आंबेडकरी कव्वाली क्षेत्रातीलअनोखी जोडी”
- सुरेश केदारे
“दोन बैलांची जोडी गाडीला खिल्लारी”
“हळू हाक पिचली बांगडी बिलोरी”
कव्वालीचा बादशहा गोविंद म्हशिलकर यांनी गायलेल्या कवी श्रीधर ओहोळ यांच्या या गाण्यानं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. "दो हंसो का जोडा" या "गंगा - जमना" चित्रपटातील गाण्याच्या चालीवर असलेल्या या गाण्यानं धम्माल उडवून दिली होती. कवी श्रीधरांची विलक्षण काव्य प्रतिभा आणि गायक गोविंदरावांचा खर्ज्यातला पहाडी आवाज याचा सुरेल संगम अवघ्या जनमानसाने प्रदीर्घकाळ अनुभवला. आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचा तो काळ मंतरलेला होता. कवी श्रीधर आणि गोविंदराव हे या सांस्कृतिक वैभवाचे महत्त्वाचे शिलेदार. तसेच कवी श्रीधर ओहोळ हे प्रसिद्ध शीघ्रकवी होते. 'काजवा' हा त्यांचा गाजलेला प्रकाशित काव्यसंग्रह ज्याला ज्येष्ठ नेते दादासाहेब रूपवते यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
- “तुझी माझी जोडी बघेल सारा गाव
तू मस्तानी माझी मी तुझा बाजीराव” - “एका हाताने कर तसे दुसऱ्या हाताने भर
अभिमान खोटा तो बाभळीचा काटा” अशी गोविंदरावांच्या आवाजातील श्रीधरांची शेकडो गाणी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर गाजत राहिली. विशेषतः जीवाची कहाणी आणि आईचं हृदय या खंडकाव्यांनी अवघ्या मनांना धाय मोकलून रडवले.
“जमली सारी मंडळी हो जमली सारी मंडळी”
या जयंती गीतातील
“नवरी परी नटली रिपब्लिकन नाव तिचे”
“जयंतीच्या मुहूर्तावर ठरले का लग्न तिचे ?”
या ओळी मनाला आजही अस्वस्थ करतात. कार्यक्रमाचा शेवट करताना कवी हृदयनाथ सिन्नरकरांचं "सांभाळा मीराबाई आता मी जाते" हे गीत गाताना सर्व श्रोत्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या जात. लहानग्या भिवाची आई भीमाबाई लाडक्या भिवाला आपल्या मृत्युसमयी मीरा आत्याच्या हवाली करतात, अशी गीताची कल्पना देत गोविंदराव जेव्हा
“तुम्ही व्हा आई त्याची”
“बघा मिटले हो या डोळ्याचे पाते”
असा शेवट करताना घट्ट डोळे मिटून स्तब्ध होत असत. तो प्रसंग आजही विसरता येत नाही.
१२ फेब्रुवारी १९७६ रोजी आपला कवी मित्र श्रीधरांच्या अपघाती निधनाने गोविंदराव ह्ययातभर व्यथित झाले होते. श्रीधरांच्या ह्ययातीतच त्यांनी आपल्या कव्वाल पार्टीचे नाव मित्र स्नेहापोटी ‘श्रीधर गायन पार्टी’ असे ठेवले होते. १८ जानेवारी १९८७ रोजी गोविंद दादांनी अखेरचा श्वास घेतला. १८ जानेवारी २०२४ हा त्यांचा ३७ वा स्मृतीदिन भोईवाडा परळ येथे “सम्यक कोकण कला संस्थेच्या” वतीने आयोजित करण्यात आला होता.
आजच्या श्रीधरांच्या ४८ व्या स्मृतीदिनानिमित्ताने या दोन्ही महान कवी – गायकांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत