ठाण्यातल्या गोळीबार प्रकरणाची चौकशी गुन्हेशाखेकडे…

पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकं या प्रकरणाचा करत आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काल रात्री उल्हासनगरमध्ये केलेल्या गोळीबाराचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला हा तपास करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. जमिनीच्या वादातून हा गोळीबाराचा प्रकार घडला असून पोलिसांनी दोन रिव्हॉल्व्हारही जप्त केली आहेत. हल्ल्याचा कट पूर्वनियोजित होता असा पोलिसांना संशय आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्यात काल रात्री १० वाजण्याच्या सुमाराला गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावरही गोळीबार केला. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती ज्युपिटर रुग्णालयानं काढलेल्या पत्रकात दिली आहे. गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागात जीवनरक्षक प्रणालीवर ठेवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकरणात पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी तिन्ही आरोपींना ठाण्याच्या कळवा पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं.न्यायालयानं त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.विरोधकांनीही याप्रकरणी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही,मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.कायदा हातात घेणाऱ्यांना मोकळीक दिली जाते आणि सरकार बघ्याची भूमिका घेते आहे,ही चिंताजनक बाब आहे.असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. महायुतीनं सुसंस्कृत महाराष्ट्राचा बिहार करुन ठेवला आहे अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत