भगवान बुद्धांची शिकवण भाग ४७….

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात –
१) तथागत बुध्द जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवृंद भिक्खूंचा असे.
२) कोणत्याही एका विषयावर तथागतांचे म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यत पोहोचविले.
३) लेखनकला अद्यापि विकसित झाली नव्हती. त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करुन ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूंने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करुन ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते, त्यांनी ते पाठ करुन ठेवणे हा आपला व्यवसायच केला. त्यांना भणक म्हणत.
४) बौध्द त्रिपिटक आणि अठ्ठकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते.
५) पुष्कळ वेळा तथागतांनी जो उपदेश केला त्याचे वृतांत कथन यथातथ्य झाले नाही.
६) तथागतांच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैर कथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या.
७) उदाहरण म्हणून अशा पाच स्थळांचा उल्लेख करता येईल पहिला उल्लेख ‘अलगददूपम’ सुतात (Alagaddupama) आहे. दुसरा ‘महाकम्मविभाग’ सुत्तात Maha-Kamma-Vibhanga Sutta) तिसरा ‘कण्णकट्ठल’ (Kannakatthala) सुत्तात चौथा ‘महातण्हासंख्य’ (Maha-Tanha-Sankhya) सुत्तात आणि पाचवा ‘जीवन’ सुत्तात
( Jiwaka Sutta) आहे.
८) अशा प्रकारे तथागतांच्या उपदेशाचे गैर निवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे. कारण भिक्खु तथागत बुध्दापांशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात.
९) कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयासंबंधी विशेषतः बुध्दोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीस सोडून झालेले आहे.
१०) कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयाच्या सिध्दांताना ब्राम्हणी धर्मातही स्थान आहे. ह्याचा परिणाम असा झाला की ब्राम्हणी सिध्दांत सहजरित्या बौध्द धम्मात घुसडता आले.
११) यासाठी त्रिपिटकात जे बुध्दवचन म्हणून मानले गेले आहे, ते बुध्दवचन आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे.
१२) यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे.
१३) तथागत बुध्दांच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की, बुध्दीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते ते बुध्दांचे नव्हे. म्हणून ईतर गोष्टी यथायोग्य असुन जे जे बुध्दीला व तर्काला धरुन असेल ते ते बुध्दवचन मानायला प्रत्यवाय नाही.
१४) दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही, अशा चर्चेच्या फंदात तथागत कधीच पडले नाही. म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते ते बुध्दांच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुतः ते बुध्दवचन म्हणून मानता येणार नाही.
१५) तिसरीही एक कसोटी आहे, ती ही की, तथागत बुध्दांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहे आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयाची दोन प्रकारात वर्गवारी केली होती. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्यासंबंधी त्यांने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रुपाने मांडले आहेत. जे विषय दुस-या वर्गात पडतात त्यासंबंधीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत. परंतु ते तात्पुरते आहे.
१६) ज्या तीन प्रश्नासंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत, त्या विषयासंबंधी तथागत बुध्दांचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील तिन्हीही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
संदर्भ – चतुर्थ खंडः भाग दुसरा, उपभाग पाचवा)
( Book IV, Part II, Section V)
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२९.१.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत