महापुरुषांच्या विचारांचे वारसदार की पराभव करणारे नतद्रष्ठ

लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- २०/८/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — ३०
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की; आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते.जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही; तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना भारतीय लोक या शब्दाची चीड येत असे.भारतीय राष्ट्र म्हणणे ते पसंत करीत असत.मी या मताचा आहे की; आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल.
हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही.याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यानंतर एक राष्ट्र होण्याच्या गरजेचे महत्व आम्हाला कळेल आणि आमच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कोणत्या मार्गांचा; उपायांचा अवलंब करावा याचा आम्ही गांभीर्याने विचार करू शकू.या ध्येयाप्रत पोहचणे अतिशय कठीण आहे.अमेरिकेतील लोकांना जेवढे कठीण होते त्यापेक्षाही कितीतरी पटीने कठीण आहे.अमेरिकेत जातीची समस्या नाही.भारतात जाती आहेत.जाती या राष्ट्रविरोधी आहेत.पहिली गोष्ट त्या समाज जीवनात विभागणी करतात.त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती जातींमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे.राष्ट्र निर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल.
आपल्या समोर असलेल्या अवघड जिकिरीच्या कामाबद्दल माझ्या या प्रतिक्रिया आहेत.काहींना त्या कदाचित फार आनंददायी वाटणार नाहीत.या देशात राजकीय सत्ता ही मुठभर लोकांची मक्तेदारी राहिली आहे आणि बहुतांश लोक केवळ ओझे वाहणारे प्राणीच नव्हे तर भक्ष्यस्थानी असलेले प्राणी झाले आहेत. हे कोणालाही नाकारता येणार नाही.या मक्तेदारीने त्यांना केवळ विकासाच्या संधी पासूनच वंचित ठेवले असे नव्हे तर मानवी जीवनाचे महत्वही कळणार नाही.इतका त्यांचा निःपात केला आहे.
हे वंचित वर्ग त्यांच्यावर होत असलेल्या हुकूमतीला कंटाळले आहेत.स्वत:च राज्य करण्यासाठी ते आतूर झाले आहेत.वंचित समाजातील लोकांमध्ये निर्माण झालेल्या या तीव्र आकांक्षा वर्ग संघर्ष आणि वर्ग युद्ध होण्याइतपत वाढू देता कामा नये.त्याचा परिणाम घर दुभंगण्यात होईल.तो निश्चितपणे विनाशकारी दिवस असेल.अब्राहम लिंकन यांनी समर्पकरित्या मी म्हटल्याप्रमाणे दुभंगलेले घर अधिक काळपर्यंत टिकू शकत नाही.
त्यांच्या आकांक्षाच्या पूर्तीसाठी जेवढ्या लवकर त्यांना संधी उपलब्ध करून देता येईल तेवढे ते मुठभरांच्या हिताचे; देशाच्या हिताचे; त्याच्या स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ आणि त्याच्या लोकसत्ताक संरचना टिकून राहाण्यासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात समता आणि बंधुत्व प्रस्थापित करण्यानेच हे शक्य होणार आहे. त्यामुळेच त्यांच्यावर मी इतका भर दिला आहे.
मी सभागृहाला अधिक थकवू इच्छित नाही.स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही.परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत.याचा आपण विसर पडू देता कामा नये.या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही.यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे.काळ वेगाने बदलतो आहे.आपले लोक सुद्धा नवनवीन विचार प्रणालींचा मागोवा घेत आहेत.लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येवू लागला आहे.आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे.आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत.ज्या संविधानात आपण लोकांचे लोकांकरिता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले आहे.ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत.जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये.देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहित नाही.
उर्वरित भाग पुढे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत