महाराष्ट्रात भाजपला सुबक नेपथ्यरचना !

लोकसभा निवडणुक जाहिर होण्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसे तसे राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. देशभर दिसणारे हे चित्र महाराष्ट्रात देखील दिसत आहे. येथील दोन प्रमुख गट आपापसातील जागावाटप ठरवीत असताना परस्परांवर देखील नजर ठेवून आहेत. एकीकडे भाजप , शिंदेंची शिवसेना , अजित पवारांची राष्ट्रवादी आणि दुसरीकडे काँग्रेस , ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी असा या दोन गटांतील प्रमुख संघर्ष आहे. निदान प्रसार माध्यमे तरी तसे भासवत आहेत.
सत्ता म्हणजे काय , हे सत्ता भोगणाऱ्यांना ठाऊक असते. या सत्तेसाठी काका पुतण्याला झिडकारतो व पुतण्या देखील “काका , काका ! मला वाचवा !” असा निष्फळ टाहो फोडतो. या सत्तेसाठी भाऊ भावाला व पुत्र पित्याला विसरतो. सत्तेची नशा रक्तनातेसंबंध विसरायला लावते, हे “महाभारत” माहित असणाऱ्या “विश्वगुरु” भारताला कोणी सांगायला नको !
परिणामी सध्या भाजप व शिंदे-पवार हे मित्र पक्ष आणि काँग्रेस व उद्धव-पवार हे दुसरे मित्रपक्ष आपापसात जागावाटप करताना काय महाभारत घडविणार आहेत ? हा प्रश्न उद्भवतो. वरवर पाहता ही लढाई “भाजप विरुद्ध काँग्रेस” अशी दिसत असली तरी या दोन पक्षांचे अनेक बाबतीत एकमत आहे, हे आपण विसरता कामा नये.
1991 साली खाजगीकरण – उदारीकरण – जागतिकीकरण ही त्रिविद्या काँग्रेस पक्षाने प्रथम भारतात आणली. नंतर भाजपने तिचा विस्तार केला. 1947 पासून सत्तेत असूनही काँग्रेस पक्षाने रास्व संघ या मनुवादी संघटनेवर कायमची बंदी घातलेली नाही. उलट 1990 साली व्ही पी सिंग यांनी “मंडल अहवालातील एकुलती एक शिफारस स्वीकारली” तेव्हा राजीव गांधी यांनी राखीव जागांच्या विरोधात संसदेत जोरदार भाषण दिले व नंतर व्ही पी सिंग यांचे “मंडलवादी सरकार” खुशाल पडू दिले. त्यांच्या आजोबांनी म्हणजे पण्डित नेहरु यांनी 1953 साली नेमलेला व 1955 साली सादर झालेला ‘कालेलकर अहवाल’ बासनात गुंडाळून ठेवला होता. पण्डित नेहरुंच्या सुपुत्री इंदिरा गांधी यांनीही 1978 साली नेमलेला व 1980 साली सादर केलेला ‘मंडल अहवाल’ असाच बासनात गुंडाळून ठेवला होता. म्हणजे राजीव गांधी यांनी ‘मंडल’ विरोध करुन आपली दोन पिढ्यांची परंपरा पुढे चालवली होती. 1986 साली बाबरी मशीदीचे टाळे खोलण्याचे महापाप देखील राजीव गांधींनी केले. या मशीदीच्या गर्भगृहात रामाची मूर्ती नेऊन ठेवण्याचे कृत्य 1949 साली घडले तेव्हा त्यांचे आजोबा पण्डित नेहरु हे देशाचे सर्वेसर्वा होते. त्यामुळे “उच्च जातीय हितसंबंध सांभाळणे” हा काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचा समान हेतू आहे, हे लक्षात घ्यायला हवे. म्हणून ‘काँग्रेस भाजपविरोधी आहे’ म्हणजे भाजपच्या नेमक्या कोणत्या धोरणांच्या विरोधात आहे ? असा पहिला प्रश्न पडतो.
महाराष्ट्रातील भाजपविरोधी दुसरे थोर नेते नामे शरद पवार हे मुळचे काँग्रेसवासी ! यशवंतराव चव्हाण यांचे ते मानसपुत्र ! 2001 साली वाजपेयी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री दर्जाचे पद स्वीकारुन ते आपल्या पांढऱ्या शुभ्र सेक्युलर सर्टिफिकेटला सोनेरी कोंदण घालीत होते. 2014 साली तर त्यांनी महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारला थेट बाहेरुन पाठिंबा दिला होता. ब्राह्मणाला नमस्कार केल्याने पुण्य मिळते , असे ब्राह्मणी धर्मशास्त्र सांगते. नामांतर दंगल , खैरलांजी हत्याकांड अशी महापापे त्यांच्या खात्यावर जमा होती. परंतु वाजपेयी व फडणवीस अशा शुचिर्भूत ब्राह्मणांना वंदन केल्यामुळे ते आता शुद्ध झाले आहेत , असा महाराष्ट्रातील तमाम भाजप विरोधी सेक्युलर मंडळींचा विश्वास आहे. आताही त्यांचे पुतणे व बरेच भालदार- चोपदार फडणवीस सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची भाजपविरोधी आघाडी नक्कीच यशस्वी होईल , अशी सगळ्यांना बालंबाल खात्री आहे ! राहता राहिले उद्धव ठाकरे ! ते 1990 पासून तर थेट 2022 पर्यंत सेना-भाजप युतीचे शिल्पकार – सुत्रधार वगैरे वगैरे होते. मुंबईतील 1992-93 ची दंगल व 1997 चे मुंबईच्या रमाई नगरमधील हत्याकांड हे तर त्यांच्या शिरपेचातील डौलदार तुरे आहेत ! जून 2022 मध्ये फडणवीसांनी आसमान दाखवल्यानंतरच त्यांना लोकशाही, न्यायव्यवस्था, संविधान वगैरे वगैरे आठवू लागले. अन्यथा “ब्राह्मणांहून ब्राह्मणनिष्ठ” या नात्याने त्यांचे गोडसे- सावरकर प्रेम थेट आरएसएस हून अधिक उतू जात होते. आजही त्यांत फरक पडल्याचे चित्र नाही. त्यामुळे ते किती कट्टर भाजपविरोधी आहेत , हे समस्त महाराष्ट्रातील शाखाशाखांना ठाऊक आहे. अशा अवस्थेत ‘काँग्रेस , शरद पवार व उद्धव ठाकरे हे तिघे जण मिळून महाराष्ट्रात “भाजपविरोधी” आघाडी उभी करणार’ हा एक प्रकारचा विनोदच म्हणायला हवा. परंतु नाटकांत विनोदी प्रसंग असला तरी कसलेल्या नटाला तो गंभीरपणे पार पाडावा लागतो व प्रेक्षकांना खदाखदा हसवावे लागते. त्यानुसार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या नाटकांत ही भाजपपविरोधी (!) आघाडी आपल्या वाट्याला आलेला हा “विनोदी प्रसंग” एखाद्या कसलेल्या नटाप्रमाणे गांभीर्याने पार पाडीत आहे. या अस्सल अभिनयाला भले भले दाद देत आहेत. त्यामुळे भोळी-भाबडी सामान्य जनता देखील या अभिनयावर फिदा झाल्यास नवल नाही.
या पार्श्वभूमीवर 2024 च्या लोकसभा निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या मनुवादाला महाराष्ट्रात तरी फार उपयुक्त अशी नेपथ्यरचना मिळाली आहे. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची हत्या केली व मनुवादी ब्राह्मणांनी जागोजागी गोडधोड वाटून आनंद साजरा केला. महाराष्ट्रात काही ठिकाणी मात्र ब्राह्मणविरोधी दंगली झाल्या. या दंगलींत खेड्यापाड्यातील मराठा समाजाने पुढाकार घेतल्याने मनुवादी ब्राह्मणांचा मराठा समाजावर फार मोठा राग आहे. महाराष्ट्रातील मराठा लॅाबी मोडीत काढून या रागाचा वचपा काढण्याची नामी संधी येणाऱ्या निवडणुकीत साधली जाईल, असा रागरंग दिसत आहे. या कामी अजित पवार – एकनाथ शिंदे हे जातीवंत मराठे मनुवादाच्या हाती लागले आहेत. जोडीला अनेक मनुवादी रथी- महारथी आहेत. त्यामुळे शिवरायांच्या कुशल कर्माने पवित्र झालेल्या या महाराष्ट्राच्या पावन मातीत मनुवादाची विषारी फळे पेरण्याचे महापातक भाजप करीत आहे. भाजपला विरोधी पक्षांची खडानखडा माहिती असून त्याचे ‘स्वयंसेवक’ प्रत्येक नेत्याच्या पदरी आहेत. हे स्वयंसेवक आपल्या नेत्याच्या सगळ्या बातम्या व डावपेच नागपूर हेडक्वार्टर येथे पाठवीत असतात. या नेत्यांचे पतंग किती उडू द्यायचे व त्यांना कुठे कापायचे याची संहिता नागपूर मुक्कामी लिहिली जाते. त्यामुळे 1960 पासून बेलगाम झालेली मराठा लॅाबी येत्या 2024 च्या निवडणुकीत सुतासारखी सरळ करायची , हे भाजपचे धोरण आहे. त्या दृष्टीने त्याची मोर्चेबांधणी चालू आहे. ईडी – सीबीआय दाखवून गर्भगळीत केलेले मर्द मराठा बडवलेल्या बैलाप्रमाणे स्वतःहून आपल्या नाकात ब्राह्मण्यवादी वेसण घालून घ्यायला पुढे येतील, हे अनुभवजन्य सत्य भाजपला माहित आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत मराठा लॅाबी उद्धस्त झाली तर तो भाजपच्या धोरणकर्त्यांचा विजय असेल !
हे धोरण वास्तवात उतरवण्यासाठी ओबीसींना मराठ्यांच्या विरोधात सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी भुजबळ , जानकर या बाहेरच्या पक्षातील नेत्यांना मर्यादित तर स्वपक्षातील मुंडे , बावनकुळे यांना जास्तीचे बळ पुरवले जाईल. हरयाणातील जाट , युपी-बिहार येथील यादव व गुजरातमधील पटेल यांना वठणीवर आणण्यासाठी तेथील ओबीसींचा उपयोग केला गेला. महाराष्ट्रात देखील तेच होईल !
अर्थात, भाजपच्या गोठ्यातील हे ओबीसी वाघाप्रमाणे गुर्गुर करतील , असे नव्हे. ते केवळ मराठा समाजाच्या विरोधात गुर्गुर करतील , ते देखील आरएसएसच्या इशाऱ्यावरून ! महात्मा फुले हे उत्तुंग उंची असलेले तत्त्वज्ञानी नेते होते. त्यांची उंची फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला कळली. मनुवादाला ते कधीच परवडू शकत नाहीत. परंतु अगदी कर्पूरी ठाकूर, लालू यादव असे ओबीसी देखील मनुवाद्यांना परवडत नाहीत. त्यांना महात्मा गांधीजींच्या जगजीवनराम बाबूंप्रमाणे “उठ म्हणता उठणारे, बस म्हणता बसणारे व भूंक म्हणताच भूंकणारे ओबीसी” हवे आहेत. वस्तुतः 1990 साली , बाहेरुन कांशीराम व आतून प्रकाश आंबेडकर – रामविलास पासवान यांच्या दबावामुळे ओबीसींना मंडल अहवालातील एकुलती एक का असेना परंतु शिफारस मिळाली. त्यानंतर ओबीसींनी संपूर्ण मंडल अहवाल अंमलबजावणीसाठी आंदोलन केले असते तर देशात परिवर्तनवादी शक्ती सशक्त झाल्या असत्या. शिवाय भाजप असा उधळलेल्या घोड्यासारखा वागला देखील नसता. परंतु ओबीसी समाज गावकुसाच्या आत राहणारा असल्यामुळे ब्राह्मणी धर्माप्रमाणे शूद्र असूनही स्वतःला मोठ्या जातीचा समजतो. त्यामुळे तो लोकमान्य टिळक , महात्मा गांधी , पंडित नेहरु , यशवंतराव चव्हाण , वाजपेयी , शरद पवार अशा उच्च जातीयांचे नेतृत्व मान्य करतो. काही काळ जरी ओबीसींनी डॉ आंबेडकर , दादासाहेब गायकवाड , राजा ढाले , कांशीराम , प्रकाश आंबेडकर , रामविलास पासवान , मायावती यांचे नेतृत्व स्वीकारले असते तरी खूप काही साध्य झाले असते. परंतु ओबीसी समाज दलित नेतृत्व अमान्य करतो. ‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी आपल्या मायमराठीत एक म्हण आहे. 52% लोकसंख्या असलेल्या या भल्या मोठ्या ओबीसीचा बैल अशा जातीय अहंगंडाने भरलेला असल्याने तो आजही आनंदाने मनुवादी पालख्या वाहात आहे. दक्षिणेतील तामिळनाड – केरळ या राज्यांतील ओबीसींचा त्याला अपवाद आहे. बाकीच्या राज्यांतील ओबीसी मात्र रामकृष्णभक्ती करीत करीत ब्राह्मण्यवाद्यांच्या लाथा खाण्यातच आयुष्याची सार्थकता समजतात. अशा ओबीसींना स्वतःला क्षत्रिय समजणाऱ्या जातींविरुद्ध लढायला बळ पुरवायचे , अशी मनुवादी रणनीती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुकीनंतर ओबीसी अवकाश वाढलेला दिसेल.
येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या संघर्षात फडणवीस एकनाथ शिंदेंना बळ देतील. एकनाथ शिंदे आपले उमेदवार निवडून आणण्याऐवजी उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडण्याकडे अधिक लक्ष देतील. असाच प्रकार अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यात होईल. परंतु तिथे थोरली पाती कर्णाप्रमाणे तर धाकटी पाती अर्जुनाप्रमाणे रणांगण गाजवतील , विजयी पाती कोण हे सारथी फडणवीस ठरवतील ! काँग्रेस पक्ष डोईजड होणार नाही , याची काळजी शरद पवार स्वतः जातीने घेतील ! त्यांतच मराठा आरक्षण आंदोलनामुळे बिथरलेले मराठे आपल्या हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेणार आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे मतदार अबाधित राहिल्यास भाजप सहज निवडून येऊ शकतो. एवढी सुबक नेपथ्य रचना असल्यावर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने मैदान मारल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही !
15 मार्च 2024.
(कांशीराम जयंती)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत