आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपान

भाडेनियंत्रण कायद्यातील तरतुदींबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी.

राज्य सरकारला खासगी मालमत्तांच्या नियंत्रणाचा अधिकार आहे की नाही आणि राज्यघटनेतील कलम ३९ ब मधील तरतुदीनुसार समाजहितासाठी सामाजिक साधनसंपत्तीच्या वाटपाचा विचार करताना त्यामध्ये केवळ नैसर्गिक मालमत्ता अंतर्भूत आहे की खासगी व मानवनिर्मिती मालमत्तांचाही समावेश आहे, या महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय घटनापीठापुढे गुरुवारी प्राथमिक सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र भाडेनियंत्रण कायदा करण्याचा आणि भाडय़ावर नियंत्रण व अन्य अटी घरमालकांवर लादण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे किंवा नाही, यासंदर्भात हा निर्णय होणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील लाखो भाडेकरू आणि घरमालकांसाठी या याचिकांवरील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतीमुळे आणि वर्षांनुवर्षे भाडय़ाने राहात असलेल्या सर्वसामान्य भाडेकरूंच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने अनेक वर्षे भाडेवाढ गोठविली होती.

भाडेनियंत्रण कायद्याचा वापर करून घरमालकांवर अनेक निर्बंध घातले होते. त्याला घरमालकांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर दरवर्षी ४ टक्के भाडेवाढ राज्य सरकारने मंजूर केली होती. पुढील काळात बरीच चर्चा होऊन नवीन महाराष्ट्र भाडेनियंत्रण कायदा १९९९ हा २००० पासून लागू करण्यात आला. त्यात भाडेवाढ, भाडय़ाच्या मालमत्तेवर भाडेकरूचा वंशपरंपरागत अधिकार, घरमालकाला जागा परत हवी असल्यास ती भाडेकरूकडून काढून घेता येईल का, भाडे थकल्यास करावयाची कारवाई, घर व इमारत दुरुस्तीचा खर्च आदी अनेक मुद्दय़ांवर त्यात तरतुदी करण्यात आल्या होत्या. हा कायदा सर्व राज्यासाठी लागू असून लाखो भाडेकरूंच्या हक्कांच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. सरकारला खासगी मालमत्तांवर आणि घरमालकांवर नियंत्रण किंवा निर्बंध लादण्याचा अधिकार आहे का, यासह विविध मुद्दय़ांवर महाराष्ट्र प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशनने या कायद्यास व अन्य तरतुदींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर तीन सदस्यीय पीठाने हे प्रकरण पाच सदस्यीय व त्यानंतर सात सदस्यीय घटनापीठापुढे सोपविले होते. तत्कालीन सरन्यायाधीश एस.पी. भरुचा यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय पीठाने २० फेब्रुवारी २००२ रोजी हे प्रकरण नऊ सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणीसाठी पाठविले होते. तब्बल २१ वर्षांनी याप्रकरणी गुरुवारी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील नऊ सदस्यीय पीठापुढे सुनावणी होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!