
या भारतात संविधानाने दिलेला अधिकार नाकारला जात असून देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे संविधान मुल्याचा जागर होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले.
जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मिशन प्रबुध्द भारताच्यावतीने संविधान बचाव परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संविधान विश्लेषक अनंत भवरे यांची मार्गदर्शक म्हणून तर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुदामराव सदाशिवे, जयभीम सेनेचे संस्थापक सुधाकर निकाळजे, ओबीसी नेते कल्याण दळे, राजेश राऊत, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली सरदार, विद्या रत्नपारखे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी विचार मंचावर स्वगताध्यक्ष अॅड. राम कुन्हाडे, मुख्य संयोजक चंद्रमणी गाडेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना प्रा. प्रतिमा परदेशी पुढे म्हणाल्या की, आज संविधान बचाव परिषदेची मोठी गरज निर्माण झाली आहे. कारण वेगवेळ्या माध्यमातून संविधान मुल्यावर आघात होत आहे. संविधान मूल्यांना पायदळी तुडवले जात आहे. धर्मनिरपेक्ष भारत, लोकशाही राष्ट्र समाजवादी भारत निर्माण करण्याचा संकल्प संविधानाच्या माध्यमातून आम्ही भारताच्या लोकांनी केला असल्याचे परदेशी यांनी म्हटले. धर्मावर आधारीत राष्ट्रवादाची जनू सक्तीच केली जात आहे आणि या देशाचे नाव बदलू पाहत आहे. भाजपची सत्ता असलेल्य राज्यात धर्म बंदीचा कायदा केला जात आहे.
हा धर्मबंदीचा कायदा भारतीय संविधानावर एक प्रकारचा हल्ला आहे. आज संविधानाने दिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारला जात आहे. देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर असताना संविधान मूल्यांचा जागर ही काळाची गरज आहे असेही प्रा. परदेशी यांनी सांगीतले. संविधान विश्लेषक अनंत भवरे यांनी भारतीय संविधानाचे महत्व विषद करुन संविधान बचावासाठी जनतेत जनजागृती करण्याची गरज प्रतिपादीत केली.
यावेळी कल्याण दळे, सुदामराव सदाशिवे, राजेश राऊत, वैशाली सरदार आदींनी आपले मत मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रमणी गाडेकर यांनी केले, स्वगताध्यक्ष अॅड. राम कुऱ्हाडे यांनी संविधान बचाव परिषदेमागील भुमीका विषद केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अच्युत मोरे यांनी तर आभार सुशिल सुर्यवंशी यांनी मानले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत