भगवान बुद्धांची शिकवण-भाग १००
तथागतांचे अंतिम शब्द
तथागत बुद्ध आनंदाला म्हणाले:
“आनंदा! कदाचित तू असे म्हणशील, ‘गुरुंची वाणी आता लोपली. आता आम्हास कोणी गुरु उरला नाही. पण आनंद, तुला असे वाटता कामा नये. जो धम्म आणि विनय मी शिकविला, सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु!”
नंतर तथागत बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले:
“जर कोणा भिक्खूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिक्खूवर्गहो, आताच तो त्याने विचारावा. मागाहून पश्चाताप करु नये की, आमचे गुरु प्रत्यक्ष समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही.”
असे सांगितल्यावर भिक्खू गप्प राहिले.
त्यानंतर तथागतांनी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भिक्खूंनी मौन सोडले नाही.
तेव्हा तथागत म्हणाले,
“कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल. पण भिक्खूहो, तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा!”
तरीही भिक्खू अबोलच राहिले.
तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले:
“भिक्खूहो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की, सर्व संस्कारित गोष्टी अनित्य आहेत. (निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट नष्ट होणार आहे.) अप्रमादपूर्वक, सावधपणे, काळजीपूर्वक मार्गक्रमण करा!”
तथागतांचे हेच अखेरचे शब्द होते.
(संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-सहा)
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२२.३.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत