अटकेची आंतरराष्ट्रीय माध्यमांकडूनही दखल


????अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची दखल महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’, ‘बीबीसी’, ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द गार्डियन’, ‘इंडिपेंडंट’, ‘अल जझीरा’ यासारख्या अनेक प्रसिद्ध माध्यमांनी केजरीवाल यांच्या अटकेला ठळक प्रसिद्धी दिली आहे.
”भारतात विरोधी पक्षांवरील कारवाईचा विस्तार होत असताना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक” असे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. या प्रकरणात केजरीवाल यांची भूमिका अस्पष्ट असून त्यांनी कोणतेही गैरकृत्य केल्याचे नाकारले आहे असे ‘पोस्ट’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय विरोधी पक्षांनी अलिकडे, १९ एप्रिलपासून सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी, भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचेही लिहिले आहे.
‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात असे लिहिले आहे की, ”मतदान जवळ येत असताना आपल्यावरील संकटे वाढत असल्याचे भारतातील विरोधी पक्ष सांगत आहेत”. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकार विरोधकांना अडचणीत आणत आहेत असे टीकाकारांचे म्हणणे असल्याचे ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने नमूद केले आहे.
दिल्लीच्या विधानसभेत ‘आप’चे वर्चस्व असूनही भाजपला दिल्ली सरकार पाडायचे आहे असा दावा त्या पक्षाने केल्याचे ‘बीबीसी’च्या वृत्तात म्हटले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमांतून भाजप विरोधी पक्षांना लक्ष्य करत असल्याच्या आरोपाचाही ‘बीबीसी’ने उल्लेख केला आहे.
‘अल जझीरा’ने ”मृत लोकशाही – अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे भारतातील विरोधक एकवटतील का?” या मथळय़ाखाली वृत्त प्रसिद्ध केले आहे. केजरीवाल यांच्या अटकेमुळे भारताच्या राजधानीत अभूतपूर्व घटनात्मक संकट ओढवले आहे असे ‘अल जझीरा’ने म्हटले आहे. ‘द गार्डियन’ने लिहिले आहे की, भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून २०१५मध्ये आप सत्तेत आल्यानंतर, पहिल्यांदाच पदावरील मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली आहे. तर ‘इंडिपेंडंट’ने केजरीवाल यांचा उल्लेख नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाचे राजकीय प्रतिस्पर्धी असा केला आहे.
(नवी दिल्ली आणि देशाच्या इतर भागांमध्ये ‘आप’चे नेते आणि समर्थकांनी शनिवारीही रस्त्यावर उतरून निदर्शने केली.)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत