प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत भाग १६

भारतीय संस्कृतीत ईश्वराचा व आत्म्याचा संबंध धर्माशी जोडला आहे. भगवान बुध्दाने मानवाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी ईश्वर आणि आत्मा यांचा धर्माशी जोडलेला संबंध नाकारला. वासेठ्ठ आणि भारद्वाज या ब्राम्हणाशी झालेल्या चर्चेत बुध्दाने ईश्वराविषयी त्यांचे मत स्पष्ट केले आहे. बुध्दांच्या मते या जगात खूनी, चोर, डाकू, लुटारु, व्यभिचारी, व्यसनी, फसवे, असे अनेक तर्हेचे लोक असतात. जर ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तीमान आणि सर्वव्यापी आहे तर तो एकतर या सर्व गोष्टीमध्ये तोच विद्यमान आहे अथवा अशा अनिष्ट गोष्टीचा तो पुरस्कर्ता तरी आहे. असेही नसेल तर अशाप्रकारचा ईश्वर आंधळा तरी आहे. सृष्टी ही ईश्वरनिर्मित नसून ती उत्क्रांत झाली आहे असे त्यांचे ठाम मत होते. भगवान बुध्दांनी ईश्वराचे स्थान ‘सदाचार व नीतिला’ दिले आहे.
भगवान बुध्दांने पूनर्जन्माला अवतार (Incarnation) म्हणून नाही तर पूनर्निमिर्ती म्हणून मानले. त्यांनी शरीराचे चार घटक म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू यांचे पूनर्जन्म मानले, आत्म्याचे नाही.
प्रतित्यसमुत्पाद सिध्दांतात भगवान बुध्दाने दु:खाचे उगम कसे होते व त्याचा निरोध कसा करता येईल याचा शोध घेतला. प्रतित्यसमुत्पादाचा शोध लावल्यामूळे सिध्दार्थ गौतमाला बुध्दत्व प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीच्या रात्री पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या प्रहरी भगवान बुध्दांनी प्रतित्यसमुत्पादाचाच विचार केला.
प्रतित्यसमुत्पाद हा बारा कड्याचा सिध्दांत आहे. ज्या प्रकारे एखाद्या चक्राला अनेक आरे असतात आणि ते चक्र आर्यासहित गोलाकार फिरत राहते. त्याचप्रमाणे हे भवचक्र बारा आर्यांचे बनले असून ते अखंडपणे फिरत राहते.
प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरुप (मन आणि शरीर), नामरुपामुळे षडायतन (सहा इंद्रींये), षडायतनामुळे स्पर्श, स्पर्शामुळे वेदना, वेदनेमुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान (चिकटून राहणे), उपादानामुळे भव (होणे), भवमुळे जाती (जन्म), जातीमुळे जरा (वार्धक्य), मरण, शोक उत्पन्न होतात. अशा तर्हेने अविद्येपासून ते जरा, मरण पर्यंत दु:खाचा उगम होणार्या बारा कड्यांना अनुलोम प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात. दु:खाचा उगम कसा होतो हे अनुलोम प्रतित्यसमुत्पादमध्ये सांगितले आहे.
तसेच अविद्येचा निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो. संस्काराच्या निरोधाने विज्ञानाचा निरोध होतो. विज्ञानाच्या निरोधाने नामरुपाचा निरोध होतो. नामरुपाच्या निरोधाने षडायतनाचा निरोध होतो. षडायतनाच्या निरोधाने स्पर्शाचा निरोध होतो. स्पर्शाच्या निरोधाने वेदनेचा निरोध होतो. वेदनेच्या निरोधाने तृष्णेचा निरोध होतो. तृष्णेच्या निरोधाने उपादानाचा निरोध होतो. उपादानाच्या निरोधाने भवाचा निरोध होतो. भवाच्या निरोधाने जातीचा निरोध होतो. जातीच्या निरोधाने जरा, मरण, शोक याचा निरोध होतो. याप्रमाणे दु:खाचा निरोध होतो. अशा तर्हेने अविद्येपासून ते जरा, मरण पर्यंत दु:खाचा निरोध करणार्या बारा कड्यांना प्रतिलोम प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात. दु:खाचा निरोध कसा होतो हे प्रतिलोम प्रतित्यसमुत्पादमध्ये सांगितले आहे.
दु:खाचे उगम कसे होते व त्याचा निरोध कसा होतो याची कारणमिमांसा प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार भगवान बुध्दांने याप्रमाणे समजावून सांगितला आहे.
प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत सांगतांना अविद्येपासून सुरुवात केली आहे. परंतु अविद्या हे दु:ख निर्मितीचे मूळ कारण आहे असे म्हणता येणार नाही. जगातील प्रत्येक गोष्टीचा उगम दुसर्या कोणत्या तरी समुत्पादाच्या गोष्टीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार जगात कोणतेच मूळ कारण असू शकत नाही, अविद्या म्हणजे जग जसे आहे तसे न पाहणे, म्हणजेच दु:ख आर्यसत्याविषयी संपूर्ण ज्ञान नसणे. ज्याला आर्यसत्याविषयी संपूर्ण ज्ञान आहे त्याच्याकडून संस्कार उत्पन्न होणार नाही, त्याच्यात तृष्णा उत्पन्न होणार नाही. म्हणजेच तो दु:खातून मुक्त होईल.
कोणत्याही गोष्टी प्रत्ययाशिवाय म्हणजे कारणाशिवाय होत नसते. कारणामुळे जे कार्य होते ते आपल्या परीने दुसर्या कार्याचे कारण होते आणि ते दुसरे कार्य आपल्या परीने तिसर्या कार्याचे कारण होते. अशा तर्हेने कार्यकारण भावाचे चक्र अव्याहतपणे चालू असते. वस्तूमात्रांतील परस्परसंबंध हे प्रतित्यसमुत्पादाचे मूळ स्वरुप आहे. कोणतीही वस्तू स्वयंसिध्द नसते. तिचे अस्तित्व संबंधजन्य असते. यावरुन असे लक्षात येईल की, जगात कोणत्याही गोष्टीला पहिले कारण असते. कारण प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार कोणतेही अस्तित्व हे त्याच्या कारणामुळे अस्तित्वात आलेले असते. शिवाय कार्याला एकच कारण असते असेही नाही, तर बहुतांश वेळेला अनेक कारणांच्यामुळे कार्य घडत असते. म्हणून प्रतित्यसमुत्पादाचे हे सिध्दांत नीट समजल्यावर असे लक्षात येईल की, जगात शून्यातून काहीच निर्माण होत नाही. त्यामुळे ईश्वराला शून्यातून जग निर्माण करणे शक्य नाही. प्रत्येक कार्य हे कारणावरच अवलंबून असल्यामुळे जगावर अधिकार चालविणार्या ईश्वराचे काहीच काम नाही. जर ईश्वर असेलच तर तोही कोणत्यातरी कारणामुळे उत्पन्न झाला असला पाहिजे. कारण तो स्वयंभू असणे शक्य नाही. कार्यकारण भावामुळे जगात चमत्काराला वाव नाही. म्हणून बौध्द धम्मात ईश्वराला, त्याच्या चमत्काराला किंवा आत्म्याला काहीच स्थान नाही. बौध्द धम्मात ईश्वराला, त्याच्या चमत्काराला किंवा आत्म्याला मानले जात नाही. ब्रम्ह हे विश्व निर्मितीचे कारण असू शकत नाही. बी पासून झाड उत्पन्न होते. त्याचप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणांमुळे अस्तित्वात येत असतात. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रम्ह, आत्मा, देव असे कोणीही अस्तित्वात असू शकत नाही. आपण केलेल्या कृत्याचे बरे वाईट परिणाम घडत असतात. थोडक्यात म्हणजे सर्व विश्वच प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतावर आधारलेले आहे.
बौध्द धम्मात भवचक्र किंवा संसारचक्र, कर्म आणि पुनर्जन्म यांचा संबंध दु:ख आर्यसत्याशी जोडला आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२९.१२.२०२३
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर करीत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत