मुख्य पान

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील दलितांचा सहभाग :

य दि फडके
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील दलितांच्या सहभागाबाबत १९४८ ते १९८८ पर्यंतच्या काळात टोकाची प्रतिकूल मते व्यक्त केली जात असत. उदाहरणार्थ, मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिणारे स्वातंत्र्यसैनिक अनंतराव भालेराव यांनी १९८५ साली प्रकाशित केलेल्या ‘पेटलेले दिवस’ या लेखसंग्रहात लिहिले आहे, “जवळजवळ प्रत्येक गावचा महारवाडा रझाकारांच्या चळवळीचा विश्वासू भागीदार बनला होता. शे० का० फेडरेशनचे बरेच महार तरुण रझाकारात दाखल झाले होते. त्यांचे पुढारी बी. वेंकटराव निझामाच्या मंत्रिमंडळात शिरले होते. २४ अलीकडे दलितांच्या सहभागाबाबतच्या मताने दुसरे टोक गाठलेले दिसते. १७ सप्टेंबर १९९९ रोजी ‘लोकसत्ता’ दैनिकात बी.व्ही. जोंधळे यांचा ‘मुक्तिसंग्रामातील दलितांचे योगदान’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात दलितांची बदनामी करणाऱ्यांच्या प्रचाराचे सूत्र कोणते असते हे स्पष्ट करताना जोंधळे यांनी लिहिले होते, “हैदराबाद संस्थानशी डॉ० आंबेडकरांचा संबंध आला नव्हता. निजामाशी बाबासाहेबांचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि या भागातील पूर्वाश्रमीचे महार कासीम रझवीच्या रझाकार संघटनेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अर्थात हे सारे आरोप तद्दन खोटेच होते.” इतिहास लिहिणाऱ्याला खरे काय आणि खोटे काय याचा निवाडा करावा लागतो. अनंतराव भालेराव आणि बी० व्ही० जोंधळे यांच्या मतांमध्ये तथ्यांश नाही असे म्हणता येत नाही. पण दोघांनीही पत्रकाराच्या व्यवसायाला साजेशी अतिशयोक्ती केल्यामुळे त्यांच्या विधानातील तथ्यांश झाकला जाऊन अभिनिवेश तेवढा दिसला. मराठवाड्यातील मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिताना अनंतराव यांनी तोल सावरला आणि दलित हुतात्म्यांचा उल्लेख केला.

हैदराबाद संस्थान आणि डॉ० आंबेडकर : औरंगाबाद जिल्ह्यातील दलितांच्या
परिषदेचे पहिले अधिवेशन मक़नपूर येथे ३० डिसेंबर १९३८ रोजी भरले होते. अध्यक्षीय भाषणात डॉ० बाबासाहेब आंबेडकरांनी निजामाच्या राजवटीत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांना कुशी अपमानास्पद वागणूक दिली जाते याबद्दलचा स्वानुभव सांगितला. १९३४ साली दौलताबादचा किल्ला पाहायला बाबासाहेब आपल्या सहकाऱ्यांसमवेत गेले होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या छोट्या हौदातील पाण्याने त्यांनी तोंड धुतले तेव्हा घेडांनी हौद बाटवला म्हणून एका म्हाताऱ्या मुसलमानाने आरडाओरड करताच अनेक मुसलमान तेथे जमा झाले आणि त्यांनी बाबासाहेबांसकट सर्वांना शिवीगाळ केली. किल्ल्यात कोठेही पाण्याचा साठा दिसला तर त्याला स्पर्श करावयाचा नाही या अटीवर त्यांना दौलताबादचा किल्ला पाहण्याची परवानगी देण्यात आली. हा स्वानुभव सांगून डॉ० आंबेडकरांनी निजामी राजवटीवर कोरडे ओढले. “तुम्हाला तोंड खोलण्याची सक्त मनाई आहे. तुम्हाला मिरवणुकी काढता येत नाहीत. तुमच्या जिभा कापल्या गेल्या आहेत. येथील राज्य करण्याची पद्धत सदोष आहे. म्हणून तुम्ही आतून काही करू शकत नाही. पण मी बाहेरून जरूर करीन आर्यसमाज, हिंदुमहासभा आणि काँग्रेस यांच्यावतीने १९३९ साली निजामाच्या संस्थानात नागरी हक्कांसाठी झालेल्या सत्याग्रहाला डॉ० आंबेडकरांच्या ‘ जनता’ पत्राने पाठिंबा दिला होता.

हैदराबाद संस्थानातील दलितांच्या संघटना : १) शेड्युल्ड कास्टस् फेडरेशन, २) डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन, ३) आदि हिंदू इंडिपेंडंट लीग. यापैकी रावबहादूर बी० एस० वेंकटराव आणि बी० श्यामसुंदर यांच्या नेतृत्वाखालची डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन ही निजाम आणि इत्तेहादुल मुसलमीन हा धर्माध मुसलमानांचा पक्ष यांना पाठिंबा देत असे. बी० एस० वेंकटराव हैदराबादचे आंबेडकर म्हणून ओळखले जात असत. १९३५ सालच्या येवला येथील धर्मांतराबाबतच्या भीमगर्जनेला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत नायगावात ३० मे ते २ जून १९३६ रोजी भरलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेचे अध्यक्ष म्हणून डॉ० आंबेडकरांनी बी० एस० वेंकटराव यांची निवड केली होती. बी० एस० वेंकटराव आणि डॉ० आंबेडकर यांच्यामधील सहकार्य १९४६-४७ या वर्षामध्ये संपुष्टात आले आणि संस्थानातील शे० का० फे० चे नेतृत्व जे० एस० सुब्वया यांच्याकडे गेले.

डॉ. आंबेडकर हैदराबादसकट सर्व संस्थानांचे विलीनीकरण भारतीय संघराज्यात व्हावे या मताचा पुरस्कार करीत होते. याउलट बी० एस० वेंकटराव मात्र हैदराबाद संस्थान स्वतंत्र असावे या निजामाच्या व इत्तेहादुल मुसलमीनच्या भूमिकेला पाठिंबा देत होते. २४ डिसेंबर १९४७ रोजी मीर लायकअली यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळात बी० एस० वेंकटराव यांची मंत्री म्हणून नेमणूक झाली. मंत्रिपद मिळवण्याच्या मोहापोटी शे० का० फे० चे नेते सुब्बया यांनीही एकदा स्वतंत्र हैदराबादला पाठिंबा देणारे पत्रक काढले होते. पण विलीनीकरणा बाबतच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करून डॉ० आंबेडकरांनी सुब्बयांना ताळ्यावर आणले. ५ जून १९४७, १७ जून १९४७ आणि २७ नोव्हेंबर १९४७ रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रके काढून हैदराबाद संस्थानातील अनुसूचित जातीतल्या कोणीही निजाम या भारताच्या शत्रूला मदत करू नये असे आवाहन केले. २० बी० एस० वेंकटराव आणि बी० श्यामसुंदर यांनी निजामाची व रझाकारांची पाठराखण करण्याचे धोरण चालूच ठेवल्यामुळे त्यांचे अनुयायी रझाकारांना साथ देत होते ही वस्तुस्थिती विसरणे योग्य होणार नाही.

हैदराबाद मुक्तिसंग्रामात तुरुंगवास सोसलेल्या किंवा स्वतः भूमिगत होऊन अगर भूमिगतांना आश्रय देऊन भाग घेणाऱ्या शे० का० फे०च्या कार्यकर्त्यांची नावे खालीलप्रमाणे :

१) जांब बुद्रुकचे हणमंता साधू गायकवाड यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची सजा ठोठावण्यात आली होती. २) लातूरचे कोंडीबा जयराम टेकाळे : २ महिन्यांचा कारावास, ३) औरंगाबादचे भाऊसाहेब मोरे, ४) नांदेडचे लक्ष्मणराव हाटकर, ५) नांदेडचे हनुमंतराव मोरे, ६) लोहारा येथील माधवराव महाबळे ७) कुरुंद येथील सुदामराव, ८) येरमाळ्याचे कांबळे, ९) भूमचे साठे, १०) कळंबचे भगवानराव गायकवाड, ११) शहाजी कदम, १२) ज्ञानदेव कांबळे, १३) सोपानराव बनसोडे. ही नामावली डॉ० एस० एस० नरवडे यांच्या डॉ० बाबासाहेब आंबेडकर आणि हैद्राबाद संस्थान या पुस्तकात पृ० ५५ वर दिलेली आढळेल.

य दि फडके
हैदराबाद : विलीनीकरण आणि विघटन

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!