणि कांबळे गट आता मला सांगा जर आपली संख्याच मुळात कमी आहे आणि त्यांनी असे गट केल्यावर कोणतीही निवडणूक असेल तर आपला उमेदवार कसा निवडून येईल ? म्हणजे आपण एक राहून इतर समाजाला आपल्याला मतदान द्यावे अशी विनंती करण्याचे काम करावे लागेल तेंव्हा शक्यता आहे की, आपला उमेदवार विजयी होईल.
लोकशाही मध्ये आपणास जात धर्म आणि असे इतर घटक यांना जास्त महत्व देऊन चालत नाही आणि जास्त भावनिक होऊन सुद्धा चालत नाही. आपण एकत्र येणे ही एक प्राथमिक गरज आहे. पण पुढे मात्र आपल्याला इतर समाजाला सुद्धा जोडावे लागेल आणि समाजात असा एक मोठा बहुजन वर्ग असतो की, ज्याचे प्रश्न समान असतात. आणि ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे की, ती सर्वांना एकत्र सामावून घेते. आणि जी हुकुमशाही ताकद आहे त्याचा मुकाबला सहज करू शकते. म्हणून त्याकाळात डॉ. बाबासाहेबांनी RPI ची स्थापना करण्याचा हेतु एका जाती किंवा धर्मापुरता संकुचित नव्हता तर सर्व बहुजन समाजाने एकत्र येऊन आपले सर्वांचे कल्याण करण्याची एक आदर्श व्यवस्था निर्माण करण्याचा होता. पण आपला भारतीय समाज प्रगल्भ नसल्यामुळे त्यांना बाबासाहेबांनी दिलेला धम्म सुद्धा नाही समजला आणि लोकशाही सुद्धा नाही समजली. कारण त्यासाठी प्रगल्भ मन आणि विचार पाहिजे असतात. आणि आज तर त्याचे एवढे बीभत्स स्वरूप झाले आहे की, ते बघुन पुढील काळाची कल्पना सुद्धा करवत नाही. प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक डॉ. यशवंत मनोहर यांनी लोकशाहीचा अर्थ सांगताना खूप समर्पक शब्दात मांडला आहे ते म्हणतात - “ लोकशाही शब्दात लोक हे पूर्वपद आहे. लोक या दोन अक्षराच्या शब्दात भारतातील सर्वच लोकांचा अंतर्भाव होतो. या सर्वच लोकांनी स्वत:ला भारतीय म्हणावे अशी बाबासाहेबांची लोकशाहीतील सुंदर संकल्पना होती. कोणी कोणाचा मालक नाही,कोणीही कोणाचा गुलाम नाही. ही पद्धत ज्याच्या विचारातून आणि आचरणातून प्रकट होते त्या समाजाला लोकशाही समाज म्हणतात आणि त्या संस्कृतीला लोकशाही संस्कृती म्हणतात. पुढे ते म्हणतात की, बाबासाहेबांची लोकशाही ऐंशी टक्के लोकांना या देशाचे अधिनायक करू इच्छिते म्हणून त्यांना लोकशाहीमध्ये पक्षशाही , सरंजामशाही ,जातशाही , उच्चवर्णशाही ,वंशशाही , अभिजनशाही वा दुकानदारशाही अशी कोणतीही शाही बसत नाही. या सर्व शाहया ऐंशी टक्के लोकांच्या हत्या करणार्या आहेत.” धर्माची अफू चारून ऐंशी टक्क्यावर वरील सर्व शाहया आज लादल्या जात आहेत या सर्वच शाहया आज उध्वस्त करण्याची संपूर्ण बौद्धिक क्षमता बाबासाहेबांच्या लोकशाहीत आहे.
यावरून आपणास लक्षात येईल की, आपण निळ्या झेंडयाखाली एकत्र येणे म्हणजे एका प्रगल्भ लोकशाहीची ती सुरुवात असेल कारण आज डॉ. बाबासाहेबांनी दिलेला धम्मच या देशाला तारू शकतो हे मी काही त्या धम्माचा अनुयायी म्हणून सांगत नाही तर ते वास्तव आहे. कारण यात मानव केंद्रबिंदू आहे आणि ज्या व्यवस्थेत मानव केंद्राबिदू असतो त्याठिकाणी संपूर्ण मानवजात असते एक जात किंवा धर्म नसतो. आणि म्हणून भारताचे संविधान लिहतांना सुद्धा बाबासाहेबांपुढे बुद्धाचा धम्म होता त्यातील तत्वे होती. आपल्या देशाचा प्रमुख विदेशात जातांना कोणीही असेल तरी त्याला बाहेर ओळख बुद्ध की धरती से आया हू अशीच द्यावी लागते. कारण जगात भारताची ओळखच तशी आहे पण आपल्या संकुचित लोकांना हे समजले नाही. जेंव्हा आपल्या संपूर्ण मानव जातीचा विचार करावा लागतो त्यावेळी बुद्धाचाच विचार करावा लागतो. आणि म्हणून बौद्ध धम्मात देव,आत्मा अशा काल्पनिक गोष्टी पेक्षा सर्वात मोठे स्थान नीतीमत्तेला आहे आणि ज्याच्याजवळ नीतीमत्ता आहे तो कोणताही नागरिक देशाला पुढे नेतो. ज्याच्याजवळ करुणा आहे तो समाजासाठीच काम करेल संपत्ती जमा करणार नाही कारण अनासक्त आहे, बुद्ध बंधुभाव सांगतो त्यामुळे भेद निर्माण होत नाही. कोणावर अन्याय होतांना असा बुद्धाचा अनुयायी सहन करणार नाही आणि त्यामुळे समाजात स्त्रिया,निराधार असा कोणीही त्रस्त होणार नाही. पण याला एक अट आहे की, तो बुद्धाच्या धम्माचा सच्चा अनुयायी असला पाहिजे. असा अनुयायी कधी कोणाच्या घरात जन्माला येत नाही तर तो घडवावा लागतो आणि त्याची संपूर्ण जबाबदारी स्वत:ची आहे. पण आपल्याला वाटते की, आम्ही एखाद्या बौद्ध घरात जन्मले की, झाले बुद्ध पण असे नसते बुद्ध अनुयायी होणे एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे एक संस्काराची प्रक्रिया आहे आणि कष्टाची प्रक्रिया आहे. पण आज लोक निळे झेंडे घेऊन निघाले आहेत. यामध्ये जास्त भावनिक आहेत. असे लोक जास्त काळ ही चळवळ पुढे नेऊ शकणार नाहीत. ज्यांना राजकारण एक सेवा आहे का व्यवसाय आहे हेच माहीत नाही. ते कसे काय कार्यकर्ते होणार आहेत. आणि म्हणून एका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाला भारावून गेलेल्या कार्यकर्त्याला बाबासाहेब सल्ला देतात की, अगोदर तू शिक्षण घे , नौकरी कर आणि नंतर या चळवळीत ये आणि पुढे ते म्हणतात, “ लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नको.” आणि आज आपल्याला याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जो नैतिक असतो , जो स्वाभिमानी असतो त्याचा लोकांना धाक असतो आणि समाज सुद्धा अशा लोकांच्या मागे असतो. आणि म्हणून आज आपल्याला असे कार्यकर्ते आणि नेते शोधावे लागतील आणि त्यांनाच पुढे करून ही चळवळ पुढे न्यावी लागेल तरच बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत साकार होईल.
आज महाराष्ट्रात आणि देशात आपण पाहतो की, एकदम विरोधी विचारधारा असणारे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करीत आहेत किंवा युती करीत आहेत निदान त्यांचे बघून तरी आपण एक झाले पाहिजे आणि आपला तर आदर्श एक आणि विचार एक आहे आणि तो म्हणजे निळा झेंडा आणि आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर मग आपल्याला काय अडचण आहे एकत्र येण्याला ? म्हणजे बघा जम्मू कश्मीर मध्ये मागे भाजपा आणि पी.डी.पी. युती झाली आणि सरकार स्थापन झाले आणि अनेक आघाडया आणि युत्या आपण पाहत आहोत.युती करतांना सुद्धा एक फार महत्वाची बाब आहे, जी आपल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पाळली होती आणि ती म्हणजे आपण आपला स्वाभिमान कधीही सोडला नाही पाहिजे. पण त्यासाठी तुमची विद्वत्ता आणि शील सुद्धा महत्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहरू मंत्रिमंडळात होते तेंव्हा त्यांनी स्वाभिमान कधीही सोडला नाही. त्याकाळी भारतीय संसद फक्त दोन व्यक्तीसाठीच उठून उभे राहून मान द्यायची त्यात नेहरू प्रधानमंत्री होते म्हणून आणि दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री होते म्हणून नाही तर महाशीलवान , जागतिक किर्तीचे विद्वान होते म्हणून. जेंव्हा विदेशी पाहुणे भारत भेटीवर येत तेंव्हा नेहरू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून देतांना म्हणायचे, “ माझ्या मंत्रिमंडळातील कोहिनूर हिरा डॉ. बी.आर. आंबेडकर.” एवढी ताकत आणि हिंमत लागते अशी ओळख करून देण्यासाठी आणि इथे तर आपल्या नेत्यांना कोणी मान देत नाही. एका ठिकाणी तर कार्यक्रमात आपल्या नेत्यांना खुर्चीच नव्हती आणि ते पाहत होते कुठे जागा मिळते का ? अशी जर आपली किंमत असेल तर कोण करील आपल्या समाजाला मतदान आणि कोणते इतर नेते आपल्या समाजाला पुढे जावे म्हणून प्रयत्न करतील आणि त्यावेळी एकटया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व करून ठेवले आपल्यासाठी आणि एवढी प्रतिकूल स्थिती असतांना आणि आज तर संविधान आहे. पण आपले नेते एकत्र नसतील आणि स्वाभिमानी नसतील तर कसे होईल आपले याचा विचार आपण करु शकतो. आपले नेते कोणी कोंग्रेस सोबत , कोणी भाजपा सोबत तर कोणी इतर पक्षासोबत जातात आणि त्यामुळे आंबेडकरी समाजाचे काय ? हा प्रश्न आहे. नेते जातात त्यांचे भले करून घेतात आणि समाज मात्र आजपर्यंत वाट पाहत आहे कधी साकार होईल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत आणि आंबेडकरी समाज आर्थिक दृष्टया मागे असल्यामुळे त्यांना इतर व्यवसाय सुद्धा करता येत नाहीत. शिक्षण एक साधन आहे थोडे फार प्रगती करण्यासाठी तर ते आज महाग झाले आहे. खाजगीकारणामुळे आज प्रत्येक वस्तु आणि सेवा महाग झाली आहे. नौकरीत आरक्षण नाही ते खाजगीकारणामुळे, आणि शेती नाही इतर कोणतेच साधन नाही अशा अत्यंत असहाय अशा स्थितीत हा समाज जीवन जगत आहे. आपण आणि आपल्या नेत्यांनी कधीच आपल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विसरू नये. आणि त्यांनी जो मार्ग आपल्याला दिला आहे त्याला आपण कधीच विसरू नये. आपल्याला आज एवढा मान मिळतो आहे त्याचे कारण आपले फार कृतृत्व आहे असे नाही, तर त्यामागे आपल्या बापाची सर्व कमाई आहे पण तर गावाच्या बाहेर होतो मग हे आज आपल्याला एवढा मान–सन्मान का देतात तर याची तरतूद आपल्या बापाने केली आहे म्हणूनच आज आपण स्वाभिमानाची जिंदगी जगत आहोत.
एक विदर्भातील कवि आहे मी फार दिवसापूर्वी ही कविता वाचली होती आणि कांही लोक एखादीच रचना करतात पण त्यांचे नांव आपल्या काळजावर कोरले जाते तसे माझे झाले. मी ही कविता लिहून ठेवली होती आणि त्यातील एक थोडासा भाग याठिकाणी देत आहे या कवितेत वडील आणि मुलगा अशा दोन पिढ्यांचा संवाद आहे. आणि त्यात मुलगा स्वत:ला फार प्रगती केली असा आव आणतो पण त्याचे वडील मात्र कमी शिक्षित असूनसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी वाटतात. कवि बी.एस. इंगळे (परतवाडा, अमरावती ) आपल्या कवितेत वडील आपल्या उच्च शिक्षित(नौकरीत असलेल्या) मुलास म्हणतात —
तुला अडवत नाहीत पुजारी ही महानता तुझी नाही,
1956 साली सगळे देव आम्ही गटारात टाकले ,
मांदिर सोडले, आणि बुद्धाशी नाते जोडले त्याची आहे.
तुझ्या हातचे खातात , समानतेने वागवतात लोक तुला ,
पण ही कमाई तुझी नाही,जन्मभर जळत राहिला आणि
जाळत राहिला, अन आम्हाला माणूस बनवून गेला,
माझा बाप,तुझा बाप,तुझ्या लेकरांचाही बाप, त्या बाबासाहेबांची
ही कमाई आहे.
हे सगळं तुझा पैसा विकत घेऊ शकत नाही म्हणून म्हणतो लेकरा,
खूप खूप कमव , पण बेईमानी कमवू नको , हे वैभव ज्यानं दिलं ,
त्या बाबासाहेबाला गमावू नको .
या महत्वपूर्ण रचनेतून आपल्याला काय शिकायचे आहे तर एकच आणि ते म्हणजे आपल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे जे सांगितले आहे. ते आपण कधीच विसरायचे नाही. आणि आपल्या समाजाने आता राजकीय सत्ता हस्तगत करून आपल्या समाजाला पुढे नेले पाहिजे. कारण एका ठिकाणी डॉ. बाबासाहेबांचा सत्कार आयोजित केला होता आणि त्या सत्काराला उत्तर देतांना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “ पंढरपूर ,त्र्यंबकेश्वर , काशी वगैरे ठिकाणी यात्रा करून किंवा शनीमहात्मे , शिवलीलामृत , गृरचरित्र इ. पोथ्यांची पारायणे करून तुमचा उद्धार होणार नाही. तुमचे वाड-वडील हजारो या गोष्टी करीत आलेत. तरीही तुमच्या शोचनीय अवस्थेत तसूभरही फरक पडला नाही. तुमचा उद्धार होण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे राजकारण... कायदा करण्याची शक्ती तुम्ही हस्तगत केली पाहिजे.”
आज महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे किंवा मतदारसंघ आहेत की, त्या भागात एखाद्या आंबेडकरी पक्षाचे काम चांगले आहे किंवा तेथील कार्यकर्ते प्रामाणिक आहेत म्हणजे मी तर नेहमी नेत्यापेक्षा कार्यकर्त्यांना जास्त महत्व देतो, कारण प्रामाणिक कार्यकरताच पक्ष पुढे नेऊ शकतो. आणि इतर पक्षाचे काम थोडे कमी असते आणि असे सर्वच राजकीय पक्षाचे असते त्यात विशेष काही नाही तर इथे आपण म्हणजे आपल्या राजकीय नेत्यांनी असे केले पाहिजे की, ज्या भागात ज्या पक्षाला मतदान जास्त मिळणार आहे मग तो कोणताही पक्ष असेल तर त्याला तिकीट द्यायचे आणि इतर पक्षाने त्यांना सपोर्ट करायचा आहे. असे जर झाले तर मग काही आपले प्रतींनिधी निवडून येऊ शकतात. पण याला एक अट आहे की, आपला (नेत्याचा ) अहंकार आणि स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो जो आपल्या सर्वच नेत्यांना जमत नाही आणि म्हणून आपण मागे आहोत. आणि असे केल्याशिवाय पर्याय नाही. नाही तर मग आर.पी.आय. चा उमेदवार उभा असतो त्याला ब.स.पा. आणि वंचित आघाडी विरोध करतो हे तर उदहारणात सांगतो आहे आणखी त्यात संख्या वाढणार आहे आणि जर एखादा कोणत्याच पक्षाचा नसेल तरी त्याला विरोध करायचा असेल तर अपक्ष आहेच जर अशी अवस्था असेल तर आपल्याला कधीच यश येणार नाही. आता मी हा विचार मांडत असतांना मी कोणत्या पक्षाची बाजू मांडत नाही तर आपल्या सर्व पक्षाचे काम पुढे गेले पाहिजे आणि आपल्या समाजाचे काहीतरी हित झाले पाहिजे एवढी प्रामाणिक अपेक्षा आहे. एक दूसरा उपाय आहे पण तो यापेक्षा जास्त कठीण आहे तो काही आपल्याला म्हणजे आपल्या राजकीय नेतृत्वाला शक्य नाही. पण सांगून टाकतो आणि तो उपाय म्हणजे आपले सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटन रद्द करणे आणि कोणता तरी एकच पक्ष स्थापन करणे म्हणजे एक पक्ष आणि एक झेंडा असा करणे. जर असे झाले तर जास्त लवकर आपण सत्ता मिळवू शकतो. पण हे एकाही राजकीय नेत्याला पटणार नाही. कारण त्याला अहंकार आणि स्वार्थ सोडावा लागतो. आणि हे लोक किती स्वार्थी आहेत हे आपल्या समाजाला माहीत आहे. पण आपल्या काही कार्यकर्त्यांना हे पटणार नाही पण सत्य आहे मी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप जवळून पाहिले आणि अभ्यासले आहे. आपला कोणताच नेता आपल्या दुसर्या नेत्याच्या मागे जायला तयार नाही. तो दुसर्या पक्षाच्या मागे जाईल पण आपल्या नेत्याच्या मागे जात नाही. म्हणजे जसे आपल्याकडे ग्रामीण भागात एका घरात दोन भाऊ असतील तर एखादा भाऊ आपल्या सख्या भावाला सपोर्ट करणार नाही पण दुसर्या मित्राला सपोर्ट करणार म्हणजे खाजगी जीवनात असे आहे. एखाद्या व्यक्तीला काही आर्थिक वगैरे अडचण आली तर भाऊ भावाला सपोर्ट करणार नाही पण मित्राला सपोर्ट करणार असे आहे. आपल्या समाजाला सपोर्ट कोणी करणार नाही पण आपल्या विचाराच्या विरोधी पक्षाला मात्र जाऊन मिळणार आणि त्यांचे विचार कसे चांगले आहेत हे सुद्धा लोकांना सांगणार अशी आपल्या नेत्यांची अवस्था आहे.
28 सप्टेंबर 1932 मध्ये मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “ आपला पुढारी कसा असावा तर, तुमचे आणि पुढार्याचे हित एक असेल , जे स्वार्थी नसतील असे पुढारी निवडा. पुढे ते म्हणतात की,दुसर्या पक्षाच्या ओंजळीने पाणी पिणारे किंवा त्यांची भाडोत्री कामे करणारे लोक तुमची निवळ फाटाफुट करतील ,ते तुम्हास दगा दिल्याशिवाय राहणार नाहीत.” आणि आज आपण तेच पाहत आहोत. आपले आणि आपल्या पुढार्याचे हित एक नाही. आपले अनेक पुढारी करोडपती आहेत आणि आपल्या जनतेला दोन वेळचे जेवण मिळत नाही. आणि मग आपले आणि आपल्या पुढर्याचे हित एक कसे होणार ?आपला पुढारी आपल्या समस्या कधीच संसदेत किंवा विधानसभेत मांडत नाहीत. आज देशात किती अन्याय अत्याचार होतात , रोजगार नाही , शिक्षण महाग झाले आहे , शेतकरी आत्महत्या करीत आहेत , लोकांना साधे पिण्याचे पाणी मिळत नाही ,दवाखान्यात उपचार मिळत नाहीत पण कोणीही नेता यावर बोलतांना दिसत नाही आणि हे तर त्यांचे काम आहे. आज मणीपुर सारखी घटना जगात आपल्याला आपल्या देशाची मान खाली गेली पण फार थोडे अपवाद सोडले तर कोणी बोलायला तयार नाही. आणि विशेष करून आज जे राखीव जागेतून निवडून गेले आहेत मग ते कोणत्याही जाती आणि धर्माचे असतील पण त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. मी तर म्हणतो अशा वेळी सभाग्रह त्याग केला पाहिजे आणि संसदेत एवढी संख्या आहे की, कामकाज चालणार नाही जर सर्व देशातील मागासवर्गीयांनी सभा त्याग केला तर? पण हे लोक त्यांच्या पक्षाचे आदेश पाळतात समाजात काय प्रश्न आहेत काय अडचणी आहेत याचे यांना काही देणे-घेणे नाही. आणि अशीच अवस्था आपल्या राज्यात आंबेडकरी समाजातील नेत्यांची आहे. आज जर काही नेते लोकांमधून निवडून आले नाही तर त्यांना राज्यसभेत किंवा विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळते पण ते तिथे सुद्धा काहीच भूमिका मांडत नाहीत. आणि आपला समाज मात्र कित्येक वर्षापासून अपेक्षा ठेवून आहे.
कांही दिवसापूर्वी म्हणजे 20 नोव्हेंबर 2023 रोजी वृत्तरत्न सम्राट मध्ये माझा एक लेख आला होता आंतर –जातीय विवाह संदर्भात आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी अनेक महाराष्ट्रातून फोन येतात आणि सर्व लेखकांना येतात मला सुद्धा एक फोन बुलढाणा जिल्ह्यातून आला होता ते उपासक होते दत्तात्रय हिवाळे आणि त्यांनी मला बोलत असताना एक नविन विषय सांगितला की, त्यांच्या भागात त्यांनी आता एक काम सुरू केले आहे की, येणार्या निवडणुकीत आपल्या आंबेडकरी लोकांनी एका उमेदवारला सर्वांनी एकगठ्ठा मतदान करायचे आहे आणि मग आपला उमेदवार येईल किंवा नाही हे बघू पण एकत्र मतदान करायचे आहे. आता मला हा उपक्रम छान वाटला कारण आता आपले पुढारी एकत्र येत नाहीत तर जनतेने तरी एकत्र आले पाहिजे. अशी त्यांची भूमिका आहे आणि त्यांचे बरोबर आहे की, आपल्या लोकांना बजेट मध्ये किती तरतूद होईल हे सुद्धा लोकसंख्येवर अवलंबून असते तर निदान लोक किती आहेत हे तरी समजेल. आणि जर शक्य झाले तर काही लोक निवडून सुद्धा येतील. तर असे आपल्या लोकांनीच आता करायला पाहिजे. आणि आपल्या नेत्यांनी जर एका झेंडया खाली यायचे ठरवले तर जास्त चांगले आहे. आपण सर्व एक राहिलो तर आपल्यावर कोणी अन्याय करणार नाही आणि आपण जर अशा गटात विभागलो तर मात्र आपले काहीच हित होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणाले होते की, एखाद्या खेडयात मुस्लिम समाजाचे एकच एखादे घर असते पण त्यांच्यावर कोणी अन्याय करीत नाही. कारण अन्याय करणार्यांना माहीत आहे की, जर कोणी अन्याय केला तर सर्व मुस्लिम समाज एकत्र येईल या भीतीमुळे कोणी अन्याय करीत नाही. आणि आमचे जास्त घरे असतात तरी अन्याय का होतो ? तर आम्ही एक नाही. आणि हीच बाब आपल्याला राजकीय क्षेत्रात पाह्यला मिळते याचा विचार आपल्या नेत्यांनी गांभिर्याने करावा अशी अपेक्षा आहे. आमचे कवी मित्र मा.प्रेमानंद बनसोड (दादा ) त्यांच्या लोकशाहीचा दांडिया या कवितेत म्हणतात,
लाथ मारून पाणी काढण्याचं ब्रीद बाबा आम्ही टाईमबार केलं.
लाथ मारली तरी लाज नाही वाटत हेच जीवनाचं सार झालं .
वाईट वाटतं बाबा तुमचे सैनिक दांडपट्टा खेळायचा सोडून आता दांडिया खेळायला लागलेत.
दुसर्याला झुकवायचं सोडून स्वत:च आता कमरेपासून वाकाय लागलेत.
दु:ख ब्रहदरथ मेल्याचं नाही बाबा, पण सैनिक पुष्पमित्र शृंगाकडे चाललेत. ………
प्रा. डॉ. आर .जे. इंगोले नाशिक (मोबा: 9423180876 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत