माफ करा तुकोबाराया, आमच्या मस्तकात गोबर भरलय..- दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, 9561551006

इतिहासात कधीच नव्हती इतकी विदारक अवस्था मराठी माणसाची व महाराष्ट्राची झाली आहे. मोघलाईच्या काळातही महाराष्ट्र जीवंत होता. त्याच्यातले स्वत्व, सत्व आणि तत्व अबाधीत होते. तो त्याच्या तेजाने उजळत होता, तळपत होता. त्याच्यातली रग, धग, स्वाभिमान, आत्मसन्मान संपलेला नव्हता. त्याच्यातले बौध्दीक व आत्मिक तेज संपले नव्हते. त्याचा विवेक मेला नव्हता. राज्यावर गुलामीची राख साचली होती पण त्यातही जळजळीत निखारे तेवत होते. आज सगळ्याच क्षेत्रात महाराष्ट्राने आपला वारसा, आपली परंपरा, आपला विवेक खुंटीला टांगला आहे. राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र काळवंडून गेला आहे. राजकारणात विकाऊ दलालाची चलती आहे. ना तत्व, ना विचार, ना जनतेप्रती बांधिलकी. सत्तेसाठी आणि पैशासाठी जन्मदात्रीला कुणाच्याही बाजल्यावर नेणा-या औलादी राजकारणात बक्कळ माजल्या आहेत. कुठून कशाही उड्या मारतायत, रोज भूमिका बदलतायत. लोकांना मुर्खात काढतायत. त्यांच्या भडवेगिरीला उधाण आले आहे. रयतेच्या कस्पटाला धक्का लावाल तर याद राखा ! अशी तंबी देत लोक कल्याणकारी राज्य कारभार करणा-या शिवबांच्या महाराष्ट्राची ही आज अवस्था आहे. सामाजिक क्षेत्रात काही अपवाद वगळता तिथेही सुमारांची आणि लोचटांचीच गर्दी आहे.
ज्या महाराष्ट्रातल्या संतांनी अध्यात्माच्या क्षेत्रात एक मापदंड निर्माण केला तो महाराष्ट्र आज कुठल्याही भणंगाच्या मागे पळतो आहे. रोज नवनवे भोंदू महाराष्ट्रात येतायत आणि लोकांना येडचाप करून खिसे भरून जातायत. अंधश्रध्देची दलदल इतकी माजली आहे की डोक्याला मुंग्या याव्यात. शिकली सवरलेली माकडं या बुवा-बाबांच्या मागे वेडी झाली आहेत. रोज एका भामट्याचे पेव फुटते आहे. त्याचा बाजार तेजीत येतो आहे. आसाराम पासून बागेश्वरपर्यत सगळ्यां भामट्यांसाठी महाराष्ट्र सुपीक भूमी ठरतो आहे. आसाराम बलात्कार करून तुरूंगात गेला आहे तरी त्याचा उदोउदो करणा-या टाळक्यांची इथं खुप गर्दी आहे. हे सगळं चित्र अस्वस्थ करणारं आहे. महाराष्ट्र स्वत:लाच विसरला आहे. त्यांने दळभद्रीपणाला कवटाळले आहे. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजीराजांचा, द्नानोबा-तुकोबांचा, नामदेवाचा, सावता माळी-चोखोबांचा, जनाई-मुक्ताईचा, महात्मा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजाचा, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गाडगेबाबांचा हा महाराष्ट्र दिवाळखोरीत निघाला आहे की काय ? असा प्रश्न पडतो आहे. या महापुरूषांचा वारसा सांगताना लाज वाटावी अशी स्थिती आज आहे. खरच आमच्या मेंदूत गोबर भरले आहे की काय ? अशी शंका येते आहे.
काल एक व्हायरल व्हीडीओ पहायला मिळाला. सदर व्हीडीओत काही शिक्षित उच्चभ्रू, सधन घरातल्या महिला एका महाराजाच्या दरबारात वेड्यासारखे चाळे करताना पाहिल्या. तिथे एक जण सांगतो आहे धुळीचे लोट येतायत, ही तुमची मुलगी वगैरे वगैरे. तो एकाबाजूने सांगतो आहे आणि या शिकलेल्या येड्या मावशा छाती बडवतायत, येड्यासारखे चाळे करतायत. "अशक्य ते शक्य करतील स्वामी !" अशी टॅगलाईन देत अवघा बाजार तेजीत आहे. टीव्हीवरती सिरियल काढायच्या. त्यातून लोकांना चमत्काराची देशी दारू तुफान पाजायची आणि खुळे करायचे असा प्रकार जोरकसपणे सुरू आहे. अध्यात्माच्या बाबतीत आमच्या आया-बाया खुळ्यासारखं वागतात. त्यांना बुवा-बाबा आणि भोंदूगिरीची का इतकी आवड आहे ? कळत नाही. ज्या ब्राम्हणी धर्माने तिला नरकाचे द्वार म्हंटले, धर्म बुडवी म्हंटले त्याच भोंदूगिरीला या आया-बाया का इतक्या खुळ्या होतात ? असा प्रश्न पडतो. बुवा-बाबा आणि देवर्षी दिसला की या नतमस्तक झाल्याच म्हणून समजा. बायको गेली की वरचा मजला गहाण टाकलेला सांगकाम्या मागे जातोच.तो ही बुवाचा कट्टर भक्त होतो. बायको त्याचा मुत पी म्हटली तरी तो ढोसतो. जरासुध्दा डोकं लावलं जात नाही, विवेकाचा वापर करत नाही ? ज्या सावित्री मायने स्त्रीयासाठी दगड-धोंडे झेलत शाळा काढली, शिकवले ती "सावत्री माय" या मावशांना माहित सुध्दा नाही. ती कोण ? तिचे काम काय ? तिचे विचार काय ? तिचे एखादे पुस्तक आहे काय ? काही देणघेणं नाही. पण गुरूवारची शामबाला व्रताची भंपक कथा तोंडपाठ. भोंदूगिरीचा मायाबाजार भलताच तेजीत आहे.
महाराष्ट्रात अध्यात्माची पताका उंच उंच फडकवणा-या वारकरी सांप्रदायाने हे सगळं नाकारलं आहे. चमत्कार, बुवाबाजी, भोंदूगिरी, देवर्षी वगैरे गोष्टी सगळ्याच संतांनी नाकारल्या आहेत. १४ व्या शतकात, देहीचा विटाळ, देहिच जन्मला । सोवळा तो झाला कवण धर्म ।। विटाळ वांचोनी उत्पतीचे स्थान । कोणा देह निर्माण नाही जगी ।। असं सांगत संत सोयराबाईंनी विटाळ पाळणारांचे थोबाड फोडले आहे. अवघ्या व्यवस्थे विरोधात संत सोयराबाईंनी बंड पुकारले. १४ व्या शतकात इतका क्रांतीकारी विचार मांडणारी संत सोयराबाई आज शिक्षण घेवून विटाळ पाळणा-या आया-मायांना कुठे माहिती आहे ? संत तुकारामांनी तर या प्रकारावर आग ओकलीय. त्यांनी भोंदूगिरीची लक्तरं काढली आहेत. तत्कालीन बुवाबाजीचा, भामटेगिरीचा व अध्यात्मातल्या बदमाशीचा बुरखा टराटरा फाडला आहे. त्याच तुकोबांच्या महाराष्ट्रात या भोंदूगिरीला उत यावा ? हे अतिशय दुख:द आहे. तुकोबारायांनी अशा भोंदूना श्वानाची म्हणजे कुत्र्याची उपमा दिली आहे. अशांची थोबाडं फोडा म्हणून सांगितलं आहे. त्यांच्या अवघ्या गाथेत त्यांनी या सगळ्यावर आग ओकली आहे. पण तुकाराम कळले कुणाला ? समजून घेतं कोण ? आमच्या मेंदूत जर गोबर भरलं असेल तर ते कळणार तरी कसे ? तुकोबाराया खरंच आम्हाला माफ करा. तुमचा वारसा सांगण्याची आमची औकाद नाही कारण आमचे मेंदू गोबरमय झाले आहेत. त्यातला विवेक मेला आहे. जगी किर्ती व्हावी । म्हणोनी जालासी गोसावी । बहूत केले पाठांतर । वर्म राहिले दुर । चित्ती नाही अनुताप । लटीके भगवे स्वरूप । तुका म्हणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ।। तुकोबा अशा भामट्यांना सिंदळीच्या म्हणून शिवी देतात. या पेक्षाही भयंकर आग ओकणारे अभंग गाथेत आहेत. पण खेदाची बाब ही की आज अनेक सिंदळीच्यांना महाराष्ट्र डोक्यावर घेवून नाचतो आहे. तुकोबांच्या भाषेत ज्यांचे थोबाड फोडावे असे आसाराम, फसाराम, बागेश्वर, भागेश्वर यांचे महाराष्ट्रात थैमान सुरू आहे. “अशक्य ते शक्य करतील स्वामी !” अशी बाजारू टॅगलाईन घेतलेला भक्तीभावाचा बाजार सध्या भलताच तेजीत आहे. पण मेंदूत शेण भरलेला समाज जागा कधी होणार ? हा खरा प्रश्न आहे. समाजाचं प्रबोधन करता करता संत कबीरांनी बलिदान दिले. “अगर चिटी के पाव मे बाजे घुगरू, तो बी अल्ला सुनता है । तान लगा के बांग लगाये, क्या अल्लाह बेहरा है ? असा रोकडा सवाल कबीरांनी केला होता. पण अजूनही मशिदीवर भोंगा लावल्याशिवाय नमाज पडल्यासारखे ज्यांना वाटत नाही त्यांना कोण समजवणार ? कबीरांनी ब्राम्हणशाहीवर आपल्या दोह्यातून भयंकर कोरडे ओढले. त्यांनाही मारून टाकले गेले. तुकोबारायांचा तर या भडव्यानी खूनच केला. अलिकडं समाजाच्या डोक्यात साचलेला अंधश्रध्देचा चिखल साफ करणा-या दाभोळकरांचाही खून केला गेला. गोविंद पानसरे मारले. महात्मा फुले, सावित्री मायने समाजासाठी काय सोसलं नाही ? तरीपण आम्ही पुन्हा पुन्हा शेणच खाणार असू तर अवघड आहे. अजून किती संत आणि महापुरूष पचवून करपट ढेकरा देणार आहोत आपण ?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत